*✨माघार घेऊ नका✨*
*आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही..✍*
*( प्रे. कृत्ये ५:४२ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करण्याची आज्ञा केली आहे. आम्ही प्रभूचे हे कार्य जोमाने केले पाहिजे. ते करीत असताना आम्ही हे लक्षात ठेवावे की, जेव्हा आम्ही प्रभूचे कार्य करीत असतो तेव्हा सैतानाचा व सैतानी शक्तींचा विरोध नक्कीच होतो. कारण सैतानाला आम्ही देवाजवळ गेलेले आवडत नाही. म्हणून तो नेहमी आम्हाला देवापासून दूर खेचण्याच्या प्रयत्नात असतो. आज ह्या जगामध्ये ख्रिस्ती लोकांना खूप छळाला तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी चर्चेसवर हल्ले झालेले आपण ऐकतो. हे हल्ले प्रभूची सेवा करणाऱ्या त्याच्या सेवकावर किंवा मंडळीवर होतात. प्रभूचे लोक विरोधाच्या जणू तप्त भट्टीत देवाची सेवा करीत आहेत. एक मात्र खरे की, जेथे विरोध होतो तेथे देवाचे कार्य म्हणजेच सुवार्तेने आत्मे जिंकण्याचे कार्य अव्याहत चालूच असते. विश्वासणाऱ्यांना आपल्या नियंत्रणाखाली आणून सैतान हे हल्ले आजही करीत आहे. प्रेषितांच्या काळात लबाडी व इतर पापे मंडळीत आणून तिला दुर्बल करण्याचा प्रयत्न यशस्वीपणे अडविण्यात आला होता. आपणही सैतानाच्या या मोहाला विरोध केला पाहिजे. त्याला अडविले पाहिजे. म्हणजे त्याला आपल्याला नमविता येणार नाही किंवा आपल्याला वश करून घेता येणार नाही. पेत्र म्हणतो, *सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्याविरूद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधूवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. ( १ ले पेत्र ५:८,९)* आणि म्हणूनच पौलही आपल्या पत्रात म्हणत आहे की, *सैतानाला वाव देऊ नका. ( इफिस ४:२७)* प्रेषित ह्या सर्व गोष्टी जाणून घेऊन त्याप्रमाणेच वागत होते. देव त्यांच्याबरोबर राहून कार्य करीत होता. तुरूंगाचे बंद दरवाजेही देवाचे कार्य अडवू शकले नाहीत. देवाचे महान सामर्थ्य पाहूनही त्याकाळचे पूढारी ते मान्य करीत नव्हते. कारण ते ख्रिस्ताचा पराकोटीचा द्वेष करीत होते, मत्सर करीत होते. आणि हा द्वेष, मत्सर हाही एक भयानक तुरूंगच आहे.
प्रेषितांप्रमाणे आम्हीही देवाची आज्ञा पाळली पाहिजे. पूढाऱ्यांच्या रागाची भट्टी सातपट तप्त झाली होती परंतु तरीही प्रेषितांचे धैर्य किंचितही ढळले नाही. कारण ते देवाची आज्ञा पाळीत होते आणि देवाचे कार्य करीत होते. त्यामुळे ते मरणालाही भीत नव्हते. आम्हीही न घाबरता देवाची सुवार्ता गाजविली पाहिजे. *येशू उच्च पदावर, स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहे, देवाने त्याला आपल्या उजवीकडे बसवले आहे. आणि त्याच्याद्वारे पश्चाताप व पापांची क्षमा ही मिळतात.* देवाचे कार्य कोणीच नष्ट करू शकत नाही. त्यामुळे विरोध झाला असता निराश होऊ नये. प्रेषितांना विरोध होत होता तेव्हा गमलिएल शास्रपंडिताने उदाहरणे देऊन विरोधकांची तोंडे बंद केली. अर्थातच तो त्यांची वृत्ती बदलू शकला नाही. परंतु त्यांच्या वर्तनामुळे प्रेषितांचा सुवार्तेचा निश्चय अधिकच दृढ झाला. आणि अधिक जोमाने त्यांनी देवाचे कार्य करण्यास सुरूवात केली. आम्हीही देव आमच्या बरोबर आहे हे लक्षात आणून न भिता सुवार्ता सांगितली पाहिजे. आणि देवाची आज्ञा पाळली पाहिजे.
*ख्रिस्तामुळे जीवन मिळते, शांती मिळते व पापापासून वेगळे राहून पवित्र जीवन जगता येते.*
*!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*
*परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!*
No comments:
Post a Comment