*✨बंधुप्रेम आणि प्रीति✨*
*..तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची, बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला..✍🏼*
*( २ पेत्र १:५-७ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
आपण पाहिले की, पेत्राने सांगितले त्याप्रमाणे आम्ही आमच्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची भर घालण्यासाठी काय काय केले पाहिजे. आणि आज आम्ही पाहणार आहोत की सुभक्तीत बंधुप्रेमाची आणि बंधुप्रेमात प्रीतीची भर घालण्यासाठी आम्हाला काय करणे गरजेचे आहे. पवित्र शास्त्रात याविषयी अनेक ठिकाणी लिहिलेले आम्हाला पाहावयास मिळते. देव प्रीति आहे. आणि देवाने आम्हालाही एकमेकांवर, शेजाऱ्यांवर, वैऱ्यांवर प्रीति करण्यास सांगितले आहे. जर आम्ही आमच्या भावावर प्रीति करत असलो तरच आम्ही आमच्या प्रभूवर प्रीति करणारे असू शकतो. आम्ही कशाप्रकारे आपल्या बंधूंवर प्रेम केले पाहिजे, प्रीति केली पाहिजे हे आपण वचनाद्वारे पाहू या -
"आपल्या विश्वासात... बंधुप्रेमाची आणि बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला."
*बंधुप्रेम -* बंधुप्रेम म्हणजे काय ? बंधुप्रेम म्हणजे आपल्या बांधवांबद्दल असलेली जिव्हाळ्याची, आपुलकीची किंवा आपलेपणाची भावना. हे बंधुप्रेम कुटूंबातील सदस्यांमध्ये किंवा घनिष्ठ मित्रांमध्ये असलेल्या भावनिक ओलाव्यासारखे किंवा अत्यंत जिव्हाळ्याच्या नात्यासारखे आहे. ( योहान ११:३६) त्यामुळे आपण केवळ बंधुप्रेम असल्याचा दिखावा करू नये, तर खरोखरच आपल्या बंधुभगिनींवर अगदी मनापासून प्रेम करावे. ( मत्तय २३:८) पौल म्हणतो, *"बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणांपेक्षा थोर माना." ( रोम १२:१०)* पौलाच्या या वचनावरून आपल्या बांधवांबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम किती गहिरं असलं पाहिजे हे दिसून येते. पेत्रही आपल्या पत्रात लिहितो की, *"निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहेत म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीति करा." ( १ पेत्र १:२२)* ख्रिस्ती तत्वांवर आधारित असलेल्या अगापे प्रेमाबरोबरच या प्रकारच्या बंधुप्रेमामुळे देवाच्या लोकांना एकमेकांसोबत सख्य करण्यास आणि ऐक्याने राहण्यास मदत होते. ख्रिस्ती या नात्याने बंधुप्रेमाचा अर्थ केवळ एखाद्या व्यक्तीपूरता किंवा राष्ट्रापूरताच मर्यादित नाही तर आपण आपल्या सर्वच बंधुभगिनींवर प्रेम करतो. मग ते कोणत्याही राष्ट्रातील असोत. ( रोम १०:१२)
*प्रीति -* देवाने आमच्यावर अगापे प्रीति केली. आमची पात्रता नसताना देवाने आमच्यावर प्रीति केली. अगापे ही जे अप्रिय आहेत अशांवर प्रीति करण्याची शक्ती, आम्हाला जे लोक आवडत नाहीत त्यांच्यावर प्रीति करण्याची एक वास्तविकता आहे. देव आम्हाला शत्रूंवरही प्रीति करण्यास सांगत आहे. शत्रूंवर प्रीति करणे म्हणजे आमच्या सर्व स्वाभाविक प्रवृत्त्या आणि भावनांवर विजय मिळविण्यासारखे आहे. प्रभू येशूने आम्हाला दोन मोठ्या आज्ञा उद्धृत केल्या, पहिली ही की, *"तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीति कर."* दूसरी ही की, *"जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर. "* खरा शेजारी कोण ? या पाठामध्ये आपल्या सर्वांना चांगल्या शोमरोनीची गोष्ट माहीत आहे. त्याप्रमाणे आमची प्रीति निर्व्याज असावी, निस्वार्थी असावी. प्रीतीची अनेक रूपे आम्हाला पहिले करिंथ तेरावा अध्यायामध्ये पाहावयास मिळतात. आमच्या ठायी अशीच प्रीति असावी. आमची प्रीति कृतीविना नसावी. पौल म्हणतो, *"मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीति नसली तर मला काही लाभ नाही." ( १ करिंथ १३:३)* आमच्या ठायी जर प्रीति नसेल तर आम्ही वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असे आहोत.
प्रियांनो, हे जे सात गुण आम्ही पाहिले, ते आम्ही आत्मसात करावेत, विकसित करावेत. आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी ते अत्यंत महत्वाचे आहेत. पेत्र म्हणतो, *"कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हाला करतील." ( २ पेत्र १:८)* इतकेच केवळ नाही तर आमच्यामध्ये ही गुणवैशिष्ट्ये असतील तर कोणीही आम्हाला देवापासून, देवाच्या आम्हांवरील प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. पौल म्हणतो, *" माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दूसरी कोणतीही सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयास समर्थ होणार नाही." ( रोम ८:३८,३९)*
No comments:
Post a Comment