Saturday, 2 May 2020

ख्रित्ताचा आनंद

विषय :- ख्रित्ताचा आनंद 


 प्रस्तावना :- तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीति करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा..

                ( फिलिप्पै २:२ )

                         

         

        या अध्यायामध्ये या वचनांमधून पौलाने ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी ऐक्याने राहण्यासाठी अतिशय कळकळीचे आवाहन केलेले दिसून येते. या ठिकाणी चार प्रकारे हे ऐक्य साधण्याचे सांगितले आहे. या संपूर्ण अध्यायामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव आणि एका विश्वासणाऱ्याने कसे वागले पाहिजे ह्याचे वर्णन केले आहे. हे ऐक्य मंडळीमध्ये असले पाहिजे तसेच आमच्या घरामध्येही ते दिसून आले पाहिजे. आपण पाहातो की, कधी कधी एखाद्या घरामध्येही ते ऐक्य दिसत नाही. एकमेकांचे एकमेकांबरोबर पटत नाही. आईवडीलांचे मुला मुलीबरोबर किंवा लेकरांचे आईवडीलांबरोबर, कधी बहीण भावाचे तर कधी सासू सूनेचे असे बऱ्याच ठिकाणी आपण पाहातो. परंतु या गोष्टींमध्ये देवाला संतोष वाटत नाही. प्रभू स्वतः पित्याकडे प्रार्थना करताना म्हणत आहे की, "ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा." ( योहान १७:२१)

      आम्ही कधी असे होऊ शकतो ? एकमेकांवर प्रीति करणारे, एकजीव होऊन एकचित्त होणारे ? त्याचे उत्तर देताना पौल म्हणतो, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो.( वचन ५) म्हणजेच आम्हाला ख्रिस्ताच्या स्वभावाचे होणे गरजेचे आहे. कसा होता ख्रिस्ताचा स्वभाव ? तो लीन आणि नम्र होता. वचन सांगते, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. ( वचन ६) वास्तविक पाहता तो केवळ देवाच्या स्वरूपाचा होता असे नव्हे तर तो देवच होता. मानवाचे तारण व्हावे म्हणून त्याने स्वर्गातील आपले गौरव आणि आपले देवाचा पुत्र असण्याचे विशेष हक्क त्याने स्वेच्छेने सोडले. त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. ( वचन ७) त्याने देव असूनही मनुष्य होऊन आमच्यासाठी दुःख सोसले. हे सर्व त्याने पाप न करता सोसले. दासासारखे तो लीन आणि नम्र झाला. मानवी दुःखे, गैरसमज, दुर्व्यवहार, द्वेष आणि शेवटी वधस्तंभावरील मृत्यु हा त्याने सोसला. आमच्या ठायीही हा ख्रिस्ताचा स्वभाव, ही लीनता, नम्रता आली पाहिजे. म्हणजे मग आम्ही एकमेकांवर प्रीति करू शकतो. पौल म्हणतो, *आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. ( इफिस ४:३)

      प्रियांनो आम्ही स्वतःला रिक्त केले पाहिजे. प्रत्येक वाईट गोष्टींच्या मोहापासून, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून, पापापासून, वाईट बोलण्यापासून स्वतःला सांभाळले पाहिजे. ख्रिस्तासारखे लीन आणि नम्र झाले पाहिजे. आमच्यामध्ये सदैव ऐक्य टिकून राहावे यासाठी झटले पाहिजे. आणि ख्रिस्ताबरोबरच चालले पाहिजे. यहोशवा म्हणतो, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराचीच सेवा करणार* त्याप्रमाणेच आम्हीही परमेश्वराचीच सेवा करून परमेश्वराच्या मार्गाने चालले पाहिजे, त्याचीच सेवा केली पाहिजे. प्रभूला आनंद वाटेल, संतोष वाटेल असे वागले पाहिजे.

         

No comments:

Post a Comment