Saturday, 3 October 2020

येशु लवकर येत आहे



             ✨प्रभू येणार ! प्रभू येणार !✨


*तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांस वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल..✍🏼*
                    *( लूक १२:४०)*


                          


          !!..परमेश्वराची स्तुती असो..!!


     प्रभू येशू ख्रिस्त अकस्मात येणार आहे. म्हणून आम्ही निष्काळजी व बेफिकीर होऊ नये तर आपण ख्रिस्ताच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहात असावे, त्याच्या आगमनासाठी आम्ही सदैव तयार राहावे. व याबाबतीत थकू नये किंवा अविश्वास प्रगट करू नये. कारण वाट पाहाणे नेहमीच सोपे नसते. परंतु ख्रिस्ती माणसाच्या जीवनात एक जिवंत आशा ठेवलेली आहे. त्या आशेसंदर्भात आपण कधीही निराश होऊ नये. ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याचे महत्व पेत्र दाखवून देत आहे. तो म्हणतो, *पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू तारणारा ह्याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. ( २ रे पेत्र ३:२)*


     ख्रिस्ताच्या आगमनाविषयी थट्टा करणाऱ्यांविषयी पेत्र म्हणतो की, *स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करत  येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे ? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. ( २ रे पेत्र ३:३,४)* हे थट्टा करणारे लोक ख्रिस्त परत येणार आहे ह्यावर विश्वास ठेवत नाहीत. आणि आपण त्यांचे ऐकून बहकू नये. पूर्वी नोहाच्या काळात जसे जलप्रलयाने देवाने जगाचा नाश केला त्याप्रमाणेच आता तो अग्नीने ह्या जगाचा नाश करणार आहे. त्यावेळी जे लोक देवाला मानीत नाहीत किंवा ख्रिस्ताच्या आगमनावर विश्वास ठेवीत नाहीत त्यांचा न्याय होईल व त्यांना नरकात टाकले जाईल. आपण देवाच्या वचनातील सत्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. प्रभू लवकरच येत आहे. आपल्याला जरी वाटत असले की तो विलंब लावीत आहे, परंतु तो यासाठी विलंब लावीत आहे की, कुणाचाही नाश होऊ नये म्हणून सर्वांना पश्चाताप करण्याची संधी तो देत आहे. वचन सांगते की, *कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. ( २ रे पेत्र ३:९)*आमचा प्रभू खूप सहनशील आहे. आमच्या पापापासून आमची सूटका व्हावी, त्यासाठी आम्हाला संधी मिळावी आणि एकाही आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून तो विलंब करीत आहे. ख्रिस्ताचे पुनरागमन अकस्मात होईल. *प्रभूचा दिवस* लवकरच येईल. महासंकटाचा काळ सात वर्षांचा असेल व त्यानंतर ख्रिस्त एक हजार वर्षे या जगावर राज्य करील. या काळाच्या शेवटी पृथ्वी व आकाश यातील सर्व काही वितळून जाईल आणि मग नवी पृथ्वी व नवे आकाश निर्माण होईल. जे प्रभूच्या दृष्टीने योग्य आहेत, निवडलेले आहेत ते त्याच्याबरोबर उचलले जातील आणि असे निवडलेले देवाचे लोक त्याच्याबरोबर सर्वकाळ राहातील. 


     प्रियांनो, हे सर्व खरोखर घडणार आहे, आमचा प्रभू लवकरच येणार आहे ह्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि आपण आपले आचरण शुद्ध, पवित्र ठेवावे, आपण देवाची उपासना, स्तुती करणारे असे असावे. आपण ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहाणारे असे असावे. आपल्या शीलावर कलंक किंवा डाग नसावेत. आणि आपण आपल्या सर्व व्यवहारात निर्दोष असावे. जेणेकरून ख्रिस्ताची शांती आपल्या मनात राज्य करील. पौल म्हणतो, *"ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे, आणि तुम्ही कृतज्ञ असा". ( कलस्सै ३:१५)* आपण कितीतरी वेळा ख्रिस्ती जीवनात उणे पडतो, असे असूनही देवाची आमच्या बाबतीत असलेली सहनशीलता संपत नाही. *आपण ख्रिस्ती जीवनात सर्वदा विजयी असावे* अशी प्रभूची इच्छा आहे. आपण हे लक्षात ठेवून प्रभूच्या येण्याची वाट पाहिली पाहिजे. पापात जगणारे लोक गोंधळ व भ्रांतीच्या प्रवाहात सापडलेले आहेत व या प्रवाहाबरोबर नाशाकडे चालले आहेत. त्या प्रवाहात आपण सापडणार नाही, ह्याची खबरदारी आम्ही घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही पापापासून दूर राहून स्वतःला शुद्ध, पवित्र, निष्कलंक असे राखले पाहिजे. येशूला प्रभू मानून त्याच्या सान्निध्यात सदैव टिकून राहिले पाहिजे. त्याच्या दयेवर, कृपेवर अवलंबून राहिले पाहिजे. त्याच्या सामर्थ्यात वाढत राहिले पाहिजे. 


      "आपला प्रभू व तारणाऱ्या येशू ख्रिस्ताला अनंतकालपर्यंत गौरव असो"


          !!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!


    परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!


                          



        

No comments:

Post a Comment