Monday, 29 March 2021

परमेश्वराचा धन्यवाद कर



       *✨परमेश्वराचा धन्यवाद कर✨*


*हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर..✍🏼*

                     *( स्तोत्र १०३:१ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    आपण दाविद राजाच्या जीवनाविषयी पाहिले तर आम्हाला दिसून येते की, दाविद राजा प्रत्येक प्रसंगात परमेश्वराला धन्यवाद देत असे. तो प्रसंग दुःखाचा असो, संकटांचा असो किंवा आनंदाचा असो, तो आपल्या उद्धारकर्त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायचे कधीही विसरत नसे. वरील वचनामध्ये आपण वाचतो की, दाविद आपल्या स्वतःच्या जिवाला, आपल्या मनाला, अंतर्यामाला परमेश्वराला धन्यवाद देण्यास सांगत आहे. एकप्रकारे तो आपल्या शरीराला, मनाला परमेश्वराला धन्यवाद देण्याची आठवण करून देत आहे. आपणही दाविदाप्रमाणे स्वतःला देवाचा धन्यवाद करण्याची आठवण करून द्यावी. आणि हे धन्यवाद दाविदाप्रमाणेच अगदी मनापासून, अंतःकरणापासून दिलेले असावेत. परमेश्वराने आमच्या जीवनात अनेक महत्कृत्ये केलेली आहेत. त्याचे अनंत उपकार आम्हांवर आहेत. आम्ही त्याबद्दल त्याची स्तुती, स्तवन करून त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. देवाने आपल्यावर जे सर्व उपकार केले आहेत ते त्याने आमच्यावर असलेल्या त्याच्या दयेनेच केले आहेत. आपण त्याच्या उपकारांची सदैव आठवण करावी. त्याचे उपकार आम्ही कधीही विसरू नयेत.

    परंतु देवाने आमच्यावर इतके अगणित उपकार केले असूनही आम्ही कधी कधी देवाचे उपकार स्मरत नाही, विसरून जातो. बायबलमध्ये आपण वाचतो की, हिज्किया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातातून सोडविले. वचन सांगते, *परमेश्वराने हिज्कियास व यरूशलेमकरांस अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून वाचविले, आणि तो त्यांस सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला. ( २ इतिहास ३२:२२)* परंतु राजा हिज्किया याने परमेश्वराच्या उपकारांचे स्मरण ठेवले नाही आणि त्याचे हृदय उन्मत्त झाले. *पण हिज्कियाने आपल्यावर झालेल्या उपकाराची फेड केली नाही; त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे त्याजवर, यहूदावर व यरुशलेमेवर कोप झाला. ( २ इतिहास ३२:२५)* आम्ही परमेश्वराला विसरून जाऊ नये म्हणून ताकीद दिलेली आहे. वचन सांगते की, *सावध ऐस, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधि मी तुला आज सांगत आहे ते पाळावयाचे सोडून तूं आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील... तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून काढून आणिले त्याला तूं विसरू नये म्हणून सांभाळ. ( अनुवाद ८:११-१४)*

    स्तोत्रकर्ता म्हणत आहे की, *...त्याचे सर्व उपकार विसरू नको;* आपला देव आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करितो. योहान आपल्या पत्रात लिहितो, *जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. (१ योहान १:९)*

   तो आमचे सर्व रोग बरे करितो. पवित्र शास्त्रात आपण वाचतो की, *तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्यापूढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहां. ( मार्क १:४०)*

   तो आम्हाला मरणातून जीवनात पार नेणारा देव आहे. प्रभू येशू म्हणतो, *"मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. ( योहान ५:२४)*

    तो दया व करूणा ह्यांचा मुकुट घालितो. आपण जकातदाराच्या प्रार्थनेविषयी वाचतो, *जकातदार तर दूर उभा राहून स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला उर बडवीत म्हणाला, हे देवा मज पाप्यावर दया कर. ( लूक १८:१३)* आणि आपण पाहातो की त्याच्यावर दया करण्यात आली.

   तो तृप्त करणारा, नवीन शक्ती देणारा देव आहे. *तो भागलेल्यांस जोर देतो, निर्बलास विपूल बल देतो... तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ( यशया ४०:२९-३१)* प्रियांनो, परमेश्वर आमच्यासाठी खूप महत्कृत्ये करतो. आम्ही नेहमीच त्याचे ऋणी राहिले पाहिजे, त्याचे उपकार मानले पाहिजे, त्याला धन्यवाद दिले पाहिजे, त्याची स्तुती आणि स्तवन केले पाहिजे. आम्ही उन्मत्त होऊ नये तर सदैव लीन आणि नम्र असावे.


         

Wednesday, 17 March 2021

येशूच्या उजव्या हाती



          *✨येशूच्या उजव्या हाती✨*


*तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविला गेला आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा..✍🏼*

                     *( कलस्सै ३:१ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


      ख्रिस्त जेथे राहतो तेथेच एका ख्रिस्ती व्यक्तीचे घर असावे. आपले ध्येय आणि आग्रह एकच असावा, तो हा की जेव्हा आपला येशू गौरवात प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्या बरोबर असावे. ह्या पृथ्वीवरील आपले जीवन क्षणिक आहे. आपले हृदय स्वर्गीय गोष्टींवर असल्यामुळे ह्या पृथ्वीवरील गोष्टी विस्मृती आहेत. आपले नागरीकत्व स्वर्गात आहे. आपण ह्या पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत. म्हणून आपली इच्छा, आग्रह सर्व स्वर्गीय गोष्टींविषयी असला पाहिजे.


*"देवाच्या उजव्या हाती असलेल्या गोष्टी मिळविण्याचा यत्न करा."* असे प्रेषित म्हणतो. देवाच्या उजव्या हाती आपल्याला पुष्कळ आशिर्वाद आहेत. ह्या गोष्टी मिळविण्याचा यत्न केला तरच त्याच्या आगमनासाठी तयार होऊ शकतो. *जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.  (स्तोत्र १६:११)* देवाच्या उजव्या हाती असलेला सुखाचा अनुभव आपण प्राप्त करावा म्हणून ह्या जगात वेगवेगळ्या मार्गाने तो आपल्याला चालवितो. आपण ह्या सुखाकडे दुर्लक्ष केले तर सैतान ह्या जगाच्या सुखाकडे आपले लक्ष वेधून घेतो. म्हणून आपण प्रार्थना मध्ये जागृत असले पाहिजे. आपले पूर्ण ध्येय म्हणजे स्वर्गात प्रवेश हेच असायला हवे.


*"देव त्याच्या उजव्या हाताने सावरतो."*"तू भिऊ नको. कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे साहाय्य करितो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो.'' (यशया ४१:१०) हे दवाचे अभिवचन आहे. आपण देवाची धार्मिकता शोधली पाहिजे. आपण त्याजवर विश्वास करून भरवसा ठेवताना त्याची धार्मिकता प्राप्त करतो. "नीतिमान विश्वासाने जगेल." आपले नीतिमत्त्व मलिन चिंधीसारखे आहे. देवानेच आपल्याला नीतिमान ठरवावे व धार्मिक बनवावे. आपल्यामध्ये स्व:धार्मिकता नसावी.


*"देवाच्या उजव्या हाती पूर्ण विसावा आहे."* माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. (स्तोत्र ११०:१) त्याच्या अभिवचनांवर विश्वास केल्याने विसावा मिळतो . अविश्वास व शंका बेचैन करते. आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रत्येक पावलांवर आपल्याला विसावा मिळतो. आपल्या आध्यात्मिक जीवनात वेगवेगळ्या अनुभवातून जात असताना त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला तर विसावा मिळतो. इस्त्राएली लोक अभिवचनांच्या देशात नाहीत तर विसाव्यात प्रवेश करू शकले. कारण त्यांनी देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला.


आपल्यासाठीही सियोन, यरूशलेम अभिवचनांचा देश तयार होत आहे. देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवत ध्येयाकडे पाहत आपण धावू या.


*"पित्याच्या उजव्या हाती बसून देव आपल्यासाठी विनवणी करितो."* दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे. जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे. (रोम ८:३४) रात्रंदिवस सैतान देवासमोर आपल्यावर दोषारोप करतो. पण आपला येशू एक दयाळू व विश्वसनीय महायाजक होऊन आपल्याविषयी देवासमोर मध्यस्थी करतो. आपणही दुसऱ्यांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. जे संकटात आहेत, पापांत आहेत, परीक्षात आहेत आजाराने पिडीत आहेत अशांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. सैतानासारखे दुसऱ्यांवर दोष लावू नये.


*"देवाचा उजवा हात आपल्याला जय देतो."*  परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधिला आहे. (स्तोत्र १८:१) देवाचा उजवा हात सामर्थ्याशाली व गौरवी आहे. देवाचा उजवा हात शत्रूचा चुराडा करीतो. म्हणून आपल्याला पाप, आजार, जगीकपणा, सैतान, जगाचे क्षणीक सुखविलास, मरण व अधोलोकांवर जय आहे. एक विजयी जीवन जगण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. त्याच्याबरोबर गौरवात प्रकट होण्यासाठी आपण पुसंताना बरोबर भागी असले पाहिजे. विजयी संत उचलले जातील. आपण वरील गोष्टींवर मन लावून त्या गौरवी दिवसात प्रगट होऊ या. आपल्या प्रभू येशूची पवित्र वधू बनू या!


        

Friday, 12 March 2021

धूळीचे गौरव



               *✨धूळीचे गौरव✨*


*"मी तुला धुळीतून वर काढून माझ्या इस्राएल लोकांचा अधिपती केले आहे, तरी ... तू माझ्या इस्राएल लोकांकडून पाप करवले आहेस, व त्यांनी आपल्या पातकांनी मला संतप्त केले आहे..✍🏼*

                  *( १ राजे १६:१ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    अहीयाचा पुत्र बाशा तिरसा येथे इस्राएलावर राज्य करू लागला तेव्हा त्याने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. त्याने यराबामाचे अनुकरण केले. त्याने केवळ स्वतःच पाप केले असे नाही तर त्याने सर्व इस्राएल लोकांकडूनही पाप करवले. म्हणून परमेश्वर हनानीचा पुत्र येहू ह्याच्याद्वारे बाशाला वरील वचनाद्वारे इशारा देत आहे. बाशा हा हे विसरला होता की परमेश्वराने त्याला धुळीतून वर काढले होते. त्याचा कृतघ्नपणा, अपकारक वृत्ती त्याला गर्वाकडे घेऊन गेली आणि त्याला प्राप्त झालेल्या उच्च स्थानाच्या गर्व व दर्जा यामुळे तो बेकायदेशीररित्या घृणास्पद गोष्टी करू लागला. तो मूर्तिपूजेकडे वळून ज्या मार्गाने यराबाम गेला त्या मार्गाने तो जाऊ लागला. आणि त्याने इस्राएल लोकांकडूनही पाप करवले. ह्याचा परिणाम असा झाला की, परमेश्वर म्हणाला, *"तर पाहा, "बाशा आणि त्याचे घराणे यांचा मी अगदी नायनाट करीन;"*

     प्रियांनो, मनुष्य जेव्हा उच्च पदावर पोहोचतो तेव्हा आपल्या दैन्यावस्थेतून कसा वर उचलला गेला हे तो विसरतो आणि आपले अंतःकरण दूसऱ्या गोष्टींकडे वळवतो ज्या देवाला आवडणाऱ्या नाहीत. आणि अशा गोष्टींच्या मोहामध्ये तो सापडतो. आपण जरी खूप चांगल्या कुटूंबातून आलो असलो, खूप उच्च पद प्राप्त केले असेल, आम्ही आमच्या जीवनात खूप धनसंपत्ती मिळवली असेल तरी आपण कायम लक्षात ठेवावे की आपण धुळीतून वर काढले गेलेलो आहोत. आपण जेव्हा आपल्या आत्मिक जीवनात वाढत जातो तेव्हा आपण गतकाळात कशा पापी अवस्थेत होतो, अज्ञानी अवस्थेत होतो हे विसरतो आणि स्वतःला खूप मोठे ज्ञानी, संत समजायला लागतो आणि दुसऱ्यांना तुच्छ समजायला लागतो. आमच्या मध्ये असलेला आत्मिक अहंकार डोके वर काढतो आणि आपली पूर्वीची अवस्था विसरून आपण दूसऱ्यांना कमी लेखतो, त्यांचा धिक्कार करतो. आम्ही हे विसरतो की हे सर्व आम्हाला देवाच्या कृपेनेच प्राप्त झाले आहे.

   यशया इस्राएल लोकांना म्हणतो, *"तुम्ही जे नीतिमत्तेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका, ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढिले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढिले त्याकडे लक्ष द्या." ( यशया ५१:१)* खास्दे मोठ्या अन्य जातींच्या, राष्ट्राच्या पर्वतासारखे होते आणि इस्राएल त्यातून छेदलेला परमेश्वराच्या करूणेमुळे 'पारखलेला' दगड होता. यहूदी लोक अतिशय गर्वाने स्वतःस कोणाचे गुलाम किंवा नोकर नाही तर अब्राहामाचे 'बीज', संतती समजत होते परंतु अब्राहाम कसा पूढे आला हे ते लक्षात घेत नाहीत. तो एक छोटासा दगड होता जो परमेश्वराद्वारे मोठा पर्वत झाला. कशामुळे ? अब्राहाम विश्वासयोग्य व धार्मिक होता. तो आयुष्यभर परमेश्वरापूढे नम्र होऊन वागला. आणि त्याचे फळ म्हणून परमेश्वराने त्याला अनेक राष्ट्रांचा 'पिता' असे केले. प्रियांनो, परमेश्वराची आपल्याकडून देखील अशी अपेक्षा आहे की आपणही अब्राहामप्रमाणे त्याच्यासमोर नम्रपणे चालावे, परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण करावी. आपण हे कायम लक्षात ठेवावे की आपण धुळीतून आलो आहोत, परमेश्वराने मातीपासूनच आपली निर्मिती केली आहे. आपण केवळ धूळ आणि माती आहोत. आणि त्या धुळीतूनच वर उचलले गेलो आहोत. आम्ही कधीच विसरू नये की त्याच्या कृपेच्या द्वारेच आमचे तारण झाले आहे. म्हणून आम्ही अब्राहामप्रमाणे सदैव नम्र आणि विश्वासयोग्य असावे.


         *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*


     

Saturday, 6 March 2021

सुवार्ता गाजवा



               *✨सुवार्ता गाजवा✨*


*ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना सोडव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे, त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर..✍🏼*

                     *( नीति २४:११ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    वरील वचनांतून राजा शलमोन आम्हाला बोध करत आहे. आणि त्याद्वारे परमेश्वराची इच्छा तो आम्हाला सांगत आहे. खरोखरच कुणाला ठार मारण्यासाठी किंवा वध करण्यासाठी धरून नेत आहेत काय ? नाही, तर सैतान अनेकांना आत्मिक दृष्ट्या ठार मारण्यासाठी धरून नेत आहे ह्याचे ते दर्शक आहे. तो क्रुरकर्मा अनेक आत्म्यांना ठार मारीत आहे, त्यांचा नाश करीत आहे. ह्या वचनाद्वारे परमेश्वरच आमच्याशी बोलत आहे, आमचा उद्धारकर्ता आम्हाला सांगत आहे की त्यांना सोडव, सैतानाच्या हातातून त्यांना सोडव. ज्यांच्या वधाची तयारी त्या दुष्टाने केलेली आहे त्यांचा बचाव कर, त्यासाठी साधेल तितका प्रयत्न कर. परंतु तू त्यांना गाठ! ज्याप्रमाणे देवाने त्याच्या आत्म्याद्वारे फिलिप्पाला त्या हबशी षंढाकडे पाठवले होते. आपण वाचतो की, *तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, "जा, त्याचा रथ गाठ !"* ह्यासाठी की देवाची सुवार्ता त्याच्यापर्यंत पोहोचवावी आणि सुवार्तेद्वारे त्याचा बचाव व्हावा. त्याप्रमाणेच देवाने आम्हाला देखील मत्तय २८:१९,२० मध्ये सांगितले आहे की, *जाऊन सर्व राष्ट्रांना सुवार्तेची घोषणा करा.* त्याच्या आज्ञेनुसार आज आम्हाला अशा देवापासून दूर असलेल्या आत्म्यांना गाठायचे आहे ह्यासाठी की एकही व्यक्ती सुवार्तेला मुकू नये. एकही व्यक्ती सुवार्तेपासून वंचित राहू नये म्हणजेच देवापासून दूर राहू नये. 

     परमेश्वराची इच्छा आहे की, कोणाचाही नाश होऊ नये, एकाही आत्म्याचा नाश होऊ नये. आणि म्हणूनच होईल तितक्या लोकांना आम्ही सुवार्ता सांगून त्यांना प्रभूकडे आणले पाहिजे. आम्ही जर अशा देवापासून दूर असलेल्यांना गाठले नाही, त्यांना सुवार्ता सांगितली नाही तर आम्ही आमच्या थोर, महान देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले असे होईल. आणि आमच्यावर अनर्थ ओढवेल. आमच्या अशा कृत्याची शिक्षा आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. शलमोन राजा म्हणत आहे की, *"आम्हांस हे ठाऊक नव्हते" असे म्हणशील तर हृदये तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय? तुझा जीव राखणाऱ्याला माहीत नाही काय? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय? ( नीति २४:१२)* निश्चितच प्रभू प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देतो. आमचे प्रतिफळ जीवनी मुकुट आहे. पतन पावणाऱ्या लोकांना नाश होण्यापासून वाचविले तर निश्चितच प्रभू तो मुकुट आम्हाला देईल.  

    प्रियांनो, आज आम्ही आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आजपर्यंत किती आत्म्यांना ठार मारण्यापासून, त्यांचा वध होण्यापासून, त्यांचा नाश, पतन होण्यापासून आम्ही वाचवले आहे? किती आत्मे देवाच्या राज्यासाठी आम्ही जिंकले आहेत? आम्ही किती लोकांना सुवार्ता सांगून देवाकडे येण्यासाठी प्रवृत्त केले आहे? माझा विश्वास आहे की, आम्ही जी देवाची लेकरे आहोत, त्या सर्वांनी देवाच्या आज्ञेचे पालन निश्चितच केले असणार आणि अनेक आत्मे देवाच्या राज्यात घेऊन आले असणार. तरीही प्रियांनो, जर अजूनही आम्ही देवाचे कार्य करण्यात कमी पडलो असलो तर आज, आता संधी आहे. आणि संधी आहे तोवरच आम्ही आजपासूनच देवाच्या कार्याला सुरूवात केली पाहिजे जेणेकरून आम्ही आमच्या देवाने जो आमच्यासाठी राखून ठेवला आहे तो जीवनी मुकुट प्राप्त करू शकू. अन्यथा ज्या लोकांचा सुवार्तेअभावी नाश होईल त्यांच्याबद्दल परमेश्वर आम्हाला दोष लावील, आमची झाडा झडती घेतल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणून आज संधी आहे तोवरच आम्ही आमच्या देवाच्या आज्ञेचे पालन करून देवाच्या राज्याची घोषणा करून प्रत्येक व्यक्तीला देवाच्या राज्यात आणूया. 


         *

Tuesday, 2 March 2021

मुळे खोलवर रूजू द्या



          *✨मुळे खोलवर रूजू द्या✨*


*आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले; व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले..✍🏼*

                     *( मार्क ४:६ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


    प्रभूने सांगितलेल्या या पेरणाऱ्याच्या दाखल्यामधून आम्हाला संदेश देणे आणि वचनाचा स्वीकार करणे याबाबतचे एक तत्व पाहायला मिळते. पेरणारा पेरत असताना काही बी वाटेवर पडले, काही खडकाळीवर पडले, काही काट्यांमध्ये पडले आणि काही चांगल्या जमिनीत पडले. हे आम्हाला मानवाच्या वचन स्वीकारण्याच्या चार पद्धती दर्शविते. यातील खडकाळीवर पडलेले माती कमी असल्यामुळे जरी लगेच अंकुरले तरी त्याला मूळ नसल्यामुळे ते सूर्य वर येताच सुकून जाते. मूळ काय आहे ? जमिनीखाली होणारी ती वाढ आहे. आणि पाने म्हणजे जमिनीच्या वर होणारी वाढ आहे. म्हणजे मूळ हे झाकलेले जीवन आहे तर पाने हे उघड केलेले जीवन आहे. अनेक ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत उघड जीवन पुष्कळ आहे, गुप्त जीवन थोडे आहे. जर आमचे सर्व सद्गुण मनुष्यासमोर उघड झालेले आहेत, आमचे सर्व अनुभव उघड झालेले आहेत तर आमची सगळी वाढ वरच्या दिशेने आहे म्हणजेच मुळ नसलेले असे आहे. बऱ्याच लोकांना सवय असते की त्यांच्या जीवनात थोडासा जरी अनुभव आला तर ते लगेच स्वतःच्या नावाचा डंका पिटतात, त्यात प्रभूला दुय्यम स्थान असते. मी प्रार्थना केली आणि तसे घडून आले असा स्वतःचाच बडेजाव त्यामध्ये असतो. देवाविषयीची साक्ष कमी, स्वतःविषयीचा गौरव जास्त असतो. करिंथकरांस लिहितांना पौल म्हणतो, *"प्रौढी मिरविणे मला भाग पडते; तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टांत व प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो." ( २ करिंथ १२:१)*

    पौलाने त्याला झालेली सर्व प्रकटीकरणे उघड केली का ? तर बिलकूल नाही. त्याने स्वतःचे नावही घेणे योग्य समजला नाही. तो म्हणतो, *"ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य ( जो तो स्वतःच आहे) मला माहीत आहे, त्याला चौदा वर्षांमागे तिसऱ्या स्वर्गात उचलून नेण्यांत आले होते.. त्या माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली." ( २ करिंथ १२:२-४)* म्हणजेच चौदा वर्षांपर्यंत त्याने हा अनुभव उघड केला नाही. पौलाची मुळे जमिनीखाली खोलवर होती. जर आम्हाला पौलाचे कार्य हवे असेल तर पौलाचे मुळसुद्धा आम्हाला लाभण्याची आवश्यकता आहे. जर आम्हाला पौलासारखे सामर्थ्याचे प्रकट होणे हवे असेल तर आमच्याकडे पौलाचा गुप्त अनुभव देखील असायला हवा. 

     जर आम्ही वरवरच्या जगण्याविषयी विचार केला तर हिज्किया राजाचे मोठे उदाहरण आपण पाहातो. त्याच्या आजारपणाची आणि देवाने कसे अद्भूत रितीने त्याला वाचविले त्याची बातमी बाबेलच्या दरबारात पोहोचली आणि हिज्कियाकरिता भेटवस्तू घेऊन आलेल्यांस त्याने आपल्या मोलवान वस्तूंचे भांडार, रुपे व सोने, सुगंधी पदार्थ व मोलवान तेल व आपले सर्व शस्त्रागार, व आपल्या भांडारात जे काही आढळले ते दाखवले. सर्व काही दाखवण्याच्या मोहावर तो विजय मिळवू शकला नाही. वास्तविक पाहता हिज्किया देवाची कृपा प्राप्त करणारा होता, परंतु कृपेच्या कसोटीमध्ये टिकून राहणे त्याला जमले नाही. नुकताच तो अद्भूत रितीने बरा झाला होता आणि आपण कोणीतरी विशेष आहोत असे त्याला वाटत होते आणि त्या उत्साहाच्या भरात त्याची सर्व मुळे उघडी पडली होती. या प्रदर्शनामुळे यशया त्याला म्हणाला, *"सैन्याच्या यहोवाचे वचन ऐक; पाहा, असे दिवस येत आहेत की जे काही तुझ्या घरात आहे व जे तुझ्या वडिलांनी आजपर्यंत साठवले आहे ते सर्व बाबेलास नेण्यात येईल, काहीच राहणार नाही, असे यहोवा म्हणतो." ( यशया ३९:५,६)* 

    प्रियांनो, आम्ही देवाने आमच्या जीवनात केलेल्या कार्याची साक्ष देणे चुकीचे नाही, परंतु आम्ही त्याचे श्रेय स्वतःला घेणे, प्रभूला दुय्यम स्थान देणे हे मात्र पूर्णतः चुकीचे आहे. अनेक साक्षी या देवाच्या गौरवासाठी नसतात, तर जे त्या सांगतात त्यांच्या स्वतःच्या विश्वासाच्या गौरवासाठी असतात. जे त्यांची मुळे झाकतात त्यांना देव झाकतो पण जे आपली मुळे उघड करतात ते देवाच्या संरक्षणाला अंतरतात. आम्ही आमच्या स्वतःला खोलवर वाढवत असता, रुजवत असता आणि खालच्या बाजूने मूळ धरत असता हे सदैव लक्षात ठेवावे. 


         *