*🌟प्रभात तारा🌟*
*✨देवाची वधू✨*
*"मी तुला सर्वकाळची आपली वाग्दत्त असे करीन, धर्माने व न्यायाने, व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन."..✍🏼*
*( होशेय २:१९ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
इस्राएलबरोबर असलेले स्वतःचे नाते स्पष्ट करण्यासाठी देवाने वारंवार विवाह, वधू, वर या प्रतीकांचा उपयोग केलेला आपणांस पाहावयास मिळतो. जसे की, *...नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. ( यशया ६२:५)* त्याचप्रमाणे यिर्मयामध्ये परमेश्वर म्हणत आहे की, *... मी लग्नाचा नवरा आहे. ( यिर्मया ३:१४)* आणखी आपण पाहातो की, गीतरत्नमध्ये देखील देव आणि त्याची मंडळी म्हणजे त्याची वधू यांच्यातील प्रीतीविषयी लिहिले आहे. इस्राएल देवाची वधू आहे. देव इस्राएलविषयी म्हणतो की, *मी तुला सर्वकाळची आपली वाग्दत्त असे करीन.* देव आपल्या वधूशी, यहूदी लोकांशी निष्ठेने वागला. त्यांने त्यांच्यावर प्रीति केली, त्यांचे रक्षण केले आणि सर्व प्रकारच्या बहुमोल देणग्या देऊन त्यांना आशीर्वादित केले. परंतु त्यांनी मात्र देवाला सोडून दिले. ते अन्य दैवतांच्या नादी लागले. त्यांनी देवाचे नियम पाळले नाहीत. होशेयच्या पत्नीप्रमाणे त्यांनी आपल्या विवाहाची वचने मोडली. परिणामी ते गुलामगिरीत, पापाच्या दास्यात खितपत पडले. सगळीकडे त्यांची निंदा झाल्यामुळे शरमेने त्यांची मुखे काळवंडून गेली. गोमरप्रमाणे इस्राएल लोकही देवाने त्यांना पूर्वी विपूल प्रमाणात दिलेले आशीर्वाद विसरून गेले.
होशेयचा विवाह अविश्वासू वधूशी, गोमरशी झाला होता. तसेच देवानेही अविश्वासू इस्राएलशी लग्न केले आहे. होशेय प्रमाणेच देवाच्याही हृदयात इस्राएल विषयी अपार प्रीति आहे. बहकलेल्या इस्राएलने आपल्याकडे परत यावे अशी देवाला किती उत्कंठा लागलेली असते हे होशेयच्या उदाहरणावरून आम्हाला दिसून येते. होशेयचे नाव, लौकिक, प्रीति हे सारे एका निर्लज्ज, व्यभिचारी स्त्रीच्या पायी मातीमोल झाले, त्या स्त्रीसाठी होशेयच्या सर्वस्वाचा होम झाला. आमच्या प्रभू येशूनेदेखील आमच्यासाठी असेच केले नाही का ? आम्ही पापात खितपत पडलेले असतानाच तो आमच्याकडे आला. एवढेच नाही तर आमच्या पापांची क्षमा केली, त्यासाठी त्याने कालवरीवर वधस्तंभावरचे लज्जास्पद मरणही पत्करले. *त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले, ह्यासाठी की, 'त्याने खंडणी भरून' 'आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे', आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले 'स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे'. ( तीत २:१४)*
प्रख्यात मनोविकारतज्ञ कार्ल मेनिंजर यांनी आपल्या "Whatever became of sin ?" या पुस्तकात "पाप म्हणजे दूसऱ्यांची प्रीति नाकारणे", अशी पापाची अगदी सखोल व मनाला भिडणारी व्याख्या केली आहे. खरोखरच *" पाप म्हणजे देवाची आमच्यावरील प्रीति नाकारणे"* हेच खरे आणि वास्तव आहे. दाविद राजा आपल्या पापांचा अंगीकार करताना म्हणतो की, *"तुझ्याविरूद्ध, तुझ्याविरूद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे." ( स्तोत्र ५१:४)* होशेयद्वारे कशानेही पराभूत न होणारी खऱ्या पतीची खरी प्रीति येथे दाखवली आहे व देवानेही स्वतःला खरा पती असे दाखवले आहे. त्याचबरोबर इस्राएलची बंडखोरी, सातत्याने होणारी धर्मभ्रष्टता येथे दाखवली आहे. होय प्रियांनो, आम्ही देवाची वधू आहोत. आमचा वर स्वतः प्रभू आहे. तो आमची काळजी घेतो आमच्यावर प्रीति करतो. आम्ही इस्राएल लोकांप्रमाणे किंवा गोमरप्रमाणे देवाबरोबर बंड करू नये, अन्य दैवतांच्या मागे जाऊ नये तर देवाबरोबर एकनिष्ठ राहावे. त्याच्यावर प्रीति करावी.
No comments:
Post a Comment