*२ राजे ५:१-४*
*सर्व काही आहे , "पण " !*
*तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील , त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही ; कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे.*
*निर्गम १५:२६*.
आमच्या जीवनात हा *पण* जो आहे तो नेहमीच डोकावत असतो. ह्या *पण* मुळे सर्वकाही असुनही नसल्यासारखेच असते.
हा नामान सेनापती होता , आपल्या धन्याच्या पदरी थोर मनुष्य होता , त्याच्या हाती अधिकार , सामर्थ्य होते , राजाच्या मर्जीतील तो होता. युद्धात विजय मिळविणारा पराक्रमी वीर तो होता. *पण* तो कोडी होता. जक्कय हा सुद्धा फार श्रीमंत होता, मुख्य जकातदार होता , येशूला पाहावे ही इच्छा त्याची होतीच , *पण* तो बुटका होता म्हणून प्रभूला पाहू शकत नव्हता.
हा *पण* काय दाखवतो तर आमच्यात काहीतरी उणेपणा आहे की ज्यामुळे आम्ही खऱ्या व जिवंत देवापासून दूर आहोत. नामान कोडी होता ,कोड हे पापाचे दर्शक आहे. त्यामुळे सर्व असूनही तो खऱ्या आणि जिवंत देवापासून दूर होता. जक्कयात पातकाच बुटकेपण होत म्हणून ख्रिस्ताला तो पाहू शकत नव्हता. *ह्या ख्रिस्तापासून दूर असणं म्हणजे पातकात असणं म्हणजेच सार्वकालिक मृत्यूकडे वाटचाल!! हा पातकाचाच *पण* आमच्यात आहे. *पापाचा हा रोग जो आहे तो संसर्गजन्य आहे. *रोम ५:१२ सांगते, एक माणसामुळे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले.*
*पण यावर उपाय आहे. तो म्हणजे ख्रिस्ताला शरण जाणे.* सर्व पापाची कबुली देत पश्चाताप करीत प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार करणं !! नामानाला इस्राएलच्या जिवंत देवावर विश्वास ठेवणारी छोटी मुलगी भेटली, जक्कयाच्या सुध्दा कानावर प्रभू येशूची सुवार्ता आलीच होती म्हणून तो ख्रिस्ताला पाहण्यासाठी बुटकेपणावर मात करीत धडपडला. आणि त्यांच्या जीवनातील हा *पण* दूर झाला. खऱ्या जीवनात त्यांचा प्रवेश झाला. *पातकाचा रोग नाहीसा झाला.*
आमच्या जीवनात जर हा *पण* असेल जो प्रभूपासून आम्हाला दूर ठेवतो तो आजच काढून टाकू कारण आता आम्हाला ख्रिस्त सापडला आहे ,समजला आहे , तर का आम्ही सर्व असूनही ह्या *पण* मूळे काहीच नसल्यासारखे जीवन जगावे? *कारण जर ख्रिस्त जीवनात प्रथमस्थानी नाही तर जीवनात काहीच नाही.*
*सर्व समर्थ ईश्वरा आमच्यातील सर्व उणेपणा जो पातकामुळे आहे तो काढून आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर म्हणजे आम्ही तुझ्या सहवासात सदैव राहू*.
*
No comments:
Post a Comment