Saturday, 31 October 2020

परमेश्वराची दया



            *✨परमेश्वराची दया ✨*


 *आपली वस्त्रे नव्हे, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याजकडे वळा, कारण तो कृपाळू, कन्हवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे, अरिष्ट आणिल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे..✍*

                  *( योएल २:१३ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


       योएल ह्या नावाचा अर्थ *"यहोवा माझा देव"* असा आहे. योएलला *"धर्मसंजीवनाचा संदेष्टा "* असेही म्हटले आहे. पश्चातापाबरोबर धर्मसंजीवनही झालेच पाहिजे हे त्याला चांगले माहित होते. म्हणूनच वरील वचनाद्वारे तो म्हणत आहे की, आपली वस्त्रे नव्हे तर हृदय फाडा. कारण त्याला माहीत आहे की, जेव्हा आम्ही आमची हृदये फाडितो (स्वतःला नम्र करतो) तेव्हाच परमेश्वर आणि आम्हांमध्ये असलेला पडदा फाटला जातो, आडभिंत पाडली जाते आणि देवाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो, स्वर्गाची वाट आमच्यासाठी मोकळी होते. वरील वचनामधून तो आपणास हेच सांगत आहे. कारण आम्ही खरोखरच शुद्ध अंतःकरणाने पश्चाताप केला तरच आम्हाला देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ जाण्याचा रस्ता नीट दिसू शकेल आणि आम्हाला पवित्र आत्म्याची समक्षता अनुभवास येईल. परमेश्वराला आपला कळवळा येईल. तो म्हणतो, *परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे, असे की, जेणेकरून तुम्हांस त्याला अन्नार्पण व पेयार्पण करिता येईल. ( वचन १४)*


     पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचतो की इस्राएल राष्ट्रावर भयंकर टोळधाड आली होती. टोळांनी सर्व फस्त केले. हिरवळ, झाडांची पाने, अंकुर सर्व काही फस्त केले. इस्राएल लोकांच्या पापांमुळेच हे संकट आले असे योएल म्हणत आहे. टोळधाडीनंतर दीर्घकाळ अवर्षण आल्यामुळे देशात भयंकर दुष्काळ पडला. त्यांची गुरेढोरे अन्नपाण्यावाचून तडफडत होती. सर्व लोक हवालदिल झाले होते. म्हणूनच तो देवापासून आलेल्या ह्या पीडेचा आणि शिक्षेचा आधार घेऊन आपल्या लोकांना पश्चाताप करण्याचे आवाहन करीत आहे. त्यांना उपास करण्याचे आवाहन करीत आहे. तो म्हणतो, *आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनःपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. ( वचन १२)* म्हणजे परमेश्वराला दया येईल. कारण तो दयाळू, कनवाळू, करुणा करणारा देव आहे.


     परमेश्वराने त्यांची विनवणी  ऐकून त्यांच्या सर्व समस्या सोडवून त्यांना आशीर्वादित केले. त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण केल्या. त्यांना विपूल पर्जन्यवृष्टी केली, *त्यांची खळी गव्हाणे भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षारसाने व तेलाने उपळून जातील.* असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, *मी तुम्हांस धान्य, नवा द्राक्षारस व तेल पाठवून देतो, त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल, यापूढे राष्ट्रांमध्ये मी तुम्हाला निंदास्पद करणार नाही. ( वचन १९)* परमेश्वराने त्यांना आध्यात्मिक दृष्टीने देखील आशीर्वादित केले. परमेश्वर म्हणतो, *मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील. तेव्हा असे होईल की, जो परमेश्वराचा धावा करील तो तरेल, कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे "निभावलेले सियोन डोंगर व यरूशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यांत राहतील." ( वचन २८,३२)*


     प्रियांनो, देवापासून मिळणारे आशीर्वाद मिळविण्यासाठी आपणही अंतःकरणापासून पश्चाताप करुन प्रभूसमोर धूळीत बसले पाहिजे, आपली हृदये फाडली पाहिजेत कारण आजच्या काळातील मंडळीची अवस्था अशीच ओसाड टोळधाडींनी नाश केल्यासारखी झाली आहे, अनेक आध्यात्मिक वैऱ्यांनी मंडळीची अशी दुर्दशा केली आहे. म्हणून जर आम्ही प्रभूकडे परत गेलो तर तो आमच्यावर दया करील आणि तो आपले अभिवचन पूर्ण करील. आमच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव करील, आमच्यावर आशीर्वादांची ओतणी करील. आणि *टोळांनी फस्त केलेल्या वर्षांची भरपाई करून देईल.*


        *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*


     *

No comments:

Post a Comment