*रोम ८:१-८*
*ज्ञान असूनही अज्ञानी*
*जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही.* *रोम ८:८*
एक वस्तुस्थिती अशी आहे की पुष्कळ डॉक्टर हे सिगारेटचे व्यसन करताना दिसतात. खर पाहिलं तर सिगारेटचे दुष्परिणाम शरीरावर किती वाईट होतात हे सामान्य लोकांपेक्षा डॉक्टरला जास्त माहिती असतात. म्हणजेच सर्व कळत असून अन माहिती असूनही ते चुकीच आणि स्वतःला हानी होईल असे वागतात.
पौल यावर प्रकाश टाकीत आहे की जरी ज्ञान प्राप्त झाले तरी आपण ज्ञानाचा उपयोग करीत नाही. रोम ७:१९ मध्ये तो म्हणतो , *कारण जे चांगले करावेसे वाटते ते मी करीत नाही ; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो.* आपली अवस्था अशीच आहे , प्रभू येशूला आम्ही ओळखतो , त्याचं वधस्तंभावरील कार्य आपण जाणतो , तारण केवळ प्रभू येशूवरील विश्वासद्वारेच त्याच्या कृपेने प्राप्त होते हेही मान्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण प्रभू येशूचा आमचा तारणारा म्हणून स्वीकारही केला आहे ,तरीही ह्या देहस्वभावाच्या आधीनच राहून आपण वागत असतो. जस सर्व समजत असूनही डॉक्टर धूम्रपान करून स्वतःला अपाय करून घेतात. जर ख्रिस्त आम्हाला समजला आहे आणि अंतकरणपूर्वक त्याचा स्वीकार केला आहे तर हे परस्परविरोधी विचार आणि आचरण कधी थांबवणार आहोत आपण?
*देवाचे वचन सांगते की , तुम्ही मूर्खांसारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या.* देवाने दिलेला आमचा वेळ , शक्ती , देणग्या , प्रतिभा हे चुकीच्या पद्धतीने , चुकीच्या संगतीत राहून वाया घालवणं थांबवलं पाहिजे. *आम्ही कसे वागतो , कोणाच्या संगतीत राहतो हे देव जाणू शकतो म्हणूनच आपण काय कराव व कोणाच्या संगतीत असावं हे देवाचा आत्मा दाखवीत असतोच.*
या जगात रहात असताना सर्वांच्या बरोबर रहावे लागते पण सर्व आमच्यासारखे असतील असे नाही. पौल म्हणतो जगात रहा पण जगातल्यासारखे होऊ नका. *यावरूनच आमचा अंतिम दैवी हेतू ठरत असतो आणि सिद्धीस जात असतो*
*जर प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपण देवाचे निवडलेले ज्ञानी ठरतो तर का ह्या देहस्वभावाच्या अधीन होऊन ज्ञानी असुनही अज्ञानी व्हावे*
*प्रभू येशू तुझ्या ज्ञानाने तू आम्हाला भरलेस , वेगळे केलेस म्हणून तुझ्यापासून दूर नेणाऱ्या अज्ञानी गोष्टी पासून आम्हाला वाचव.* *आमेन*
No comments:
Post a Comment