Monday, 12 October 2020

पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन व वाणी ओळखा

 प्रे. कृ. ८:२६-३५

  

  *पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन*

           *व वाणी ओळखा*


   *इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला  म्हटले, उठ , जी वाट यरूशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा ; ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला.* *प्रे. कृ . ८:२६-२७*


 हे पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन होते , ही पवित्र आत्म्याची वाणी होती फिलिप्पासाठी. त्याने ती ओळखली आणि कुठलीही शंका मनात येऊ न देता तो त्याच क्षणी सरळ गज्जाकडे  निघाला. वास्तविक त्याचे शोमरोनात संजीवनाचे अद्भुत कार्य चालू होते , ते सोडून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार त्या ओसाड ठिकाणी जाण्यास निघाला. 

   सुवार्तेच कार्य करताना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन फार महत्वाचे आहेच. आणि हीच वाणी ओळखता आली पाहिजे. पुष्कळदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या आरामदायी वाटणाऱ्या परिघाच्या बाहेर पडायला नको वाटते. Comfort zone सुरक्षित वाटत असतो. पण प्रभूच्या योजना आमच्या योजना आणि कल्पना याहून भिन्न असतात , महान असतात. एक एक व्यक्ती , आत्मा प्रभूच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. फिलिप्पाच मोठं कार्य शोमरोनात चालू असताना देवाच्या आत्म्याने एकट्या षंढासाठी  ओसाड ठिकाणी पाठवलं आणि फिलिप्प धावला सर्व सोडून. परमेश्वराची योजना असेलच की या षंढाद्वारे एथिओपियात सुवार्ता सांगितली जावी. कारण हा मनुष्य एथिओपियाचा होता. 

    प्रभू कोणाकरवी  अद्भुत कार्य करून घेईल हे आपल्याला समजत नाही. कॅम्बेल  नावाच्या साधारण अशा संडेस्कुल शिक्षकाला  चप्पलच्या दुकानात काम करणाऱ्या १९वर्षाच्या तरुणाला प्रभूची सुवार्ता सांगावी अशी प्रेरणा पवित्र आत्म्याने दिली. त्यांनी लगेच प्रभू येशूविषयी त्या तरुणाला सुवार्ता सांगितली. आणि ह्या तरुणाचं जीवनच ढवळून निघाले. आणि त्याने फक्त ख्रिस्ताचाच ध्यास घेतला. इंग्रजी येत नसतानाही तोडक्या मोडक्या इंग्रजी भाषेत सुवार्ता गाजवू लागला आणि लाखोंच्यावर लोकांना ख्रिस्ताकडे आणले. *हा तरुण म्हणजे सुप्रसिद्ध सुवार्तिक , देवाचे महान सेवक डी. एल . मूडी होय.* पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे  संडेस्कुल शिक्षक कॅम्बेल यांनी आज्ञापालन केले म्हणून मूडींच्याद्वारे परमेश्वराने महान कार्य करवून घेतले. कारण हीच परमेश्वराची योजना होती.

    *कुणी सांगावं आमच्या कडून सुद्धा असे कार्य  घडू शकेल. पण गरज आहे ती पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आणि वाणी ओळखण्याची.*

*आणि त्याप्रमाणे आज्ञापालन करण्याची.* यासाठी स्वर्गात आमचं प्रतिफळही मोठं आहे.

   *प्रार्थना करू आपण की , प्रभू येशू पवित्र आत्म्याची वाणी ओळखून त्याप्रमाणे आमच्या हातून तुझे कार्य करवून घे.*   *आमेन*

    

No comments:

Post a Comment