Sunday, 15 August 2021

देवाची वधू



                        *🌟प्रभात तारा🌟*


                         *✨देवाची वधू✨*


 *"मी तुला सर्वकाळची आपली वाग्दत्त असे करीन, धर्माने व न्यायाने, व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन."..✍🏼*

                       *( होशेय २:१९ )*


                             *...मनन...*


             *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


     इस्राएलबरोबर असलेले स्वतःचे नाते स्पष्ट करण्यासाठी देवाने वारंवार विवाह, वधू, वर या प्रतीकांचा उपयोग केलेला आपणांस पाहावयास मिळतो. जसे की, *...नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. ( यशया ६२:५)* त्याचप्रमाणे यिर्मयामध्ये परमेश्वर म्हणत आहे की, *... मी लग्नाचा नवरा आहे. ( यिर्मया ३:१४)* आणखी आपण पाहातो की, गीतरत्नमध्ये देखील देव आणि त्याची मंडळी म्हणजे त्याची वधू यांच्यातील प्रीतीविषयी लिहिले आहे. इस्राएल देवाची वधू आहे. देव इस्राएलविषयी म्हणतो की, *मी तुला सर्वकाळची आपली वाग्दत्त असे करीन.* देव आपल्या वधूशी, यहूदी लोकांशी निष्ठेने वागला. त्यांने त्यांच्यावर प्रीति केली, त्यांचे रक्षण केले आणि सर्व प्रकारच्या बहुमोल देणग्या देऊन त्यांना आशीर्वादित केले. परंतु त्यांनी मात्र देवाला सोडून दिले. ते अन्य दैवतांच्या नादी लागले. त्यांनी देवाचे नियम पाळले नाहीत. होशेयच्या पत्नीप्रमाणे त्यांनी आपल्या विवाहाची वचने मोडली. परिणामी ते गुलामगिरीत, पापाच्या दास्यात खितपत पडले. सगळीकडे त्यांची निंदा झाल्यामुळे शरमेने त्यांची मुखे काळवंडून गेली. गोमरप्रमाणे इस्राएल लोकही देवाने त्यांना पूर्वी विपूल प्रमाणात दिलेले आशीर्वाद विसरून गेले. 

     होशेयचा विवाह अविश्वासू वधूशी, गोमरशी झाला होता. तसेच देवानेही अविश्वासू इस्राएलशी लग्न केले आहे. होशेय प्रमाणेच देवाच्याही हृदयात इस्राएल विषयी अपार प्रीति आहे. बहकलेल्या इस्राएलने आपल्याकडे परत यावे अशी देवाला किती उत्कंठा लागलेली असते हे होशेयच्या उदाहरणावरून आम्हाला दिसून येते. होशेयचे नाव, लौकिक, प्रीति हे सारे एका निर्लज्ज, व्यभिचारी स्त्रीच्या पायी मातीमोल झाले, त्या स्त्रीसाठी होशेयच्या सर्वस्वाचा होम झाला. आमच्या प्रभू येशूनेदेखील आमच्यासाठी असेच केले नाही का ? आम्ही पापात खितपत पडलेले असतानाच तो आमच्याकडे आला. एवढेच नाही तर आमच्या पापांची क्षमा केली, त्यासाठी त्याने कालवरीवर वधस्तंभावरचे लज्जास्पद मरणही पत्करले. *त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले, ह्यासाठी की, 'त्याने खंडणी भरून' 'आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे', आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले 'स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे'. ( तीत २:१४)*

      प्रख्यात मनोविकारतज्ञ कार्ल मेनिंजर यांनी आपल्या "Whatever became of sin ?"  या पुस्तकात "पाप म्हणजे दूसऱ्यांची प्रीति नाकारणे", अशी पापाची अगदी सखोल व मनाला भिडणारी व्याख्या केली आहे. खरोखरच *" पाप म्हणजे देवाची आमच्यावरील प्रीति नाकारणे"* हेच खरे आणि वास्तव आहे. दाविद राजा आपल्या पापांचा अंगीकार करताना म्हणतो की, *"तुझ्याविरूद्ध, तुझ्याविरूद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे." ( स्तोत्र ५१:४)* होशेयद्वारे कशानेही पराभूत न होणारी खऱ्या पतीची खरी प्रीति येथे दाखवली आहे व देवानेही स्वतःला खरा पती असे दाखवले आहे. त्याचबरोबर इस्राएलची बंडखोरी, सातत्याने होणारी धर्मभ्रष्टता येथे दाखवली आहे. होय प्रियांनो, आम्ही देवाची वधू आहोत. आमचा वर स्वतः प्रभू आहे. तो आमची काळजी घेतो आमच्यावर प्रीति करतो. आम्ही इस्राएल लोकांप्रमाणे किंवा गोमरप्रमाणे देवाबरोबर बंड करू नये, अन्य दैवतांच्या मागे जाऊ नये तर देवाबरोबर एकनिष्ठ राहावे. त्याच्यावर प्रीति करावी.


         


     

Thursday, 5 August 2021

ख्रिस्ताला ओळखा

 *पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*


                     


                *✨ख्रिस्ताला ओळखा✨*


*"प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत; आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात."..✍️*

                     *( योहान ६:६८,६९)*


                


           


    आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की, पुष्कळ शिष्य येशूला सोडून निघून गेले आहेत. यावरून येशूच्या सान्निध्यात राहूनही अद्याप बरेच दूर असलेल्या 'काठावरील' तथाकथित शिष्यांचा बोध होतो. ते खरे विश्वासणारे नव्हते. कारण ख्रिस्ताचे शिक्षण, वचन स्वीकारणे त्यांना कठीण वाटत होते. मांस व देह खाणे, तसेच मनुष्याच्या पुत्राचे स्वर्गात चढून जाणे आणि त्यापूर्वी त्याला दुःख भोगून मरण सोसावे लागणे या शब्दांनी त्यांचा गोंधळ उडाला आणि ते अडखळले. प्रभू त्यांना म्हणत आहे, *"आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत." ( वचन ६३)* या वचनाचा रोख त्यांचे विचार ऐहिकतेपासून आध्यात्मिकतेकडे वळवावे असाच आहे. आपल्या शिक्षणातील आध्यात्मिक अर्थ नीट समजून घेण्याच्या गरजेकडे त्याने त्यांचे लक्ष वेधले. त्यांच्यापैकी काही जणांच्यामध्ये विश्वासाचा अभाव आहे हे येशूला माहीत होते. 

    प्रभू येशू तेथे अजूनही त्याच्यासोबत  असलेल्या त्याच्या बारा शिष्यांना विचारतो की, *"तुमचीही जाण्याची इच्छा आहे काय?"* तेव्हा शिमोन पेत्र म्हणत आहे की, *"आम्ही कोणाकडे जाणार?...  आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपणच आहात."* ह्या त्याच्या उद्गारात पेत्राने तीन गोष्टी प्रभू विषयी खात्री देणाऱ्या बोलल्या आहेत. 

   पहिली गोष्ट म्हणजे, तो म्हणत आहे की, प्रभू येशू शिवाय आम्ही कोणाकडे जाणार? पेत्र व इतर शिष्य येशूबरोबर बराच काळ राहिले होते. त्यांनी प्रभू येशूची प्रेमाची, दयेची, क्षमेची शिकवण ऐकली होती. त्यांनी प्रभूने केलेले चमत्कार पाहिले होते. त्यांनी प्रभूचा उदात्त व थोर स्वभाव जाणून घेतला होता. तसेच त्यांनी प्रभू येशूचे मानवी, आध्यात्मिक व सामाजिक जीवन अगदी जवळून पाहिले होते. म्हणूनच पेत्र म्हणत आहे, *"प्रभू आम्ही कोणाकडे जाणार? "* प्रभू येशू हाच "मार्ग, सत्य व जीवन आहे." आणि तोच आम्हाला विसावा देणारा आहे. तो प्रेमाने आम्हाला आमंत्रित करतो, *"अहो, कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही मजकडे या; मी तुम्हांला विसावा देईन."*

     दूसरे म्हणजे पेत्र म्हणत आहे, *"सार्वकालिक जीवनाची वचने प्रभू येशू जवळ आहेत."* पेत्राच्या या उद्गारातून आपल्या लक्षात येते की, बायबल मध्ये सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी अर्थपूर्ण वचने आहेत. वचनाद्वारे आपले जीवन परिवर्तन होऊ शकते. आपले जीवन बदलून टाकण्याची शक्ती प्रभू येशूच्या शब्दामध्ये आहे. प्रभू म्हणतो, *"जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन." ( योहान ६:५४)* आपणही प्रभू येशू द्वारे मिळणाऱ्या सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी त्याच्या अधिक जवळ येऊया. 

    तिसरी गोष्ट म्हणजे, पेत्र म्हणत आहे, *"देवाचा पवित्र पुरुष प्रभू येशू ख्रिस्त आहे."* येशू कोणीतरी खास, विशेष आहे. तो देवाचा पवित्र तो पुरुष आहे. तो असा आहे ही खात्रीच शिष्यांच्या विश्वासाचे केंद्रस्थान होती. पेत्राने प्रभूविषयी कबूली दिली आहे. त्याने ख्रिस्ताचे देवत्व, प्रभूत्व ओळखले आहे. त्याने येशूच्या स्पर्शामध्ये देवाचा स्पर्श जाणून घेतला आहे. त्याने प्रभू येशू मध्ये अनंतकालीन जीवनाचे ओझरते दर्शन घेतले होते. त्याला प्रभूच्या थोरवीची व पावित्र्याची जाणीव झाली होती. म्हणूनच तो प्रभूला "देवाचा पवित्र पुरुष" असे घोषित करतो. 

    प्रिय देवाच्या लेकरांनो, पेत्राप्रमाणे आपणही प्रभूला ओळखूया. आपणही प्रभू येशू मधील पावित्र्याची जाणीव करून घेऊया. आणि त्याच्या अधिक जवळ येऊन त्याला जाणून घेऊया. तो किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहूया. ( स्तोत्र ३४:८)