✨ख्रिस्ताद्वारेच पापक्षमा✨
*यास्तव बंधूजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या ( ख्रिस्ताच्या) द्वारे तुम्हाला पापाच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे..✍*
*( प्रे. कृत्ये १३:३८ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
ख्रिस्ताच्या द्वारेच आम्हाला पापक्षमा मिळू शकते. आम्हां विश्वासणाऱ्यांच्या दृष्टीने हे एक खूप चांगले आणि महत्वाचे शुभवर्तमान आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला पापांची क्षमा मिळते. क्षमा म्हणजे एखाद्या मनुष्याला माफ करणे, एखाद्याच्या विरूद्ध आम्ही काही चुकीचे वागलो असलो तर त्या झालेल्या चुकीची क्षमा मागून बिघडलेले संबंध पुन्हा सुधारून पूर्ववत करणे आणि एखाद्याची पापे पुसून टाकणे किंवा विसरून जाणे होय. ती व्यक्ती क्षमेस पात्र आहे की नाही हे यावेळी पाहिले जात नाही. क्षमा करणे ही एक कृती आहे. प्रेमाची, दयेची आणि कृपेची. क्षमा करणे म्हणजे एखाद्या मनुष्याला त्या झालेल्या चुकीबद्दल पुन्हा पुन्हा जाणीव करून न देणे तर त्याने आपल्याविरूद्ध केलेली चूक कुठल्याही परिणामांचा विचार न करता ती पूर्णपणे विसरून जाणे. पवित्र शास्र सांगते की आम्हाला आमच्या सर्व पाप अपराधांबद्दल देवापासून क्षमा मिळविण्याची गरज आहे. कारण आम्ही सर्वांनी पाप केले आहे. उपदेशक म्हणतो, *सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही. ( उपदेशक ७:२०)* त्याचप्रमाणे योहान सांगत आहे की, *आपल्याला पाप नाही असे जर आम्ही म्हणतो, तर आपण स्वतःला फसवतो व त्याच्या ठायी सत्य नाही. ( योहान १:८)* त्याचप्रमाणे स्तोत्रकर्ता देखील म्हणत आहे की, *तुझ्याविरूद्ध, तुझ्याविरूद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. ( स्तोत्र ५१:४)*
ह्याचा अर्थ असा आहे की, आम्हाला देवाकडून क्षमेची गरज आहे. कारण जर आमच्या पापांची क्षमा झाली नाही तर आम्ही पापात तसेच पतन झालेल्या अवस्थेमध्ये राहातो. आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार नाही आणि सार्वकालिक कालापर्यंत आम्ही पापाचा परिणाम म्हणजेच दुःख भोगत नरकामध्ये खितपत पडणार. वचन सांगते की, *जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीला जीवन पडणार नाही. पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. ( योहान ३:३६)* परमेश्वर दयाळू, कनवाळू आणि मंदक्रोध आहे. तो आमच्या सर्व पापांची, अपराधांची क्षमा करतो. त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. वचन सांगते की, *तो तुमचे धीराने सहन करतो, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. ( २ रे पेत्र ३:९)* पश्चाताप करून त्याने आम्हाला आमच्या पापांची क्षमा उपलब्ध करून दिली आहे.
बायबल सांगते सर्वांनी पाप केले आहे आणि पापाची शिक्षा मरण आहे. *पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. ( रोम ६:२३)* एका मनुष्यामुळे, आदामामुळे पाप पापाचा जन्म झाला आणि मरण ह्या जगात आले परंतु त्या आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून देवाने आमच्यासाठी एक उत्तम योजना आखली. ती म्हणजे त्याचा एकूलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्य देह धारण करून ह्या जगात आला. *शब्द ( प्रभू येशू ख्रिस्त) देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. ( योहान १:१४)* पापामुळे जी शिक्षा आम्हाला होणार होती, मृत्यु, ती त्याने स्वतःवर घेतली आणि वधस्तंभावरचे मरण पत्करले. *ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. ( २ रे करिंथ ५:२१)* ह्यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला क्षमा प्राप्त होऊन सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळाले आहे.
प्रियांनो, आम्हाला आमच्या पापांची क्षमा व्हावी असे वाटत असेल तर आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे. तो आमच्या पापांसाठी मरण पावला आणि मरणावर विजय मिळवून परत उठला ह्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आम्हालाही त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.
*विश्वासाच्या द्वारे देवाच्या दयेने व कृपेने आम्हाला क्षमा प्राप्त होते.*
*!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*
*परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!*
No comments:
Post a Comment