देव एका मंदिर उभारीत आहे
इफिस.२ः१९-२२
येशू ख्रिस्त त्याची मंडळी रचीत आहे. तो पृथ्वीवर असताना म्हणाला होता, ‘‘मी माझी मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही’’ (मत्तय.१६ः१८). आपण ह्या इमारतीचे जिवंत धोंडे आहोत, शिवाय इतरांनी ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करावा म्हणून आपण त्यांच्याप्रत शुभवर्तमान घेऊन जातो तेव्हा आपणांला या बांधकामात देवाचे सहकारी म्हणून वाटा असतो. ख्रिस्ताने येऊन शांतीचा संदेश दिला, आता आपण त्याला तारणारा म्हणून ओळखणार्यांनी इतरांना तीच शांती प्राप्त व्हावी म्हणून हे शुभवर्तमान गाजवले पाहिजे. येशूने पित्याला सांगितले, ‘‘जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीही त्यांना जगात पाठवले’’ (योहान.१७ः१८). पित्याकडे वर जाण्यापूर्वी येशूने विश्वासणार्यांना महान आज्ञा दिली, ‘‘स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बास्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे’’ (मत्तय.२८ः१८-२०).
ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतात ते जिवंत धोंडे बनतात, ते देवाच्या इमारतीमध्ये चपखल बसवले जातात. वेगवेगळ्या आकाराच्या लहानमोठ्या दगडांप्रमाणे विश्वासणारे एकमेकांपासून वेगवेगळे असतात, पण त्याच्या इमारतीत देवाने प्रत्येकाला एक विशिष्ट स्थान दिले आहे.
पौलाच्या काळातील लोकांना हे चांगलेच माहीत होते की, दगडांना इमारतीमध्ये चपखल बसवावे म्हणून त्यांना आकार देण्यास बरेच कष्ट घ्यावे लागत. पौल यावर भर देत आहे की, विश्वासणारे हे केवळ देवाच्या इमारतीतील दगड नाहीत, तर त्यांना योग्य ठिकाणी बसवण्यास देवाला त्यांना आकार द्यावा लागतो. दगड जितका कठीण तितके बांधणार्याला त्याला जसा पाहिजे तसा बनवण्यास वेळ लागतो. जिवंत धोंडे म्हणून ही प्रक्रिया वेदनादायक वाटते, पण शेवट चांगलाच होतो. म्हणूनच रोम.८ः२८ मध्ये म्हटले आहे, ‘‘आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.’’
No comments:
Post a Comment