योहान ६ : ३१-३५.
*स्वर्गीय मान्ना*
*स्वर्गीय भाकर*
*स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे ; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल ; जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.*
*योहान ६ : ५१*
अरण्यात वाटचाल करीत असताना जेव्हा इस्राएल लोकांना भूक लागली तेव्हा त्यांनी मोशे आणि अहरोन यांच्या विषयी कुरकुर केली म्हणून परमेश्वराने त्यांच्यासाठी स्वर्गातून मान्ना पाठवला. त्यांनी कुरकुर केली होती पण परमेश्वराने मात्र त्यांच्यावर प्रीति केली , त्यांची शारीरिक गरज पूर्ण केली. *जो देव मिसरातून बाहेर काढतो तो रानात कसा मरू देणार !*
*मान्ना हे ख्रिस्ताचे प्रतीक आहे.* मान्ना हे अन्न काही भूमीचा उपज नव्हते तर परमेश्वराने स्वर्गातून मान्ना हे अन्न इस्राएल लोकांसाठी पाठवले होते. आणि रानात चाळीस वर्षे त्यांची काळजी घेत पोषण केले.
*जशी मान्ना ही अलौकिक भेट होती , तसेच प्रभू येशु ख्रिस्त ही पित्याने आम्हाला दिलेली स्वर्गातून उतरलेली अलौकिक भेट ,गिफ्ट आहे.*
गिफ्ट किंवा भेट ही फुकट दिली जाते. आणि ही भेट किंवा गिफ्ट, *हा ख्रिस्त मिळण्यासाठी आम्हाला नितीमत्वाचे श्रम करावे लागले नाहीत*. *जसं इस्राएल लोकांनी कुरकुर केली तरी परमेश्वराने मान्ना ह्या स्वर्गीय भाकरीने तृप्त करीत त्यांना रानात उपाशी न राहू देता त्यांचे पोषण केले , अगदी तसेच आम्ही पापी असतानाच , आमची योग्यता नसताना देवाने आमच्यावरील प्रेमामुळे प्रभू येशू , त्याचा पुत्र हे दान ही गिफ्ट आम्हाला दिली आणि त्याच्यावरील विश्वासाच्याद्वारे आम्हाला विपुल जीवन दिले.*
ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आपण भेटवस्तू , गिफ्ट देतो , कधी वाढदिवस असेल तर, किंवा काहीही नसले तरी ती व्यक्ती आपल्याला आवडते , तिच्यावरील प्रेमापोटी आपण भेटवस्तू देतो. *तसेच देवाचे तुमच्या माझ्यावर प्रेम आहे त्यामुळे देवाने ही मौल्यवान भेट , त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला.आणि ज्या पित्याने पुत्राला राखून न ठेवता आम्हाला देऊन टाकले तो पिता सर्व काही देणारच.* *प्रेषित पौल म्हणतो ," देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुति होवो.* *२ करिंथ ९:१५*
*जशी अरण्यात इस्राएल लोकांची शारीरिक तहानभूक देवाने मान्ना देऊन भागवली तशीच आमची अध्यात्मिक तहान भूक , तारणाची गरज आणि सार्वकालिक जीवनाची गरज ख्रिस्त येशू ह्या स्वर्गीय भाकरीनेच भागते . आमचे अध्यात्मिक पोषण होते.*
*हा स्वर्गीय मान्ना , हा प्रभू येशू ख्रिस्त , ही जी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे तीचे नित्यनेमाने सेवन करीत आत्म्यात बलवान होत जाऊ. आणि स्वर्गीय कनानात जाऊ.*
*थोर आणि दयाळू पित्या तू दिलेल्या प्रभू येशू ख्रिस्त ह्या स्वर्गीय भाकरिबद्दल आम्ही उपकार मानतो.* *आमेन*.
No comments:
Post a Comment