*✨पापावर जय मिळवा✨*
*"तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये."..✍🏼*
*( रोम ८:१२ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
बायबल सांगते सर्व मानवजात पापी आहे. आपण सर्व पापात जन्मलो आहोत आणि जन्मापासून असलेल्या पापी स्वभावामुळे आम्ही पाप करीत राहातो. परंतु जेव्हा आम्ही देवाच्या मार्गाने चालण्याचा निर्णय घेतो, देवावर विश्वास ठेवून पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतो, तेव्हाच आम्ही पापाला मेलेलो असे होतो. बाप्तिस्मा घेणे म्हणजे पापाला मरणे, जूना मनुष्य म्हणजेच पापात पाडणारा जूना स्वभाव काढून टाकणे आणि नवीन जीवन प्राप्त करणे. आम्ही पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्राप्त करतो तेव्हा जीवनाच्या आत्म्याचा जो नियम तो आपणांस पाप व मरण यांच्या नियमापासून आम्हाला मुक्त करतो. पौल म्हणतो, *कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. ( रोम ८:२)* पाप मरत नाही. ते दंडाच्या अधीन आहे. ते करणे न करणे पूर्णपणे आमच्याच हातात आहे. म्हणूनच पौल आम्हाला शरीरवासनांच्या अधीन न होण्यास सांगत आहे. कारण पूर्वी आम्ही असहाय होतो, पापाचे बळी ठरत होतो. म्हणजेच नियमशास्त्राधीन होतो त्यामुळे आमची गणना पापी लोकांमध्ये होत होती. परंतु आता आपण परमेश्वरासाठी जिवंत आहोत, पवित्र आत्म्यानुसार चालत आहोत, त्यामुळे पापाच्या दास्यात राहात नाहीत तर पापाचा धिक्कार करतो, पापाला नाही म्हणू शकतो, नाकारू शकतो. *जे आपण एकदा पापाला मेलो आहोत, ते आपण ह्यापूढे त्यात कसे राहणार ? कदापि नाही. ( रोम ६:२)*
पौल म्हणतो, *"आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही." ( गलती ५:१६)* आम्हाला आमच्या पापांची जाणीव होऊन आम्ही ती कबूल करून सोडून दिली पाहिजेत. पापाला पापच मानले पाहिजे, मानवी स्वभाव मानू नये. आम्हाला पापाच्या मार्गाकडे नेणाऱ्या सर्व लोकांपासून, ठिकाणांपासून आणि सर्व प्रकारच्या पापात पाडणाऱ्या गोष्टींपासून आम्ही स्वतःला दूर केले पाहिजे, अशा गोष्टींना टाळले पाहिजे, त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे, अलिप्त राहिले पाहिजे. विशेष करून ज्या गोष्टी आम्हाला पापात पडण्यास आकर्षित करतात अशा गोष्टींपासून अलिप्त राहिले पाहिजे. आम्ही असे कधीच समजू नये की आम्ही कधीच पापात पडणार नाही, परीक्षेत पडणार नाही. कारण सैतान कट कारस्थाने करून प्रत्येकाला परीक्षेत पाडतो व छळत राहतो. म्हणून आम्ही मोहात पाडणाऱ्या गोष्टींना आमच्या जीवनात स्थान देऊ नये. प्रियांनो, जेव्हा आम्ही देवाच्या मार्गाने चालतो, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानूसार चालतो, तेव्हा आम्ही पापापासून दूर केले जातो आणि ख्रिस्तात वाढत जातो. जग आणि जगातील गोष्टी सोडून देऊन देवाला आवडणारे जीवन जगू लागतो. प्रियांनो, आम्ही पापावर जय मिळवून विजयी जीवन जगू शकतो, फक्त गरज आहे पापाशी किंवा पराभूत होऊन जगण्याची तडजोड करू नका, तर पापाला ठामपणे नकार देऊ शकणारे सामर्थ्य देवापासून प्राप्त करा. पौल म्हणतो, *"तुम्ही नियमशास्त्राधीन नाही; तर कृपेच्या अधीन आहां, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही." ( रोम ६:१४)*
No comments:
Post a Comment