Tuesday, 6 October 2020

तुमच्या हृदयात ख्रिस्ताला घरात असल्यासारखे वाटते का?



          तुमच्या हृदयात ख्रिस्ताला घरात           असल्यासारखे वाटते का?
      इफिस.३ः१४-१६


अंतःकरणात वास्तव्य करणार्‍या ख्रिस्ताशी असलेल्या नातेसंबंधाचा उल्लेख करताना पौल म्हणतो, ‘‘मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो’’ (गलती.२ः२०). पौलाने इफिसकरांसाठी जशी प्रार्थना केली तशी तो प्रार्थना करतो की, तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर ख्रिस्ताने विराजमान होऊन राहावे यासाठी की, त्याला पाहुण्यासारखे नाही, तर घरच्यासारखे वाटावे. आपल्या जीवनात त्याला इतके घरच्यासारखे वाटावे की तो खर्‍या अर्थाने आपल्या जीवनाचा प्रभू असावा. त्याला तारणारा म्हणून स्वीकारल्यावर तो आपल्यामध्ये सदासर्वकाळासाठी राहण्यास आला, पण आता गरज ही आहे की, आपण त्याला प्रत्येक गोष्टीत प्रथमस्थान दिले पाहिजे, यासाठी की त्याला आपल्यात घरच्यासारखे वाटेल. जेव्हा आपण या स्थितीपर्यंत पोचतो तेव्हा आपली इच्छादेखील पौलाप्रमाणे होते, जेव्हा तो म्हणतो, ‘‘हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी’’ (फिलिप्पै.३ः१०).


लक्षात घ्या, ख्रिस्ताचे वस्तीस्थान हे तुमच्या हृदयात आहे (इफिस.३ः१८). ख्रिस्त अंतर्यामी असलेल्या मनुष्यात राहतो व ज्या व्यक्तीमध्ये तो राहतो तिच्यावर तो प्रभुत्व करू इच्छितो. अर्थात ख्रिस्त, ज्याने त्याला तारणारा म्हणून स्वीकारले आहे त्या प्रत्येकात राहतो, याचा अर्थ असा होत नाही की, त्या व्यक्तीच्या जीवनावर त्याला प्रभुत्व आहे.

ख्रिस्ताला आपल्या जीवनावर नियंत्रण करू देण्यासाठी आपण आपले स्वत्व सोडले पाहिजे - म्हणजेच स्वतःऐवजी ख्रिस्ताला संतोषविण्याची इच्छा बाळगली पाहिजे. त्याचा अर्थ असा की, जेव्हा आपल्या इच्छा त्याच्या इच्छेविरुद्ध असतात तेव्हा आपण आपल्या इच्छांना ‘नाही’ म्हटले पाहिजे. त्याच्या अधीन झाल्याने व विश्वासाने त्याच्यावर अवलंबून राहिल्याने आपल्या जीवनात आपल्याला विजय मिळेल. जेव्हा आपल्या इच्छा त्याच्या इच्छेच्या विरुद्ध असतात, तेव्हा स्वत्वाचा नाकार करण्याचे महत्त्व कमी लेखू नका. येशू म्हणाला, ‘‘जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवास मुकेल तो त्याला वाचवील’’ (लूक.९ः२३-२४).


_पाहा, मी दाराशी उभा आहे व ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील (प्रकटी.३ः२०)._



विश्वासू राहा

                        ✨विश्वासू राहा✨


मी तुम्हांस सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल..

                   ( लूक १९:२६ )


                          


          प्रभू येशू ख्रिस्त व त्याचे शिष्य यरूशलेमेजवळ आले होते आणि आता तेथे तो रोमी साम्राज्याविरूद्ध बंड पुकारून युद्ध करील व सर्व यहूदी लोकांना मुक्त करील. आणि त्याचे राज्य प्रस्थापित होईल असे शिष्यांना वाटत होते आणि या नवीन राज्यात आपल्याला कोणती पदे मिळतील यावरून शिष्यांमध्ये कुरकुर चालू होती. त्यांची ही कुरकुर बंद होऊन त्यांची ही वृत्ती सुधारावी आणि ख्रिस्ताला नाकारले जाऊन त्याला वधस्तंभावर खिळण्यात येऊन तो आता येथून पूढे काही काळासाठी त्यांच्याबरोबर नसणार, तेव्हा त्याच्या शिष्यांनी तो येईपर्यंत विश्वासाने सेवा करीत राहावे हे त्यांना समजून सांगणे हा या दृष्टांताचा उद्देश आहे. देवाने आपल्याला जी कृपादाने दिली आहेत व जे काही दिले आहे त्यांचा उपयोग विश्वासूपणे त्याच्या सेवेसाठी करायचा आहे. कारण प्रत्येक विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आपला हिशोब द्यावा लागेल. पौल म्हणतो, *आपणां सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. ( २ रे करिंथ ५:१०)* आपण देवाने दिलेल्या कृपादानांचा उपयोग योग्य रितीने करीत आहोत काय ? जो लहानशा गोष्टीत विश्वासू राहतो तो असे करील. ज्याने मिळालेल्या मोहरेचा उपयोग केला नाही त्याने, उलट, आपल्या धन्याला दोष दिला, त्याच्यावर आरोप ठेवला की तुम्ही फार अन्यायी आहात. त्याने ती मोहर पेढीवर ठेवली असती तर व्याजही मिळाले असते आणि मोहरही सुरक्षित राहिली असती. या दासाचे हे वागणे दुष्टपणाचे होते. त्याला धन्याची सेवा करायची नव्हती. तो निरूपयोगी दास ठरला. धन्याच्या विरूद्ध बोलण्यात त्याने दिवस घालवले. आपली जबाबदारी ओळखली नाही. त्यामुळे धन्याने त्याच्याजवळची मोहर काढून घेऊन ती, जो तिचा विश्वासूपणे उपयोग करील त्याला दिली. 


     या दाखल्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताने एक खूप महत्वाचे सत्य आम्हाला शिकविले आहे. ते म्हणजे प्रभूची सेवा प्रत्येक विश्वासणाऱ्याला करायची आहे. प्रत्येकाला देवाने वेगवेगळी कृपादाने दिली आहेत. त्या दानांचा उपयोग चांगल्या प्रकारे केला पाहिजे. प्रियांनो, प्रत्येकाने आपल्याला प्रभूसाठी काय करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. प्रभूने आपण सेवा करावी म्हणून आपल्याला सामर्थ्य दिले आहे. आपण जर काही न करता गप्प बसून राहिलो तर प्रभूने दिलेली सेवेची संधी गमावून बसू आणि त्या निरूपयोगी दासाप्रमाणे देवाच्या राज्यासाठी निरूपयोगी ठरू, अपात्र ठरू. पेत्र म्हणतो, *प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. ( १ ले पेत्र ४:१०)* कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे दूसरे आगमन होईल तेव्हा तो प्रत्येकाला त्याने केलेल्या कामानुसार मोबदला देईल. *बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजूरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. ( १ ले करिंथ ३:१३- १५)* याकरिता आम्ही ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आम्हाला एक दिवस उभे राहायचे आहे हे समजून घेऊन त्याच्या सेवेमध्ये कसूर न करता विश्वासूपणे त्याची सेवा करावी. जेणेकरून तो येईल तेव्हा आम्हालाही म्हणेन, *"शाबास, भल्या दासा, तूं लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास." ( लूक १९:१७)*


जे आध्यात्मिक सेवेच्या संधीचा सदुपयोग करतील त्यांना अधिक सेवा करण्याची संधी मिळेल.


          

Monday, 5 October 2020

येशूची वाणी ऐका


 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात..
                     ( योहान १०:२७ )


            प्रभू येशूने आपल्याला या वचनातून खूप छान बोध केला आहे. तो स्पष्ट म्हणत आहे की *"माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात!"* प्रभू येशूची इच्छा आहे की आपण त्याची वाणी म्हणजेच परमेश्वराचा आवाज ऐकावा. देवाने आपल्यावर सर्वात जास्त प्रीति केली आहे. संपूर्ण जगासाठी त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखून न ठेवता तुमच्या माझ्यासाठी दिले, यासाठी की त्याच्या द्वारे तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवन प्राप्त करावे. म्हणुन आपण प्रत्येकाने प्रभू येशूचा आवाज ऐकणे गरजेचे आहे. त्याचे वचन आचरणात आणणे गरजेचे आहे. जो कोणी येशू वर विश्वास करतो तोच येशूला ओळखू शकतो. येशूच्या पवित्र रक्ताने तुम्ही आणि मी पापापासून मुक्त झालो आहोत. जुन्या करारात इस्रायल लोकांनी आपली मने कठीण केली, त्यांनी परमेश्वराच्या वाणी कडे लक्ष दिले नाही. निर्गमच्या पुस्तकात आपण पाहातो की, इस्राएल लोक कशाप्रकारे फारोच्या, मिसरी लोकांच्या दास्यात होते. कारण त्यांनी देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष केले होते. किंबहुना असे म्हणणे जास्त सयुक्तिक राहिल की त्यांनी देवाच्या आवाजाविरूध्द बंड केले होते. यिर्मया संदेष्ट्याने मिसर देशाची तुलना धगधगत्या लोखंडी भट्टीबरोबर केली आहे. परमेश्वर म्हणतो की, *"ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांस मिसर देशातून, लोखंडी भट्टीतून बाहेर काढले, त्या दिवशी मी हा करार त्यांस आज्ञापिला व म्हटले, " माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन." ( यिर्मया ११:४)* परमेश्वराचा मुख्य उद्देश हा होता की, इस्राएल लोकांना फारोच्या तावडीतून सोडवणे व त्यांना देवाची मुले बनविणे. ते देवाची वाणी ऐकून आज्ञापालन करतील  तर आशीर्वादित होतील असे परमेश्वर त्यांना सांगत आहे. परंतु त्यांनी देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. अन्य दैवतांच्या नादी लागले.


    देवाचे वचन माहित असणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्यापेक्षा महत्वाचे हे आहे की, आपल्याला ऐकणारे कान आणि आज्ञापालन करणारे जीवन किंवा मन असावे. म्हणजेच आम्ही केवळ ऐकणारे नसावे तर कृती करणारे, देवाच्या आज्ञांचे पालन करणारे असावे. शौलाच्या जीवनात आपण पाहातो की, परमेश्वर म्हणाला, "सर्व अमालेकी लोकांचा संहार कर. त्यांचा पूर्णपणे नाश कर." परंतु शौलाने देवाने जे सांगितले तसे न करता स्वतःच्या मनाप्रमाणे केले. त्याने देवाच्या वाणीशी समझोता केला. त्याचा परिणाम असा झाला की, तो परमेश्वराला अनुसरला नाही व राजा बनण्यास पात्र राहिला नाही. परिणामी त्याच्या हातातून राज्य, राजेपद काढून घेण्यात आले. देवाची वाणी ऐकणे व त्याप्रमाणे करणे हे खूप महत्वाचे आहे. खरी मेंढरे देवाची वाणी ऐकतात. आपण यिर्मयाची साक्ष पाहातो, यिर्मया म्हणतो, *"मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली, तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्लास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणांस तुझा म्हणवितो." ( यिर्मया १५:१६)*


     परमेश्वर म्हणतो, *"त्याला त्याची मेंढरे ठाऊक आहेत."* देवाला त्याची मेंढरे (म्हणजेच आम्ही विश्वासणारे, निवडलेले ) माहीत असणे किंवा तो त्यांना ओळखत असणे ही किती छान गोष्ट आहे ! परंतु खेदाची गोष्ट आहे की देवाला आम्ही माहीत आहोत पण अनेकांना देवाबद्दल माहीती नाही. अशा लोकांबद्दल परमेश्वर म्हणतो की, *"त्या दिवशी पुष्कळ लोक मला येऊन म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय ? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार  करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा." ( मत्तय ७:२२,२३)* म्हणून आम्ही अनाचारापासून दूर राहावे आणि सात्विक जीवन जगावे. प्रभू म्हणतो, *"जर कोणी माझ्यामागे येऊ पाहातो त्याने आत्मत्याग करावा व स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे."* हा वधस्तंभ कशाला दर्शवितो ? हा वधस्तंभ म्हणजे काय ? हा वधस्तंभ म्हणजे छळ, व्यंगत्व, भूक, एकटेपणा, त्रास, किंवा मृत्यू इत्यादि. ख्रिस्ती जीवन जगत असताना अशा अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते. वचन सांगते, *"तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हांपैकी कित्येकांस तुरूंगात टाकणार आहे." ( प्रकटी २:१०)* म्हणून प्रभू म्हणत आहे की, *"शेवटपर्यंत म्हणजे मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन."* म्हणून आपण देवाची वाणी ऐकून त्याची इच्छा पूर्ण करावी. त्याचे विश्वासू दास बनण्यासाठी आणि मुकुट मिळविण्यासाठी त्याच्या आज्ञेचे पालन करून त्याच्या मार्गाने चालावे.


         


    

परमेश्वर चांगला आहे

           ✨परमेश्वर चांगला आहे✨


 "देव इस्त्राएलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे"..✍🏼
                     ( स्तोत्र ७३:१ )


      खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. "खरोखर" या शब्दाद्वारे ज्यांना देवाविषयी संशय आहे, अशा लोकांसाठी देवाबद्दल खात्री देणारा असा हा शब्द आहे. जेव्हा देवाचे लोक परमेश्वराच्या चांगुलपणाविषयीचे हे सत्य जाणून घेतात तेव्हा ते प्रत्येक क्षणाला, प्रत्येक परिस्थितीत देवाची स्तुती करतात, प्रार्थना करतात आणि देवाच्या चांगुलपणाचा अनुभव रोज आणि रोज घेतात. जन्म दिवस असो की मृत्यू दिवस, उत्सवाचे दिवस असो किंवा जीवनाच्या अखेरचा म्हणजेच अंत्ययात्रेचा दिवस, भरभराटीचे दिवस असो किंवा गरीबीचे दिवस, आजारपणाचे दिवस असो किंवा निरोगीपणाचे, सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर चांगलाच असतो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे.. ती म्हणजे हृदय, अंतःकरण शुद्ध ठेवणे, वृत्ती समाधानी ठेवणे. प्रत्येक प्रसंगी आनंद करायचा आहे, मग ते दुःख असो की सुख. स्तोत्रकर्ता म्हणतो, *"परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य !" ( स्तोत्र ३४:८)*


     खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत अशा सर्वांसाठी. आपण पाहातो, राजा दाविद, जो परमेश्वरावर प्रीति करत होता, त्याच्या बरोबर चालत होता, परंतु तो सुद्धा एकेदिवशी मोहात पडून  पाप करून बसला आणि  आपल्या अंतःकरणाचे पावित्र्य गमावून बसला. आपल्या तारणाचा आनंद गमावून बसला. तो म्हणतो, *"मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली; कारण.. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे." ( स्तोत्र ३२:३,४)* त्याने प्रायश्चित्त केले, आपले पाप कबूल केले आणि तो आक्रंदन करून देवाला म्हणत आहे, *"हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल." ( स्तोत्र ५१:१०)* जेव्हा हृदय शुद्ध असते तेव्हा आत्मा स्थिर असतो. आमचे अंतःकरण जर वाईट असेल तर परमेश्वराने केलेली चांगली गोष्ट सुद्धा आम्हाला वाईटच दिसेल. याउलट आमचे अंतःकरण शुद्ध असते तेव्हा दूसऱ्यांनी केलेली एखादी वाईट गोष्ट सुद्धा आमच्या भल्यासाठी चांगली होऊन बदलेल. जसे योसेफच्या जीवनात घडलेले आम्ही पाहातो. योसेफला त्याच्या भावांनी द्वेषाने खाड्यांत टाकले, विकून टाकले, परंतु तेच त्याच्या भरभराटीचे कारण ठरले. त्याच्यासाठी कल्याणकारी ठरले. तो म्हणतो, *"तुम्ही माझे वाईट योजिले; पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते." ( उत्पत्ती ५०:२०)* म्हणून प्रियांनो, आम्ही देवाचा चांगुलपणा ओळखून आमचे अंतःकरण शुद्ध ठेवले तर प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आमच्यासाठी परीक्षेचा न ठरता आनंदाचा ठरेल. त्यासाठी आम्ही स्वतःला ज्या दुःखाच्या परिस्थितीत डांबून ठेवले आहे त्यातून बाहेर पडून शुद्ध जीवन जगण्यासाठी स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित केले पाहिजे. 


         

                        


     



Saturday, 3 October 2020

स्वतंत्र जन्मलेला



                     स्वतंत्र जन्मलेला
                     गलती.४:१९-३१


गलती.४:१९-३१ मध्ये देवाने आपणांस हा धडा दिला आहे की, आपण मानवी प्रयत्नांनी त्याच्या आज्ञांचे पालन कधीच करू शकत नाही. केवळ येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारल्यानेच त्यांचे पालन होऊ शकते. मग आपल्यामध्ये वास करणार्‍या पवित्र आत्म्याद्वारे येशू ख्रिस्ताचे जीवन आपल्यामध्ये परिपूर्ण होते. इश्माएलचा जन्म ही केवळ मानवी योजना होती. त्यात देवाला काही देणेघेणे नव्हते. जे देहापासून आहे ते देवाला नाखूश करते आणि तो ते स्वीकारत नाही. इश्माएल हा देहस्वभावापासून जन्मलेला मुलगा होता आणि त्याची माता दासी असल्यामुळे तोदेखील दासच होता.

परंतु इसहाकाची गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. तो स्वतंत्र स्त्रीपासून जन्मला होता. तो जगामध्ये येण्यामागे देवाचे कार्य करण्याचा हेतू होता. येथे मुद्दा हा आहे की, ख्रिस्तावरील विश्‍वासाने आपण इसहाकाचे बंधू म्हणून गणले जातो. मानवी प्रयत्नाने नाही तर स्वर्गीय सामर्थ्याने जन्मलेले असे आपण अभिवचनाची मुले आहोत.


तारणासाठी नियमशास्त्र आवश्यक आहे असे ठाम मत असणार्‍या व्यक्तीची एक प्रबल वृत्ती असते, ती म्हणजे केवळ कृपेनेच तारणप्राप्ती होते असा प्रचार करणार्‍यांचा ते छळ करतात. जे नियमशास्त्रावर जोर देतात त्यांना असे वाटते की, कृपेचा संदेश देणारे लोकांना पाप करणे अधिक सोपे करतात. परंतु ते सत्य नाही. कृपा लोकांना पाप करण्याची परवानगी देत नाही. कृपा आपल्याला देवहीन गोष्टी व जगिक वासना नाकारून साधेसुधे नीतीचे जीवन जगण्यास शिकवते. या कारणास्तव जरी विरोध किंवा छळ सोसावा लागला, तरी आपण तो सहन करण्यास तयार असावे.


परंतु नियमशास्त्र आणि कृपा याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा? नियमशास्त्र शिकवणार्‍यासोबत राहून आपण काहीच म्हणणार नाही काय? यावर शास्त्रलेखाचे उत्तर आहे, ‘‘त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही’’ (गलती.४ः३०). ते दोघे कधीच मिसळणार नाहीत. आपण कृपेद्वारे तारले गेले आहोत. आपण आता नियमशास्त्राच्या बंधनात नाही. ते आपण दूर सारले आहे.


_ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपणास मुक्त केले आहे; म्हणून त्यात टिकून राहा गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका (गलती.५:१)._


राजासनारूढ आणि समर्थ करणे



         राजासनारूढ आणि समर्थ करणे
                     इफिस.२ः१-१०


आपण ख्रिस्तामध्ये स्वर्गीय स्थानात बसलेलो असल्यामुळे, आपणांस आध्यात्मिक स्वस्थता व विश्रांती मिळायला हवी. परंतु अनेक जण ख्रिस्ताला तारणारा म्हणून ओळखतात, पण काळजी आणि चिंता करणे हे त्यांच्या स्वभावात असते. पवित्र शास्त्रात म्हटले आहे, ‘‘दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; अन्याय करणार्‍यांचा हेवा करू नकोस’’ (स्तोत्र.३७ः१).


विश्वासणार्‍याला आज्ञापले आहे, ‘‘परमेश्‍वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतिक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नकोस; अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते (स्तोत्र.३७ः७,८). आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही, ‘‘कारण आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत’’ (फिलिप्पै.३ः२०).


रोम शहराच्या तुरूंगातील एका अंधारकोठडीतून पौल ह्या महान सत्यांविषयी लिहीत होता, पण ख्रिस्तामधील त्याच्या स्थानाविषयीची त्याला सखोल जाणीव होती. हेच त्याच्या विजयी जीवनाचे रहस्य होते. आपले आध्यात्मिक स्रोत ख्रिस्तामध्ये आहेत हे त्याला समजले होते.


ख्रिस्ताला ‘‘सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले’’ आहे (इफिस.१ः२१). प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीपेक्षा त्याला उंच केले आहे. तो जगातील गोष्टींमुळे दूषित झाला नाही. आपण आपल्या ख्रिस्तामधील स्वर्गीय स्थानानुसार जगतो, तेव्हा आपणही जगातील गोष्टींमुळे प्रदूषित होत नाही. ह्यासाठी हृदयाची व मनाची योग्य वृत्ती असणे आणि विश्वासाने जगणे गरजेचे आहे. ख्रिस्तामध्ये जे आहे, ते आपण आपेलेसे करतो, तेव्हा आपण त्या उच्चस्थानाशी निगडित असलेले सामर्थ्य व विजय यांमध्ये सहभागी होतो. 


_जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे (योहान.१६ः३३)._


येशु लवकर येत आहे



             ✨प्रभू येणार ! प्रभू येणार !✨


*तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांस वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल..✍🏼*
                    *( लूक १२:४०)*


                          


          !!..परमेश्वराची स्तुती असो..!!


     प्रभू येशू ख्रिस्त अकस्मात येणार आहे. म्हणून आम्ही निष्काळजी व बेफिकीर होऊ नये तर आपण ख्रिस्ताच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहात असावे, त्याच्या आगमनासाठी आम्ही सदैव तयार राहावे. व याबाबतीत थकू नये किंवा अविश्वास प्रगट करू नये. कारण वाट पाहाणे नेहमीच सोपे नसते. परंतु ख्रिस्ती माणसाच्या जीवनात एक जिवंत आशा ठेवलेली आहे. त्या आशेसंदर्भात आपण कधीही निराश होऊ नये. ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याचे महत्व पेत्र दाखवून देत आहे. तो म्हणतो, *पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू तारणारा ह्याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. ( २ रे पेत्र ३:२)*


     ख्रिस्ताच्या आगमनाविषयी थट्टा करणाऱ्यांविषयी पेत्र म्हणतो की, *स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करत  येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे ? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. ( २ रे पेत्र ३:३,४)* हे थट्टा करणारे लोक ख्रिस्त परत येणार आहे ह्यावर विश्वास ठेवत नाहीत. आणि आपण त्यांचे ऐकून बहकू नये. पूर्वी नोहाच्या काळात जसे जलप्रलयाने देवाने जगाचा नाश केला त्याप्रमाणेच आता तो अग्नीने ह्या जगाचा नाश करणार आहे. त्यावेळी जे लोक देवाला मानीत नाहीत किंवा ख्रिस्ताच्या आगमनावर विश्वास ठेवीत नाहीत त्यांचा न्याय होईल व त्यांना नरकात टाकले जाईल. आपण देवाच्या वचनातील सत्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. प्रभू लवकरच येत आहे. आपल्याला जरी वाटत असले की तो विलंब लावीत आहे, परंतु तो यासाठी विलंब लावीत आहे की, कुणाचाही नाश होऊ नये म्हणून सर्वांना पश्चाताप करण्याची संधी तो देत आहे. वचन सांगते की, *कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. ( २ रे पेत्र ३:९)*आमचा प्रभू खूप सहनशील आहे. आमच्या पापापासून आमची सूटका व्हावी, त्यासाठी आम्हाला संधी मिळावी आणि एकाही आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून तो विलंब करीत आहे. ख्रिस्ताचे पुनरागमन अकस्मात होईल. *प्रभूचा दिवस* लवकरच येईल. महासंकटाचा काळ सात वर्षांचा असेल व त्यानंतर ख्रिस्त एक हजार वर्षे या जगावर राज्य करील. या काळाच्या शेवटी पृथ्वी व आकाश यातील सर्व काही वितळून जाईल आणि मग नवी पृथ्वी व नवे आकाश निर्माण होईल. जे प्रभूच्या दृष्टीने योग्य आहेत, निवडलेले आहेत ते त्याच्याबरोबर उचलले जातील आणि असे निवडलेले देवाचे लोक त्याच्याबरोबर सर्वकाळ राहातील. 


     प्रियांनो, हे सर्व खरोखर घडणार आहे, आमचा प्रभू लवकरच येणार आहे ह्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि आपण आपले आचरण शुद्ध, पवित्र ठेवावे, आपण देवाची उपासना, स्तुती करणारे असे असावे. आपण ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहाणारे असे असावे. आपल्या शीलावर कलंक किंवा डाग नसावेत. आणि आपण आपल्या सर्व व्यवहारात निर्दोष असावे. जेणेकरून ख्रिस्ताची शांती आपल्या मनात राज्य करील. पौल म्हणतो, *"ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे, आणि तुम्ही कृतज्ञ असा". ( कलस्सै ३:१५)* आपण कितीतरी वेळा ख्रिस्ती जीवनात उणे पडतो, असे असूनही देवाची आमच्या बाबतीत असलेली सहनशीलता संपत नाही. *आपण ख्रिस्ती जीवनात सर्वदा विजयी असावे* अशी प्रभूची इच्छा आहे. आपण हे लक्षात ठेवून प्रभूच्या येण्याची वाट पाहिली पाहिजे. पापात जगणारे लोक गोंधळ व भ्रांतीच्या प्रवाहात सापडलेले आहेत व या प्रवाहाबरोबर नाशाकडे चालले आहेत. त्या प्रवाहात आपण सापडणार नाही, ह्याची खबरदारी आम्ही घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही पापापासून दूर राहून स्वतःला शुद्ध, पवित्र, निष्कलंक असे राखले पाहिजे. येशूला प्रभू मानून त्याच्या सान्निध्यात सदैव टिकून राहिले पाहिजे. त्याच्या दयेवर, कृपेवर अवलंबून राहिले पाहिजे. त्याच्या सामर्थ्यात वाढत राहिले पाहिजे. 


      "आपला प्रभू व तारणाऱ्या येशू ख्रिस्ताला अनंतकालपर्यंत गौरव असो"


          !!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!


    परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!