या रागाचे काय करायचे?
इफिस.४ः१७-२७
आपण पापाचा राग करावा आणि जे आपल्याला देवापासून विभक्त करते किंवा ज्याच्याद्वारे आपण सहभागिता गमावतो त्याचा द्वेष करावा हे उघड आहे. ह्याचाच अर्थ असा की, इतर जे करतात ते देवाच्या वचनाच्या विरोधात असल्यामुळे त्यांचा द्वेष करण्याची वेळ आपल्यावर येते. अशा प्रकारच्या रागाला ‘सात्त्विक राग’ असे म्हणतात. पण ज्या वेळेस त्या प्रकरणात विश्वासणार्याचा स्वार्थ प्रकट होतो तेव्हा तो पापात पडण्याची शक्यता असते, निदान त्याच्या इतरांबाबत असलेल्या वृत्तीमुळे. इफिस.४ः२६ मध्ये पौल एखाद्याने विद्वेषाचा अग्नी अंतःकरणात धुुमसत ठेवू नये याबाबत इशारा देतो, ‘‘तुम्ही रागवा परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.’’ कृतीने व वृत्तीने झालेल्या पापांची कबुली दिल्याशिवाय रात्री झोपायचे नाही अशी सवय आपण लावून घेतली पाहिजे. ‘‘कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही’’ (याकोब.१ः२०).
जे देवाबरोबर होते त्यांच्यावरही येशू रागावला होता. तो परूशी व सदूक्यांना ‘सापाच्या पिल्लांनो’ असे म्हणाला (मत्तय.३ः७). शास्त्री व परूशांना त्याने ‘ढोंगी’ असे म्हटले (मत्तय.२३ः२८). एका ठिकाणी त्याने दोर्यांचा एक कोरडा करून सराफना मंदिरातून हुसकून दिले (योहान.२ः१३-१६).
जरी प्रभू येशू ख्रिस्त पाप न करता रागावू शकत होता, तरी ते आपल्यासाठी कठीण आहे. म्हणूनच पौलाने आपल्याला इफिस.४ः२६ मध्ये आज्ञा दिली आहे. जेव्हा देवाचे नाव व्यर्थ घेतले जाते किंवा त्याची निंदा केली जाते, तेव्हा आपला राग जरूर उचंबळून यावा. परंतु अशा प्रसंगांना प्रतिसाद देताना आपण पापात पडू नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. जर आपण अपशब्द, इतरांच्या बाबतीत कृतघ्न शब्द उच्चारतो किंवा मनामध्ये कडवटपणा बाळगतो, तर आपण पाप करतो व त्याची प्रभूकडे कबुली देणे अगत्याचे आहे.
_माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकायला तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही (याकोब.१ः१९,२०)._
No comments:
Post a Comment