माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात..
( योहान १०:२७ )
प्रभू येशूने आपल्याला या वचनातून खूप छान बोध केला आहे. तो स्पष्ट म्हणत आहे की *"माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात!"* प्रभू येशूची इच्छा आहे की आपण त्याची वाणी म्हणजेच परमेश्वराचा आवाज ऐकावा. देवाने आपल्यावर सर्वात जास्त प्रीति केली आहे. संपूर्ण जगासाठी त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखून न ठेवता तुमच्या माझ्यासाठी दिले, यासाठी की त्याच्या द्वारे तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवन प्राप्त करावे. म्हणुन आपण प्रत्येकाने प्रभू येशूचा आवाज ऐकणे गरजेचे आहे. त्याचे वचन आचरणात आणणे गरजेचे आहे. जो कोणी येशू वर विश्वास करतो तोच येशूला ओळखू शकतो. येशूच्या पवित्र रक्ताने तुम्ही आणि मी पापापासून मुक्त झालो आहोत. जुन्या करारात इस्रायल लोकांनी आपली मने कठीण केली, त्यांनी परमेश्वराच्या वाणी कडे लक्ष दिले नाही. निर्गमच्या पुस्तकात आपण पाहातो की, इस्राएल लोक कशाप्रकारे फारोच्या, मिसरी लोकांच्या दास्यात होते. कारण त्यांनी देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष केले होते. किंबहुना असे म्हणणे जास्त सयुक्तिक राहिल की त्यांनी देवाच्या आवाजाविरूध्द बंड केले होते. यिर्मया संदेष्ट्याने मिसर देशाची तुलना धगधगत्या लोखंडी भट्टीबरोबर केली आहे. परमेश्वर म्हणतो की, *"ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांस मिसर देशातून, लोखंडी भट्टीतून बाहेर काढले, त्या दिवशी मी हा करार त्यांस आज्ञापिला व म्हटले, " माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन." ( यिर्मया ११:४)* परमेश्वराचा मुख्य उद्देश हा होता की, इस्राएल लोकांना फारोच्या तावडीतून सोडवणे व त्यांना देवाची मुले बनविणे. ते देवाची वाणी ऐकून आज्ञापालन करतील तर आशीर्वादित होतील असे परमेश्वर त्यांना सांगत आहे. परंतु त्यांनी देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. अन्य दैवतांच्या नादी लागले.
देवाचे वचन माहित असणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्यापेक्षा महत्वाचे हे आहे की, आपल्याला ऐकणारे कान आणि आज्ञापालन करणारे जीवन किंवा मन असावे. म्हणजेच आम्ही केवळ ऐकणारे नसावे तर कृती करणारे, देवाच्या आज्ञांचे पालन करणारे असावे. शौलाच्या जीवनात आपण पाहातो की, परमेश्वर म्हणाला, "सर्व अमालेकी लोकांचा संहार कर. त्यांचा पूर्णपणे नाश कर." परंतु शौलाने देवाने जे सांगितले तसे न करता स्वतःच्या मनाप्रमाणे केले. त्याने देवाच्या वाणीशी समझोता केला. त्याचा परिणाम असा झाला की, तो परमेश्वराला अनुसरला नाही व राजा बनण्यास पात्र राहिला नाही. परिणामी त्याच्या हातातून राज्य, राजेपद काढून घेण्यात आले. देवाची वाणी ऐकणे व त्याप्रमाणे करणे हे खूप महत्वाचे आहे. खरी मेंढरे देवाची वाणी ऐकतात. आपण यिर्मयाची साक्ष पाहातो, यिर्मया म्हणतो, *"मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली, तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्लास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणांस तुझा म्हणवितो." ( यिर्मया १५:१६)*
परमेश्वर म्हणतो, *"त्याला त्याची मेंढरे ठाऊक आहेत."* देवाला त्याची मेंढरे (म्हणजेच आम्ही विश्वासणारे, निवडलेले ) माहीत असणे किंवा तो त्यांना ओळखत असणे ही किती छान गोष्ट आहे ! परंतु खेदाची गोष्ट आहे की देवाला आम्ही माहीत आहोत पण अनेकांना देवाबद्दल माहीती नाही. अशा लोकांबद्दल परमेश्वर म्हणतो की, *"त्या दिवशी पुष्कळ लोक मला येऊन म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय ? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा." ( मत्तय ७:२२,२३)* म्हणून आम्ही अनाचारापासून दूर राहावे आणि सात्विक जीवन जगावे. प्रभू म्हणतो, *"जर कोणी माझ्यामागे येऊ पाहातो त्याने आत्मत्याग करावा व स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे."* हा वधस्तंभ कशाला दर्शवितो ? हा वधस्तंभ म्हणजे काय ? हा वधस्तंभ म्हणजे छळ, व्यंगत्व, भूक, एकटेपणा, त्रास, किंवा मृत्यू इत्यादि. ख्रिस्ती जीवन जगत असताना अशा अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते. वचन सांगते, *"तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हांपैकी कित्येकांस तुरूंगात टाकणार आहे." ( प्रकटी २:१०)* म्हणून प्रभू म्हणत आहे की, *"शेवटपर्यंत म्हणजे मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन."* म्हणून आपण देवाची वाणी ऐकून त्याची इच्छा पूर्ण करावी. त्याचे विश्वासू दास बनण्यासाठी आणि मुकुट मिळविण्यासाठी त्याच्या आज्ञेचे पालन करून त्याच्या मार्गाने चालावे.
No comments:
Post a Comment