Sunday, 18 October 2020

पावित्र्याचा स्पर्श

 *निर्गम ३:१-६*


           *पावित्र्याचा स्पर्श*

      *करणारी पवित्र जागा*



    *देव त्यास म्हणाला इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे .* 

           *निर्गम ३ : ५*


       

      त्या दिवशी देवाने स्वतःची समक्षता  मोशेसमोर प्रकट करण्यासाठी  विशिष्ट जागा निवडली होती. ते झुडूप जळत होत पण भस्म होत नव्हते. *प्रत्यक्ष परमेश्वराचे पावित्र्य तेथे उतरून आले होते*. ती जागा पवित्र झाली होती. जरी परमेश्वर सर्वव्यापी आहे तरी खास ती जागा प्रभूने त्या दिवशी स्वतःच्या समक्षतेने मोशेसाठी पवित्र केली होती. कारण मोशे देवाचे निवडलेले पात्र होता.

      मोशे आश्चर्यचकित झाला आणि त्या झुडुपाच्या जवळ जाऊ लागला पण परमेश्वराने मोशेला स्पष्टपणे सांगितले की तू तुझ्या पायातील जोडे काढून ठेव. *बघा त्याने पायातील जोडे काढल्यावर काहीतरी अदभुत अनुभूती मोशेला नक्कीच आली ती म्हणजे परमेश्वराच्या पावित्र्याचा प्रत्यक्ष स्पर्श!!* ज्यामुळे त्याचे जीवनच बदलून गेले. 

    *जेथे परमेश्वराची उपस्थिती उतरून येते, पावित्र्य उतरून येते ती जागा खास असते की ज्याठिकाणी प्रभूच्या प्रेमळ स्पर्शाची जाणीव होते , जीवनात उत्साह, आनंद, शांती , प्रीति याचा अनुभव येतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण भरून जातो देवाच्या कार्यासाठी !! *परमेश्वराच्या कृपेने ती जागा आजही आमच्यासाठी उपलब्ध आहे ती म्हणजे आपले पवित्र मंदिर !* 

     *कारण  प्रभू येशु ख्रिस्त स्वतः म्हणतो , जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात तेथे मी म्हणजे स्वतः ख्रिस्त आहे.* मंदिर आणि मंडळी ही देवाची दैवी योजना आहे. सर्व विश्वासणाऱ्यांनी एकत्र येऊन प्रभूची भक्ती, आराधना आणि गौरव करावे यासाठी. *जेव्हा सर्व येशूच्या नावाने एकत्र जमतात तेव्हा तेथे ख्रिस्त आमच्या मध्ये उपस्थित असतोच कारण ते त्याने स्वतः दिलेले अभिवचन आहे.* 

    पण या पवित्र जागेत जाण्यापूर्वी मात्र प्रभू येशू पायातले जोडे काढायला सांगतो. *आज आमच्या पायात एकमेकांविषयी असणाऱ्या द्वेषाचे , आकसाचे , आत्मप्रौढीचे, अविश्वासाचे , अहंकाराचे जोडे आहेतच.. ते मात्र काढूनच ह्या पवित्र मंदिरात गेलो तरच प्रभूच्या ह्या पवित्र उपस्थितीचा स्पर्श आपल्याला होईल , नाहीतर नाहीच होणार कारण हे जोडे फक्त दूषप्रवृत्तीचाच स्पर्श वाढवून प्रभूच्या पवित्र सहभागीतेचा आणि पावित्र्याचा स्पर्श होऊ देत नाहीत.* 

     *काढून  टाकू आपण हे दूषप्रवृत्तीचे जोडे आणि अनुभवू ख्रिस्ताच्या पावित्र्याचा स्पर्श पवित्र मंदिरात जसा मोशेने अनुभवला !!*

   *सामर्थ्यशाली पित्या तुझ्या पवित्र स्पर्शाची ओढ मला लागली आहे , म्हणून मंदिरात, मंडळीच्या सहभागीतेत जातांना माझे दूषप्रवृत्तीचे जोडे मी काढावेत असेच कर.* *आमेन*

     

No comments:

Post a Comment