*✨धीर धरा.. वाट पाहा✨*
*त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा, तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही..✍*
*( हबक्कूक २:३ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
परमेश्वराने गोंधळलेल्या हबक्कुकला अद्भूत उत्तर दिले. तो देवाचे उत्तर ऐकण्यास आतुर झाला होता. आपल्या मनातही देवाच्या कृत्यांविषयी अनेक विचार येत असतील, आपण पवित्र शास्त्रात त्यांची उत्तरे शोधतो का ? देवाने हबक्कुकला शिकवले की, *देवाने ठरवलेली योजना विलंब लागला तरी पूर्ण होणारच आहे.* परंतु त्यासाठी देव त्याला धीर धरावयास सांगत आहे. धीर म्हणजे उदासीनता किंवा नैराश्य नव्हे. सर्व परिस्थितीमध्ये, सर्व प्रकारचे टक्केटोणपे सोशिकपणे सहन करून परमेश्वराची वाट पाहाणारी व्यक्तीच खरी धीर धरणारी व्यक्ती होय. देव दृष्टांताद्वारे आमच्याशी बोलतो तेव्हा आम्हाला अधिक धीर प्राप्त होतो. मोशेच्या बाबतीत आपण पाहातो की, आपल्या थोर देवाला ओळखल्यामुळे त्याला राजाची भिती वाटली नाही. मोशे आपल्या स्वतःच्या तत्वांना धरून नव्हे, तर त्याला देवाचा दृष्टांत झाल्यामुळे, दृष्टांताद्वारे परमेश्वर त्याच्याशी बोलल्यामुळे त्याला हा धीर प्राप्त झाला होता. *त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहात असल्यासारखा त्याने धीर धरला. ( इब्री ११:२७)* देवावरील विश्वासामुळे त्याच्यात केवढा बदल झाला होता !
देवाचा दृष्टांत झालेल्या व्यक्तीची निष्ठा एखाद्या तत्वावर किंवा कार्यावर अवलंबून नसते तर खुद्द देवावरच अवलंबून असते. कारण देव आपल्या लेकरांना निराश करीत नाही. आणि दृष्टांताद्वारे एकप्रकारची प्रेरणा मिळते त्यामुळे तो दृष्टांत देवाकडून आला आहे हे समजते. देवाच्या पुत्राला अरण्यात सैतानाकडून झालेल्या मोहपरीक्षेच्या वेळी झाले तसेच आमच्या जीवनातही सैतान वारंवार मोह आणतो. परंतु धीर धरून त्या मोहावर विजय मिळविण्यासाठी परमेश्वरच शक्ती पुरवितो. जरी विलंब लागला तरी आम्ही धीर धरणे खूप आवश्यक आहे. वास्तविक पाहाता देव आपल्या नेमिलेल्या समयीच आपल्या योजना पूर्ण करतो, नेमलेल्या समयीच कार्य करतो. उपदेशकही म्हणतो की *प्रत्येक गोष्टींचा नेमिलेला समय आहे.* देवावर विश्वास ठेवलेला असल्यामुळे जरी विलंब झाला असे वाटले तरी विश्वासणारा खंत व्यक्त करीत नाही, चिडत नाही. कारण देवाची अभिवचने त्याने नेमिलेल्या समयी निश्चितपणे पूर्ण होतीलच असा विश्वास तो ठेवतो. पेत्र म्हणतो, *"कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे." ( २ रे पेत्र ३:९)*
आपण जिवंत देवावर व त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवतो हे जगातील लोकांना मुळीच आवडत नाही. त्याबद्दल कधी कधी विश्वासणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागते. परंतु तरीही ते देवाचा दृष्टांत प्राप्त झाल्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक जोमाने कार्य करतात. आपण आत्मिक दृष्टीने कधीच समाधानी असू नये, तर आम्ही अधिकाधिक आत्मिक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रेषित पौल म्हणतो, *"एवढ्यांतच मी मिळविले, किंवा एवढ्यांतच मी पूर्ण झालो आहे असे नाही तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यांत घेतले ते मी आपल्या कह्यांत घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे." ( फिलिप्पै ३:१२)* पौलाच्या ह्या बोलण्यातून आम्ही असा बोध घेतला पाहिजे की, देवाच्या दृष्टांताची प्रेरणा आम्हाला मिळाली असेल तर उत्तमच आहे. परंतु तरीही आत्मिक ढिलाई करू नका, सावध राहा, धीर धरा, वाट पाहा आणि परमेश्वराकडून मिळणाऱ्या आशीर्वादांचे वाटेकरी व्हा.
*!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*
*परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!*
No comments:
Post a Comment