*✨येशूच्या उजव्या हाती✨*
*तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविला गेला आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा..✍🏼*
*( कलस्सै ३:१ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
ख्रिस्त जेथे राहतो तेथेच एका ख्रिस्ती व्यक्तीचे घर असावे. आपले ध्येय आणि आग्रह एकच असावा, तो हा की जेव्हा आपला येशू गौरवात प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्या बरोबर असावे. ह्या पृथ्वीवरील आपले जीवन क्षणिक आहे. आपले हृदय स्वर्गीय गोष्टींवर असल्यामुळे ह्या पृथ्वीवरील गोष्टी विस्मृती आहेत. आपले नागरीकत्व स्वर्गात आहे. आपण ह्या पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत. म्हणून आपली इच्छा, आग्रह सर्व स्वर्गीय गोष्टींविषयी असला पाहिजे.
*"देवाच्या उजव्या हाती असलेल्या गोष्टी मिळविण्याचा यत्न करा."* असे प्रेषित म्हणतो. देवाच्या उजव्या हाती आपल्याला पुष्कळ आशिर्वाद आहेत. ह्या गोष्टी मिळविण्याचा यत्न केला तरच त्याच्या आगमनासाठी तयार होऊ शकतो. *जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. (स्तोत्र १६:११)* देवाच्या उजव्या हाती असलेला सुखाचा अनुभव आपण प्राप्त करावा म्हणून ह्या जगात वेगवेगळ्या मार्गाने तो आपल्याला चालवितो. आपण ह्या सुखाकडे दुर्लक्ष केले तर सैतान ह्या जगाच्या सुखाकडे आपले लक्ष वेधून घेतो. म्हणून आपण प्रार्थना मध्ये जागृत असले पाहिजे. आपले पूर्ण ध्येय म्हणजे स्वर्गात प्रवेश हेच असायला हवे.
*"देव त्याच्या उजव्या हाताने सावरतो."*"तू भिऊ नको. कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे साहाय्य करितो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो.'' (यशया ४१:१०) हे दवाचे अभिवचन आहे. आपण देवाची धार्मिकता शोधली पाहिजे. आपण त्याजवर विश्वास करून भरवसा ठेवताना त्याची धार्मिकता प्राप्त करतो. "नीतिमान विश्वासाने जगेल." आपले नीतिमत्त्व मलिन चिंधीसारखे आहे. देवानेच आपल्याला नीतिमान ठरवावे व धार्मिक बनवावे. आपल्यामध्ये स्व:धार्मिकता नसावी.
*"देवाच्या उजव्या हाती पूर्ण विसावा आहे."* माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. (स्तोत्र ११०:१) त्याच्या अभिवचनांवर विश्वास केल्याने विसावा मिळतो . अविश्वास व शंका बेचैन करते. आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रत्येक पावलांवर आपल्याला विसावा मिळतो. आपल्या आध्यात्मिक जीवनात वेगवेगळ्या अनुभवातून जात असताना त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला तर विसावा मिळतो. इस्त्राएली लोक अभिवचनांच्या देशात नाहीत तर विसाव्यात प्रवेश करू शकले. कारण त्यांनी देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला.
आपल्यासाठीही सियोन, यरूशलेम अभिवचनांचा देश तयार होत आहे. देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवत ध्येयाकडे पाहत आपण धावू या.
*"पित्याच्या उजव्या हाती बसून देव आपल्यासाठी विनवणी करितो."* दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे. जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे. (रोम ८:३४) रात्रंदिवस सैतान देवासमोर आपल्यावर दोषारोप करतो. पण आपला येशू एक दयाळू व विश्वसनीय महायाजक होऊन आपल्याविषयी देवासमोर मध्यस्थी करतो. आपणही दुसऱ्यांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. जे संकटात आहेत, पापांत आहेत, परीक्षात आहेत आजाराने पिडीत आहेत अशांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. सैतानासारखे दुसऱ्यांवर दोष लावू नये.
*"देवाचा उजवा हात आपल्याला जय देतो."* परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधिला आहे. (स्तोत्र १८:१) देवाचा उजवा हात सामर्थ्याशाली व गौरवी आहे. देवाचा उजवा हात शत्रूचा चुराडा करीतो. म्हणून आपल्याला पाप, आजार, जगीकपणा, सैतान, जगाचे क्षणीक सुखविलास, मरण व अधोलोकांवर जय आहे. एक विजयी जीवन जगण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. त्याच्याबरोबर गौरवात प्रकट होण्यासाठी आपण पुसंताना बरोबर भागी असले पाहिजे. विजयी संत उचलले जातील. आपण वरील गोष्टींवर मन लावून त्या गौरवी दिवसात प्रगट होऊ या. आपल्या प्रभू येशूची पवित्र वधू बनू या!
No comments:
Post a Comment