Monday, 12 October 2020

हृदय उघडा



                *✨हृदय उघडा✨*


 *पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आंत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील..✍🏼*

                     *( प्रकटी ३:२० )*


                          *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


     या वचनामधील आर्जवी, कृपेचे स्नेहमय आमंत्रण हे मंडळीतील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. जो कोणी सहभागितेचे दार उघडील त्याच्याबरोबर जीवनातील बारीक सारीक गोष्टीतही सहभागी होण्यासाठी पुनरूत्थित प्रभूने हे आवाहन केले आहे. हे आमंत्रण ख्रिस्ताबरोबरच्या नात्याकडे दुर्लक्ष करीत त्याच्यापासून दूर जाणाऱ्या मंडळीतील लोकांसाठी आहे. समृद्धीतून येणारी स्वयंपूर्णता आणि प्रपंचातील रस अशा जगीक गोष्टींच्या विपूलतेमुळे लावदिकीयाच्या मंडळीने आपल्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताला बाजूला केले होते. प्रभू त्यांच्याविषयी म्हणतो की, *मी श्रीमंत आहे, मी 'धन मिळविले आहे', व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; ( वचन १७)* दाराच्या बाहेरून दिलेले ख्रिस्ताचे आमंत्रण म्हणजे पश्चाताप करून विश्वासाने त्याच्याकडे वळणाऱ्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती आहे. त्याच्यासोबत मेजाभोवती बसून आध्यात्मिक आणि पौष्टिक आहार घेण्यासाठीचे हे आमंत्रण आहे. आम्ही ख्रिस्ताच्या या आमंत्रणाचा स्वीकार केला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर त्याच्या सहभागितेत राहिले पाहिजे.


    कोणते दार प्रभू ठोकत आहे ? हे दार आमच्या हृदयाचे आहे. तो आमच्या हृदयाचे दार ठोकत आहे. प्रियांनो, जर तुम्ही आज त्याचा आवाज ऐकला, शब्द ऐकला तर आपले हृदय कठीण करू नका, आपल्या हृदयाचे दार बंद करू नका. हृदयाचे दार उघडा, प्रभूला आंत येऊ द्या. अन्यथा, शुनेमकरीणसारखे आमचे होईल. तिचा वल्लभ म्हणजे प्रभू तिच्या दाराशी उभा राहून दार ठोकत होता, पण तिने त्याच्यासाठी लवकर दार उघडले नाही. म्हणून तो निघून गेला. तो गेल्यानंतर तिने दार उघडले तो, तो गेला होता. ती त्याला शोधायला बाहेर पडली तेव्हा आपण पाहातो, तिला मार बसला आणि तिचा शेला म्हणजे तिची तारणाची वस्त्रे काढून घेतली गेली. शुनेमकरीण म्हणत आहे की, *"नगरात फिरणारे जागल्ये मला भेटले; त्यांनी मला मार देऊन घायाळ केले; तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला." ( गीतरत्न ५:७)*


    लावदिकीयाच्या मंडळीने जरी प्रभूचा त्याग केला होता तरीसुद्धा येशू दार ठोकत राहिला, तो त्यांनी दार उघडण्याची वाट पाहात राहिला, ह्यासाठी की, त्यांनी दार उघडावे तो त्यांचे हृदय आपल्या प्रीतीने भरू इच्छितो. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आमच्या हृदयाचे दार ठोकत आहे. आम्ही त्याला आंत आमंत्रित करावे याची तो वाट पाहात आहे. म्हणून आम्ही वेळ न दवडता आमच्या हृदयाचे दार उघडावे आणि प्रभूला आमच्या हृदयात घ्यावे. आम्ही तयार आहोत काय ? आजच प्रभूला आमच्या हृदयात आमंत्रित करू या. त्याच्या समक्षतेमध्ये राहून आध्यात्मिक मान्ना प्राप्त करू या, तो सेवन करून तृप्त होऊ या.


         

No comments:

Post a Comment