*✨धूळीचे गौरव✨*
*"मी तुला धुळीतून वर काढून माझ्या इस्राएल लोकांचा अधिपती केले आहे, तरी ... तू माझ्या इस्राएल लोकांकडून पाप करवले आहेस, व त्यांनी आपल्या पातकांनी मला संतप्त केले आहे..✍🏼*
*( १ राजे १६:१ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
अहीयाचा पुत्र बाशा तिरसा येथे इस्राएलावर राज्य करू लागला तेव्हा त्याने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. त्याने यराबामाचे अनुकरण केले. त्याने केवळ स्वतःच पाप केले असे नाही तर त्याने सर्व इस्राएल लोकांकडूनही पाप करवले. म्हणून परमेश्वर हनानीचा पुत्र येहू ह्याच्याद्वारे बाशाला वरील वचनाद्वारे इशारा देत आहे. बाशा हा हे विसरला होता की परमेश्वराने त्याला धुळीतून वर काढले होते. त्याचा कृतघ्नपणा, अपकारक वृत्ती त्याला गर्वाकडे घेऊन गेली आणि त्याला प्राप्त झालेल्या उच्च स्थानाच्या गर्व व दर्जा यामुळे तो बेकायदेशीररित्या घृणास्पद गोष्टी करू लागला. तो मूर्तिपूजेकडे वळून ज्या मार्गाने यराबाम गेला त्या मार्गाने तो जाऊ लागला. आणि त्याने इस्राएल लोकांकडूनही पाप करवले. ह्याचा परिणाम असा झाला की, परमेश्वर म्हणाला, *"तर पाहा, "बाशा आणि त्याचे घराणे यांचा मी अगदी नायनाट करीन;"*
प्रियांनो, मनुष्य जेव्हा उच्च पदावर पोहोचतो तेव्हा आपल्या दैन्यावस्थेतून कसा वर उचलला गेला हे तो विसरतो आणि आपले अंतःकरण दूसऱ्या गोष्टींकडे वळवतो ज्या देवाला आवडणाऱ्या नाहीत. आणि अशा गोष्टींच्या मोहामध्ये तो सापडतो. आपण जरी खूप चांगल्या कुटूंबातून आलो असलो, खूप उच्च पद प्राप्त केले असेल, आम्ही आमच्या जीवनात खूप धनसंपत्ती मिळवली असेल तरी आपण कायम लक्षात ठेवावे की आपण धुळीतून वर काढले गेलेलो आहोत. आपण जेव्हा आपल्या आत्मिक जीवनात वाढत जातो तेव्हा आपण गतकाळात कशा पापी अवस्थेत होतो, अज्ञानी अवस्थेत होतो हे विसरतो आणि स्वतःला खूप मोठे ज्ञानी, संत समजायला लागतो आणि दुसऱ्यांना तुच्छ समजायला लागतो. आमच्या मध्ये असलेला आत्मिक अहंकार डोके वर काढतो आणि आपली पूर्वीची अवस्था विसरून आपण दूसऱ्यांना कमी लेखतो, त्यांचा धिक्कार करतो. आम्ही हे विसरतो की हे सर्व आम्हाला देवाच्या कृपेनेच प्राप्त झाले आहे.
यशया इस्राएल लोकांना म्हणतो, *"तुम्ही जे नीतिमत्तेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका, ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढिले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढिले त्याकडे लक्ष द्या." ( यशया ५१:१)* खास्दे मोठ्या अन्य जातींच्या, राष्ट्राच्या पर्वतासारखे होते आणि इस्राएल त्यातून छेदलेला परमेश्वराच्या करूणेमुळे 'पारखलेला' दगड होता. यहूदी लोक अतिशय गर्वाने स्वतःस कोणाचे गुलाम किंवा नोकर नाही तर अब्राहामाचे 'बीज', संतती समजत होते परंतु अब्राहाम कसा पूढे आला हे ते लक्षात घेत नाहीत. तो एक छोटासा दगड होता जो परमेश्वराद्वारे मोठा पर्वत झाला. कशामुळे ? अब्राहाम विश्वासयोग्य व धार्मिक होता. तो आयुष्यभर परमेश्वरापूढे नम्र होऊन वागला. आणि त्याचे फळ म्हणून परमेश्वराने त्याला अनेक राष्ट्रांचा 'पिता' असे केले. प्रियांनो, परमेश्वराची आपल्याकडून देखील अशी अपेक्षा आहे की आपणही अब्राहामप्रमाणे त्याच्यासमोर नम्रपणे चालावे, परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण करावी. आपण हे कायम लक्षात ठेवावे की आपण धुळीतून आलो आहोत, परमेश्वराने मातीपासूनच आपली निर्मिती केली आहे. आपण केवळ धूळ आणि माती आहोत. आणि त्या धुळीतूनच वर उचलले गेलो आहोत. आम्ही कधीच विसरू नये की त्याच्या कृपेच्या द्वारेच आमचे तारण झाले आहे. म्हणून आम्ही अब्राहामप्रमाणे सदैव नम्र आणि विश्वासयोग्य असावे.
*!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*
No comments:
Post a Comment