Monday, 29 March 2021

परमेश्वराचा धन्यवाद कर



       *✨परमेश्वराचा धन्यवाद कर✨*


*हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर..✍🏼*

                     *( स्तोत्र १०३:१ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    आपण दाविद राजाच्या जीवनाविषयी पाहिले तर आम्हाला दिसून येते की, दाविद राजा प्रत्येक प्रसंगात परमेश्वराला धन्यवाद देत असे. तो प्रसंग दुःखाचा असो, संकटांचा असो किंवा आनंदाचा असो, तो आपल्या उद्धारकर्त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायचे कधीही विसरत नसे. वरील वचनामध्ये आपण वाचतो की, दाविद आपल्या स्वतःच्या जिवाला, आपल्या मनाला, अंतर्यामाला परमेश्वराला धन्यवाद देण्यास सांगत आहे. एकप्रकारे तो आपल्या शरीराला, मनाला परमेश्वराला धन्यवाद देण्याची आठवण करून देत आहे. आपणही दाविदाप्रमाणे स्वतःला देवाचा धन्यवाद करण्याची आठवण करून द्यावी. आणि हे धन्यवाद दाविदाप्रमाणेच अगदी मनापासून, अंतःकरणापासून दिलेले असावेत. परमेश्वराने आमच्या जीवनात अनेक महत्कृत्ये केलेली आहेत. त्याचे अनंत उपकार आम्हांवर आहेत. आम्ही त्याबद्दल त्याची स्तुती, स्तवन करून त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. देवाने आपल्यावर जे सर्व उपकार केले आहेत ते त्याने आमच्यावर असलेल्या त्याच्या दयेनेच केले आहेत. आपण त्याच्या उपकारांची सदैव आठवण करावी. त्याचे उपकार आम्ही कधीही विसरू नयेत.

    परंतु देवाने आमच्यावर इतके अगणित उपकार केले असूनही आम्ही कधी कधी देवाचे उपकार स्मरत नाही, विसरून जातो. बायबलमध्ये आपण वाचतो की, हिज्किया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातातून सोडविले. वचन सांगते, *परमेश्वराने हिज्कियास व यरूशलेमकरांस अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून वाचविले, आणि तो त्यांस सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला. ( २ इतिहास ३२:२२)* परंतु राजा हिज्किया याने परमेश्वराच्या उपकारांचे स्मरण ठेवले नाही आणि त्याचे हृदय उन्मत्त झाले. *पण हिज्कियाने आपल्यावर झालेल्या उपकाराची फेड केली नाही; त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे त्याजवर, यहूदावर व यरुशलेमेवर कोप झाला. ( २ इतिहास ३२:२५)* आम्ही परमेश्वराला विसरून जाऊ नये म्हणून ताकीद दिलेली आहे. वचन सांगते की, *सावध ऐस, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधि मी तुला आज सांगत आहे ते पाळावयाचे सोडून तूं आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील... तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून काढून आणिले त्याला तूं विसरू नये म्हणून सांभाळ. ( अनुवाद ८:११-१४)*

    स्तोत्रकर्ता म्हणत आहे की, *...त्याचे सर्व उपकार विसरू नको;* आपला देव आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करितो. योहान आपल्या पत्रात लिहितो, *जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. (१ योहान १:९)*

   तो आमचे सर्व रोग बरे करितो. पवित्र शास्त्रात आपण वाचतो की, *तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्यापूढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहां. ( मार्क १:४०)*

   तो आम्हाला मरणातून जीवनात पार नेणारा देव आहे. प्रभू येशू म्हणतो, *"मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. ( योहान ५:२४)*

    तो दया व करूणा ह्यांचा मुकुट घालितो. आपण जकातदाराच्या प्रार्थनेविषयी वाचतो, *जकातदार तर दूर उभा राहून स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला उर बडवीत म्हणाला, हे देवा मज पाप्यावर दया कर. ( लूक १८:१३)* आणि आपण पाहातो की त्याच्यावर दया करण्यात आली.

   तो तृप्त करणारा, नवीन शक्ती देणारा देव आहे. *तो भागलेल्यांस जोर देतो, निर्बलास विपूल बल देतो... तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ( यशया ४०:२९-३१)* प्रियांनो, परमेश्वर आमच्यासाठी खूप महत्कृत्ये करतो. आम्ही नेहमीच त्याचे ऋणी राहिले पाहिजे, त्याचे उपकार मानले पाहिजे, त्याला धन्यवाद दिले पाहिजे, त्याची स्तुती आणि स्तवन केले पाहिजे. आम्ही उन्मत्त होऊ नये तर सदैव लीन आणि नम्र असावे.


         

No comments:

Post a Comment