Thursday, 22 October 2020

सुभक्ती अंगीकारा

 

            *✨सुभक्ती अंगीकारा✨*

                     *( भाग -६ )*


 *..तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची, बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला..✍🏼*

                 *( २ पेत्र १:५-७ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


      आतापर्यंत आपण पाहिले आहे की आम्ही कशाप्रकारे आमच्या देवावरील विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची भर घातली पाहिजे. त्यासाठी आम्ही काय केले पाहिजे आणि काय केले नाही पाहिजे हे आम्ही पाहिले. हे सात गुण आत्मसात करण्यासाठी आम्हाला देवाचे मार्गदर्शन आणि साहाय्य घेणे आवश्यक आहे. आम्ही देवावर आणि त्याच्या पवित्र वचनांवर विश्वास ठेवून, अवलंबून राहून चालत राहिले पाहिजे. आज आपण सुभक्ती विषयी पाहणार आहोत. वचनाद्वारे पाहू या - 

"आपल्या विश्वासात... सुभक्तीची... भर घाला."


    *सुभक्ती -* सुभक्ती म्हणजे काय ? सुभक्ती म्हणजे परमेश्वराच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाला निष्ठावान असल्यामुळे त्याच्याप्रती व्यक्त केलेला वैयक्तिक भक्तिभाव, त्याची केलेली उपासना आणि सेवा. देवाच्या संबंधाने सुभक्तीने वागण्यासाठी आपल्याला त्याच्याविषयी व त्याच्या मार्गाविषयी अचूक ज्ञान असणे आवश्यक आहे. देवाला आम्ही वैयक्तिक रित्या म्हणजेच अगदी जवळून ओळखण्याची, जाणून घेण्याची इच्छा आम्ही बाळगली पाहिजे. देवासारखे होण्याची, त्याचे अनुकरण करण्याची आणि त्याचे गुण व व्यक्तिमत्व आमच्या जीवनाद्वारे प्रतिबिंबित करण्याची आमची इच्छा असली पाहिजे. सुभक्ती आम्हाला आमच्या सर्व कृतीत देवाला संतुष्ट करण्याची प्रेरणा देते. पौल म्हणतो, *"म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा." ( १ करिंथ १०:३१)*


    खरी सुभक्ती आमच्या आचरणात आणली असता आम्ही आपल्या हृदयात देवाची जागा इतर कोणत्याही गोष्टीला घेऊ देता कामा नये. आमची देवावर प्रीति असेल तर ती प्रीति आपल्याला कोणत्याही अटींशिवाय स्वतःचे जीवन देवाला समर्पित करून त्या समर्पणानुसार जगण्याची प्रेरणा आम्हाला देते. परमेश्वर आपल्याला सुभक्तीत वाढण्यासाठी व टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तरतूदी पुरवण्याद्वारे त्याच्या समीप येण्यास साहाय्य करतो. याकोब आपल्या पत्रात लिहितो, *"देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल, अहो पापी जनहो, हात निर्मळ करा, अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा." ( याकोब ४:८)* म्हणजे देवाच्या जवळ जायचे असेल तर आम्ही स्वतःला शुद्ध आणि पवित्र, निर्मळ, निर्दोष, निष्कलंक असे करणे आवश्यक आहे.


   पौल तीमथ्याला सांगत आहे की, *"तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर." ( २ तीमथ्य २:१५)* या गोष्टी आमच्यामध्ये असल्या पाहिजेत अन्यथा आम्ही आध्यात्मिक रोगी बनू शकतो. आणि अशा कमकुवत अवस्थेत सैतानाच्या डावपेचांना सहज बळी पडू शकतो. ( १ पेत्र ५:८) जर आम्ही सातत्याने पवित्र वर्तणूकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहात व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत राहिलो तर आमच्या जीवनात येणाऱ्या सर्व परीक्षांना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. ( २ पेत्र ३:११,१२) या परीक्षांना सामोरे जात असताना आम्ही घाबरू नये, निराश होऊ नये. कारण " भक्तीमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे ... हे प्रभूला कळते." ( २ पेत्र २:९) म्हणून प्रियांनो, ख्रिस्ती या नात्याने आम्ही नेहमीच सतर्क राहावे, सावध राहावे जेणेकरून ऐहिक वासना किंवा कृत्यांमुळे आपल्या सुभक्तीवर घाला पडू नये व तिचा नाश होऊ नये. पौल म्हणतो, *"अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे." ( तीत २:१२,१३)*


         

No comments:

Post a Comment