*प्रकटीकरण भाग — 14*
*शिक्का 3- काळ्या घोड्यावरील स्वार - दुष्काळ*
प्रियजनहो, *पवित्र शास्त्र* सांगते, *प्रभु येशू ख्रिस्ताने* तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘काळा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते; आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी : “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!” (प्रकटीकरण 6:5-6) काळा रंग आणि तराजू हे अन्नाचा दुष्काळ दर्शवतात. *पवित्र शास्त्र वचन* सांगते, त्यांचा चेहरा काळोखाहून काळा झाला आहे; त्यांना आळ्यांतून कोणी ओळखत नाही; त्यांची त्वचा त्यांच्या हाडांना चिकटली आहे; ती शुष्क झाली आहे, काष्ठासारखी झाली आहे. क्षुधेने मारलेल्यांपेक्षा तलवारीने मारलेले पुरवले; कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकूळ होऊन क्षय पावतात. (विलापगीत 4:8-9) अन्नटंचाईचे भीषण स्वरुप या वचनांमध्ये दिसत आहे. जागतिक एक चलन झाल्यामुळे चलन मिळणे देखील कठीण असेल. अशा परिस्थितीत आलेला युद्ध काळ हा लगेचच महागाई वाढविल. त्यात ख्रिस्तविरोधकाच्या काळात कायदा सुव्यवस्था संपुष्टात आलेली असेल. मुळ दिनारियस या शब्दापासून रुपया हा शब्द आला आहे. तो *पवित्र शास्त्रात* एक दिवसाची मजूरी या अर्थाने वापरला आहे. म्हणजे या तिसर्या पीडेच्या काळात एक दिवसाची मजूरी शेरभर गहू किंवा एक दिवसाची मजूरी तीन शेर जव असेल. अन्नाचा तुटवडा इतका प्रचंड असणार की एका व्यक्तीला एक दिवस काम करुन जेमतेम एका व्यक्तीचेच पोट भरण्यासाठी अन्न मिळू शकेल. तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर व्यक्ती वृद्ध व्यक्ती यांच्या जेवणाची सोय करणे किती कठीण जाईल हे समजून येते. स्वाभाविकपणे पोट भरण्यासाठी चोरी, लूटमार वाढेल अर्थातच यासाठी संरक्षण व्यवस्था काहीही नसेल कारण राज्य ख्रिस्तविरोधकाच्या हातात असेल. तेल आणि द्राक्षारस हे महाग आहेत त्यांची खराबी न करणे म्हणजे एकतर ते श्रीमंत लोकांच्या घरी असेल आणि दुसरे ते जपून वापरणे कारण हा दुष्काळ पृथ्वीवर घडलेल्या सर्व दुष्काळांपेक्षा भयंकर असेल !
*स्वर्गारोहणात* लोकांतरी गेलेल्या विश्वासणाऱ्यांच्या कुटुंबातील जे लोक या काळात पृथ्वीवर असतील ते आपले कुटुंबीय कोठे गायब झाले याचा शोध करतील की ते सापडत नाही म्हणून दु:ख करतील की रक्तपातापासून स्वतःला वाचवतील की दुष्काळी परिस्थितीत अन्न मिळविण्यासाठी काबाडकष्ट करतील की पश्चात्ताप करतील ! काय करतील ! *पृथ्वीवर रहाणार्या सर्व लोकांनो, परमेश्वराने आपल्याला पावित्र्यात, स्वर्ग राज्यात आनंदात, परमेश्वराच्या पवित्र सहभागितेत राहण्यासाठी बनवले आहे. या महाक्लेषापासून सुटण्यासाठी फक्त प्रभु येशू ख्रिस्ताची प्रीती समजणे गरजेचे आहे. प्रभु येशू ख्रिस्ताची प्रीती ओळखा. आपल्याला वाचविण्यासाठी प्रभुजी स्वतः वधस्तंभावर गेले ती प्रीती ओळखा. नाहीतर प्रभुचा क्रोध सहन करावा लागेल. देवबाप करो परमेश्वराने आपल्यावर किती महान प्रीती केली आहे ती आपल्या सर्वांना समजो आणि या महासंकटाच्या काळापासून आपली सुटका करो. आमेन.*
No comments:
Post a Comment