Tuesday, 27 October 2020

ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी



          *✨ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी✨*


 *ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्लास व आनंद कराल..✍*

                   *( १ पेत्र ४:१३ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


      ख्रिस्ती या नात्याने आमच्यावर दुःखे येणार नाहीत, आम्हाला वेदना होणार नाहीत, मरण येणार नाही असे ख्रिस्ताने आम्हाला अभिवचन दिलेले नाही, याउलट "या जगात तुमचा छळ होईल" असेच ख्रिस्ताने सांगितले आहे. जग ख्रिस्ताचा व ख्रिस्ताच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्वांचाच द्वेष करते, म्हणून खऱ्या ख्रिस्ती माणसाचाही छळ होईलच. ख्रिस्ताच्या कार्यासाठी दुःखसहन करण्याने प्रभूची सेवा करण्यातील विश्वासणाऱ्याच्या आनंदाची खोली किंवा शक्ती वाढते. ह्या कारणामुळे आम्ही ख्रिस्तासाठी दुःखसहनाच्या शक्यतेची भिती बाळगू नये. प्रेषितांना ख्रिस्ताच्या नावामुळे मारहाण केली तेव्हा, वचन सांगते की, *ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढून निघून गेले. ( प्रे.कृत्ये ५:४१)* आपण पाहातो की, ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ नेहमीच होतच आहे. आपण जेव्हा ख्रिस्तासाठी दुःख सोसतो तेव्हाच त्याच्या दुःखाचे वाटेकरी होतो. परंतु त्यामुळे आम्ही दुःख न करता आनंद करावा. देवाला आमचा उपयोग करून घ्यायचा असेल तर व्यक्तिशः आमच्यासाठी नसलेल्या अनेक अनुभवांतून तो आम्हाला नेईल. देवाचा गौरवाचा आत्मा विश्वासणाऱ्यामध्ये वस्ती करतो. छळामुळे ख्रिस्त किंवा देवाची प्रीति यांपासून खरा विश्वासणारा कधीच दूर होत नाही. प्रेषित पौल म्हणतो, *"ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील ? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय ?" ( रोम ८:३५)* ख्रिस्ताची दुःखे सामान्य लोकांसारखी किंवा सामान्य नव्हती. अग्निपरीक्षेसारखी त्याची दुःखे होती. त्याने देवाच्या इच्छेनुसार दुःख सोसले. दुःखाकडे पाहण्याची त्याची दृष्टी आमच्यापेक्षा वेगळी होती. आमच्यातील कित्येक जण दुःख, छळ सोसावे लागले तर देवाला सोडून देतात, देवाच्या मार्गाने चालणे सोडून देतात. आमच्या जीवनात येणाऱ्या दुःखांमागचा प्रभूचा उद्देश जाणून, प्रभूची आमच्या जीवनाद्वारे असलेली योजना आम्ही जाणून घेतली पाहिजे. आम्ही पाप करू नये. ख्रिस्ती जीवनात छळ होतो हे आमच्या पापात राहण्याचे कारण असू नये. आपण विरोध करून कोणाचे वाईट करू नये आणि वाईट करून दुःख भोगू नये. ख्रिस्त कोण आहे हे ओळखून त्याच्याद्वारे देवाचे सदैव गौरव करावे. पेत्र म्हणत आहे की, *ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे 'देवाचा आत्मा' तुमच्यावर येऊन 'राहिला आहे.' ( वचन १४)*


     देवाला आपल्या लोकांना शुद्ध व स्वतःसाठी वेगळे करायचे आहे. त्यासाठी तो आपल्या लोकांना दुःखाच्या मार्गाने नेतो. जर विश्वासणाऱ्यांना शुद्ध होण्याकरीता शिस्त लावण्याची गरज आहे तर जे सुवार्तेचा अपमान करतात त्यांचा नक्कीच कठोर न्याय होईल. आम्ही काय केले पाहिजे ? आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगावे, चांगली कृत्ये करावीत, व स्वतःला विश्वासू देवाच्या हाती सोपवून द्यावे. पेत्र म्हणतो, *ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये, त्या नावामुळे देवाचा गौरव करावा. ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्ये करत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावेत. ( वचन १६,१९)* 


     म्हणून प्रियांनो, जर आम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी आहोत तर देवाने आमच्या व्यक्तिगत इच्छा, आकांक्षा शून्य कराव्यात ह्यासाठी आमची तयारी आहे का ? आम्ही घेतलेले निर्णय प्रभूसाठी बदलून ते रद्द करू देण्यास आमची तयारी आहे का ? आज हे समजून घेण्याची गरज आहे. देव आमच्या जीवनात दुःखाचे, छळाचे, कष्टाचे प्रसंग का आणतो, तो असे का करतो हे आम्हाला माहीत नाही, परंतु तो जे काही करतो ते आमच्या हितासाठीच करतो ह्यावर आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. आणि आमचे जीवन आम्ही आमच्या तारणाऱ्याच्या हाती सोपवून दिले पाहिजे. ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्यामध्ये आनंद मानला पाहिजे. कारण प्रभू आमच्या सहनशीलतेपेक्षा जास्त त्रास आम्हाला होऊ देणार नाही.


       *!!..

                            

No comments:

Post a Comment