*लूक १६: १९-३१*
*जगण्याचे दोन मार्ग*
*कारण नितीमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो , पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.*
*स्तोत्र १: ६.*
जगण्याचे दोन मार्ग नेहमीच आमच्यासमोर असतात. एक नितीमानाचा मार्ग आणि दुसरा दुर्जनांचा मार्ग ! *जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा मार्ग नीतीचा मार्ग असतो. पण जो अविश्वासु असतो देवावर विश्वास ठेवीत नाही त्याचा मार्ग हा दुर्जनांचा किंवा दुष्टाईचा मार्ग असतो.*
आजच्या वाचनात दोन माणसे आहेत. एक श्रीमंत मनुष्य व दुसरा दरिद्री लाजर. *एक श्रीमंत दुसरा गरीब , एक समाजात प्रतिष्ठित तर दुसरा नगण्य , एक देवावर प्रेम करणारा तर दुसरा संपत्तीवर प्रेम करणारा होता.* हाच फरक किंवा हेच जीवनाचे दोन मार्ग आमचे प्रारब्ध किंवा शेवटचे ठिकाण ठरवीत असतात.
लाजर हा गरीब होता म्हणून अब्राहमाच्या उराशी गेला असे नाही तर तो देवावर विश्वास ठेवणारा होता. *लाजर या शब्दाचा अर्थच मी देवावर विश्वास ठेवतो असा आहे*. *याचाच दुसरा अर्थ देव माझे सहाय्य आहे असा आहे.* आणि मृत्यूनंतर लाजर अब्राहमाच्या उराशी गेला , आणि अब्राहमाला विश्वासणाऱ्यांचा पिता म्हटले आहे. पण श्रीमंत माणसाचा स्वतःच्या संपत्तीवर विश्वास होता. म्हणूनच गौरवाने प्रभू लाजराच्या नावाचा उल्लेख करतो पण श्रीमंताचे नावही घेत नाही.
*या दोघांनी जे मार्ग निवडले होते त्यामुळे श्रीमंताला देवशिवाय सर्व मिळाले , पण लाजराला जरी या जगातील काहीच सौख्य मिळाले नाही तरी देव मिळाला.* या दोघांची आणि आमचीही दोन गटात विभागणी होत असते. ती विभागणी ही आर्थिक परिस्थिती मुळे नाही, राजकीय पक्षामूळे नाही, कातडीच्या रंगामुळे नाही , किंवा सुशिक्षित असण किंवा अशिक्षित असणं यावरूनही नाही . तर लोकांना विभक्त करणारी गोष्ट फार साधी आहे. ती म्हणजे
*देवाने निर्माण केलेल्या जगासाठी जगायचे की जग निर्माण करणाऱ्या देवासाठी जगायचे.* हेच दोन प्रमुख मार्ग आहेत. *ज्याला हे समजते तो आपले मृत्यूनंतरचे भवितव्य ठरवीत असतो.* *लाजर देवाच्या सहवासात , विश्वासात राहून मरण पावला अन अब्राहमाच्या उराशी गेला. तर दुसरा श्रीमंत मनुष्य देवाशिवाय मरण पावला.*
*दोन मार्ग आमच्या समोर आहेत प्रभू येशूवरील विश्वासाचा नितीमानाचा मार्ग किंवा प्रभू येशूवर अविश्वास दाखवीत दुर्जनांचा मार्ग.* निवड आपल्याच हातात आहे.
*थोर आणि दयाळू पित्या आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त यावर विश्वास ठेवीत नितीमानांचा मार्ग निवडतो आमचा स्वीकार कर.*
No comments:
Post a Comment