विषय : संधी आहे तोवरच देवाला ओळखा
संदर्भ : त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवांनी त्याला ओळखावे, म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद करतो..
( ईयोब ३७:७ )प्रस्तावना : -
मनुष्य परमेश्वराच्या हातची निर्मिती आहे. देवानेच मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचे असे बनवले आहे. तरीही वचनामध्ये असे का लिहिले आहे की, त्यांनी परमेश्वराला ओळखावे ? कारण आज मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याला विसरला आहे. आणि देवापासून दूर जाऊन अनेक वाईट गोष्टी करण्यास तो प्रवृत्त होत आहे. जर मनुष्याने देवाला ओळखले असते तर मनुष्य देवाप्रमाणे पवित्र राहिला असता.
"कारण प्रभू म्हणतो, मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असा." परंतु आज आपण जगामध्ये काय पाहात आहोत ? अनेक प्रकारच्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टींनी, अनेक प्रकारच्या पापांनी, वाईट वासनांनी हे जग भरून गेले आहे. खून, चोऱ्या, बलात्कार ( अगदी चिमूरड्या मुलीपासून तर वृध्द स्रीयांपर्यंत, आणि स्वतः बापसुद्धा आपल्याच स्वतःच्या मुलीवर बलात्कार करत आहे ), त्याचप्रमाणे अनेक तरूणींना वासनेपोटी जिवंत जाळून टाकले जात आहे. देवाची इच्छा आहे की,तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. ( १ थेस्सल ४:३) अजूनही खूप गोष्टी आहेत की ज्या देवाला न आवडणाऱ्या आहेत पण मनुष्य आज तेच करण्यात धन्यता मानीत आहे. देवाने मनुष्यांसाठी जसे आशीर्वाद ठेवलेले आहेत तसेच शापही ठेवलेले आहेत. चांगले वर्तन करणारांसाठी आशीर्वाद आणि वाईट वर्तन करणाऱ्यांसाठी शाप. देवाने मनुष्याला सुधारण्यासाठी खूप संधी दिल्या आहेत. परमेश्वर म्हणतो, "माझे सेवक जे संदेष्ट्ये त्यांना माझी वचने देऊन मी मोठ्या निकडीने त्यांच्याकडे पाठवत आलो तरी त्यांनी ती ऐकली नाहीत, आणि तुम्हीही ती ऐकत नाही." ( यिर्मया २९:१९)* पण मनुष्य देवाचे न ऐकता दिवसेंदिवस पापामध्ये अधिक गुरफटत चालला आहे आणि आता देवाच्या क्रोधास पात्र ठरला आहे. देवाने आमच्यासाठी खूप सहन केले आहे. पण आता देव आणखी किती दिवस सहन करील ? किती दिवस मनुष्याने सुधारण्याची वाट पाहील ? म्हणून देवाने आपला क्रोधाचा प्याला मनुष्यांवर ओतला आहे. त्याची शिक्षा म्हणून आज ही महामारी मनुष्याला ग्राशीत आहे. परमेश्वर म्हणतो, *"मी तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी त्यांची पाठ पुरवीन, सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन." ( यिर्मया २९:१८)
आणि वचनात सांगितल्याप्रमाणे आज खरोखरच सर्व मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद पडला आहे. सर्व सुखसाधने, पैसा, धनसंपत्ती, सुखविलासाच्या विपुल गोष्टी असून मनुष्य लाचार झाला आहे. आपल्याच सुंदर आणि मोठमोठ्या घरांमध्ये कैदी बनून राहिला आहे. आज कोणत्याच प्रकारचा आनंद, सुख, समाधान मनुष्याच्या जीवनात दिसून येत नाही.
प्रियांनो, अजूनही वेळ गेली नाही. खरोखरच हे प्रभूच्या दूसऱ्या आगमनाचे चिन्ह असू शकते. कारण प्रभूच्या दूसऱ्या आगमनसमयी घडणाऱ्या संदेष्ट्यांनी सांगितलेल्या घटनांविषयी पाहिले तर आपल्याला हे समजून येते. म्हणून आज समय आहे प्रभूच्या अधिक जवळ येण्याचा, अधिकाधिक प्रभूमध्ये, वचनामध्ये वाढण्याचा आणि प्रभूला शरण येऊन आपले पाप कबूल करून ते सोडून देऊन, संपूर्ण जीवन प्रभूला समर्पित करण्याचा. आम्ही प्रभूला शरण येऊन त्याला ओळखावे, त्याच्या समक्षतेमध्ये राहावे, त्याच्या आज्ञांचे पालन करावे हीच प्रभूची इच्छा आहे. आम्ही जर प्रभूच्या आज्ञेप्रमाणे वागलो तर अनेक आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील. आणि परमेश्वर सर्व वाईटापासून आमचा बचाव करील. स्तोत्रकर्ता म्हणतो, "कारण तो ( परमेश्वर ) पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील." ( स्तोत्र ९१:३) आज आपण जग आणि जगातील सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून प्रभूला संपूर्ण समर्पण केले पाहिजे. जगातील सर्व पापे, मोह यांना दूर करून, त्यावर विजय मिळवून प्रभूच्या जवळ येण्याची आज गरज आहे. पौल म्हणतो, "देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या." ( रोम १२:२)
!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!