Tuesday, 27 October 2020

लबाडीपासून दूर राहा

             ✨लबाडीपासून दूर राहा✨


 *.... लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील..✍*

                *( प्रकटी २२:१५ )*


                          *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


      प्रकटीकरणाच्या या अध्यायामध्ये आपण पाहातो की, प्रभू म्हणत आहे की मी लवकर येतो. प्रभूच्या आगमनसमयी जे शुद्ध आणि पवित्र आहेत, सर्व वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतात, वरील वचनामध्ये सांगितलेल्या सर्व दुष्कर्मापासून दूर राहतात तेच केवळ प्रभूबरोबर उचलले जातील. असे लिहिले आहे की, *आपल्याला 'जीवनाच्या झाडावर' अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले 'झगे धूतात' ते धन्य. ( वचन १४)* असेच लोक फक्त प्रभूबरोबर जाऊ शकतील. *.... सर्व लबाड माणसे  ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल, हेच ते दूसरे मरण आहे. ( प्रकटी २१:८)*


    परंतु प्रियांनो, प्रभूची इच्छा नाही की एकाही आत्म्याचा नाश व्हावा. देवाने संपूर्ण जगाच्या तारणासाठी अभूतपूर्व योजना करून स्वतःच्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवले, यासाठी की, सर्वांना स्वर्गाचे राज्य म्हणजेच सार्वकालिक जीवन मिळावे. देवावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी देवाने तारणाची योजना करून ठेवली आहे. परंतु त्यासाठी आम्ही देवाच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवला पाहिजे, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण जो कोणी त्यांजवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन लाभते. *देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांस सार्वकालिक जीवन लाभले आहे. ( १ ले योहान ५:१३)* परंतु आज आपणांस पाहावयास मिळते की, अनेक लोक देवावर, त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना होणारे शासन निश्चित आहे. *मार्क १६:१६* मध्ये लिहिले आहे की, *जो विश्वास धरत नाही तो दंडास पात्र ठरेल.* ज्या अर्थी आपण विश्वास करीत नाही त्याअर्थी आपण लबाड आहोत. 

    *आपण कोणाविषयी लबाडी करतो ?* वचनाद्वारे पाहूया -


   *१) आपण देवावर विश्वास ठेवत नाही -* आकाश, पृथ्वी, संपूर्ण सृष्टी आणि आमचीही निर्मिती ज्या परात्पर देवाने केली, त्याच्यावर विश्वास न ठेवणे म्हणजे देवाबरोबर लबाडी करणे होय. *जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष आहे, ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरविले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. ( १ ले योहान ५:१०)* देव प्रीति आहे, त्याची दया सनातन आहे. देवाच्या अपार प्रीति द्वारेच आपण त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे स्वर्गात प्रवेश करू शकतो. म्हणून आपण ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. देवावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने प्रेम केले पाहिजे. 


    *२) येशू हा ख्रिस्त आहे हे नाकारतो -* बायबल आम्हाला शिकवते, प्रभू येशू हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे. आणि तरीही *येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे ? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. ( १ ले योहान २:२२)* प्रभू येशूने आपण पापी असतांना आपल्या पापासाठी स्वतःच बलिदान होऊन, आपले पाप त्याच्या अनमोल रक्ताने धूवून शुद्ध केले. त्यानें मरणाच्या द्वारे जो शेवटचा शत्रू मृत्यू त्यास पराजित केले. मरणावर विजय मिळवून पून्हा जिवंत होऊन आपल्याला सार्वकालिक जीवनाची, पुनरुत्थानाची एक धन्य आशा दिली. म्हणून आपण येशूला पूर्णपणे स्वीकारले पाहिजे.


    *३) आपण पाप केले नाही असे जो म्हणतो -* सर्व मानवजात पापी आहे, परिपूर्ण कोणीच नाही. असे असतानाही जर, *आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. ( १ ले योहान १:१०)* प्रत्येक मनुष्याने पाप केलें आहे, पाप करत नाही असा कोणी या पृथ्वीवर मनुष्य आढळणार नाही. दाविद राजा आपल्या स्तोत्रामध्ये लिहितो की, माझ्या आईने गर्भधारण केले तेंव्हाचाच मी पातकी आहे.


     *४) पवित्र आत्म्याशी लबाडी -* हनन्या आणि सपीराने शिष्यांबरोबर खोटे बोलून, लबाडी करून त्यांना फसविले. तेव्हा पेत्र म्हणाला, *"हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे ?" ( प्रे. कृत्ये ५:३)* आपण जे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणाने चालवले जातो, ते आपण त्याविषयी विश्वासयोग्य राहिले पाहिजे, आत्मा सत्य आहे म्हणून पवित्र आत्म्याला "सत्याचा आत्मा" म्हटले आहे, जर आपल्यामध्ये हा सत्याचा आत्मा आहे तर आपण कधीच लबाडी करू शकणार नाही, हनन्या आणि सपीरा सारखे दुष्ट मन आपल्या कोणाचे नसावे.


      म्हणजेच थोडक्यात, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांना जो नाकारतो तो सत्याशी लबाडी करतो. आणि सत्य म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त होय. कारण तो म्हणतो, *मार्ग, सत्य व जीवन मी आहे.* म्हणून प्रियांनो, आम्ही सत्याविषयी कधीच लबाडी नाही केली पाहिजे. याकोब म्हणतो की, *पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका, व सत्याविषयी लबाडी करू नका. ( याकोब ३:१४)* म्हणून आम्ही लबाडी करू नये. लबाडी करणे सोडून द्यावे. पौल म्हणतो, *म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहों. ( इफिस ४:२५)* आणि पूढे तो अशा लबाड माणसांपासूनही आम्हास दूर राहाण्यास, सावध राहाण्यास सांगत आहे. पौल म्हणत आहे, *त्या कुत्र्यांविषयी सावध असा, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, केवळ दैहिक सुंता झालेल्यांविषयी सावध असा. ( फिलिप्पै ३:२)* म्हणून आम्ही सावध राहावे आणि लबाडीपासून दूर राहावे.


        


                          

No comments:

Post a Comment