*उत्पत्ति २ : १८-२३*.
*सहभागीता .*
*मग परमेश्वर देव बोलला , मनुष्य एकटा असावा हे बरे नाही ; तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन .*
*उत्पत्ति २ : १८.*
जेव्हा आदामाची निर्मिती केली तेव्हा परमेश्वर म्हणतो मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. एकटा होता काय तो ? नाही , प्राणी होते त्याच्या सोबतीला. मग देव त्याला एकटा का म्हणतो?
कारण देवाने अदामालाच फक्त स्वतःच्या प्रतिरुपात बनवले होते. दुसरे कोणीच देवाच्या प्रतिरुपात नव्हते. फक्त आदाम होता.
*देवाच्या मते भिन्न प्रवृत्तीचे एकत्र राहू शकत नाहीत. विश्वासणारे ब अविश्वासणारे , ख्रिस्ताचे व ख्रिस्ताचे नसणारे एकत्र राहू शकत नाहीत.*
मनुष्याशी जवळीक हवी सोबती हवा तर तो त्याच्या सारखाच हवा. देव हेच दाखवीत आहे की मनुष्य हा प्राण्याहून भिन्न आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे यात फरक आहेच. म्हणून त्यांची सहभागीता होऊ शकत नाही. जरी ते एकत्र आले तरी अध्यात्मिक सहभागीता होतच नाही.
विश्वासणारे आणि अविश्वासणारे यातील भिन्नता परमेश्वर अध्यात्मिक जीवनाद्वारे दाखवतो. मनुष्य एकटा आहे म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे हे या जगात एकटे किंवा वेगळे आहेत. जरी जगात अनेक लोक आहेत तरी त्यांच्यात अध्यात्मिक एकवाक्यता नाही. म्हणून ते एकत्र सहभागीतेत येऊ शकत नाहीत.
याचा अर्थ त्यांच्याशी संबंध तोडुनच टाकायचा असे नाही. प्रेषित पौल म्हणतो जगात असावे पण जगातल्या सारखे होऊ नका. उलट त्यांनाच ख्रिस्ताकडे आणले पाहिजे सुवार्ता सांगून !! जसे आदामापासून देवाने नारी म्हणजे हवा हिला निर्माण केले तेव्हा आदाम म्हणाला आता ही माझ्या हाडातील हाड व मांसातील मांस आहे. ही अंतर्यामीची सहभागीता होती . त्याची हीच खरी सहभागीता आनंददायक झाली कारण उत्पत्ति १ : २७ सांगते , *देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला . नर व नारी अशी ती निर्माण केली.*
जर आम्ही ख्रिस्ताची निर्मिती आहोत , त्याच्या प्रतिरुपातील आहोत तर ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आमची सहभागीता केवळ ख्रिस्ताशी आणि ज्यांनी त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे, जे ख्रिस्ताशी एकरूप आहेत त्यांच्याशीच होऊ शकते. इतर कोणाशीही नाही !!
म्हणून पौल म्हणतो बंधूंचे मिळणे किती मनोरम आहे.. कारण तेथे ख्रिस्ताची समक्षता असते.
आदाम आणि हवा हे दोघे समान होते म्हणून एकत्र राहिले.
म्हणजे साम्य हवे. आणि आध्यात्मिक साम्य सर्वाधिक महत्वाचे!! कारण अशा साम्यतेत असू तरच एकवाक्यता , प्रभूचा आनंद , शांती , समक्षता याचाच अनुभव येतो.
एकत्र चालण्यासाठी सहमत गरजेचे आहे. प्रभू येशू शुद्ध, निष्कलंक , पवित्र आहे. येशूच्या प्रतिरुपात आम्ही येऊ तरच ख्रिस्ताच्या सहभागीतेचा, व विश्वासणाऱ्यांच्या सहभागीतेचा लाभ घडेल.
देवाचा सहवास ही सोपी गोष्ट नाही! जेव्हा देवाच्या समक्षतेत जातो तेव्हा सर्वकाही बदलून जाते. शत्रूची हत्यारे बोथट होतात.जळते बाण विझतात. संरक्षण लाभते. आत्मविश्वास वाढतो.
आदामाच्या सहभागीतेत प्राणी उपयोगाचे नव्हते.हवेला देवाने तयार केले. प्रतिरुपात घडवले.
तसेच देवाच्या सहवासात राहण्यासाठी प्रतिरूप महत्वाचे आहे.
*जे देवाच्या प्रतिरुपाचे आहेत म्हणजे ज्यांनी प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे, त्यांनाच ख्रिस्ताची सहभागीता लाभते.*
*पित्या तुझ्या प्रतिरुपात घडवून ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तुझी सहभागीता लाभू दिलीस म्हणून तुझे उपकार आम्ही मानतो.*
No comments:
Post a Comment