*✨सात्विकता✨*
*..तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची, बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला..✍🏼*
*( २ पेत्र १:५-७ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
ज्या सात गुणवैशिष्ट्यांबद्दल आणि ती आत्मसात करण्याबद्दल पेत्र आम्हाला सांगत आहे ती गुणवैशिष्ट्ये आम्ही पाहणार आहोत. काल आपण पाहिले की या सर्वांचा पाया विश्वास आहे. आणि आपल्या ठायी असलेला विश्वास हा मजबूत असला पाहिजे. तरच ही गुणवैशिष्ट्ये आम्ही आत्मसात करू शकतो, विकसित करू शकतो. या सर्व सद्गुणांचे माप जेवढे भरलेले असेल, त्या प्रमाणात आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात भर पडेल. कारण त्याला ओळखणे, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा स्वीकार करणे हेच सार्वकालिक जीवन आहे. आणि तारण दूसऱ्या कोणाकडूनही नाही. ( प्रे. ४:१२) विश्वासानंतर आपण पाहणार आहोत सात्विकतेबद्दल. पेत्र आम्हाला विश्वासात सात्विकतेची भर घालण्यास सांगत आहे. सात्विकता आत्मसात करण्यासाठी आम्ही काय करावे वचनाद्वारे पाहू या -
*सात्विकता -* सात्विकता म्हणजे सदाचरण किंवा नीतिमत्व. शब्दकोशकार मार्व्हिन आर. व्हिन्सेंट म्हणतात, सात्विकता असे भाषांतरित केलेल्या या शब्दाचा मूळ साहित्यिक अर्थ "कोणत्याही प्रकारचा उत्कृष्टपणा" असा होतो. किंवा "योग्यतेच्या दर्जाचे पालन करणे" अशीही सात्विकतेची व्याख्या होऊ शकते. हा उत्कृष्टपणा प्राप्त करण्यासाठी काय करावे लागेल ? त्यासाठी सुजाणता, धैर्य, आत्मशिस्त, न्यायीपणा, दयाळूपणा, चिकाटी, नम्रता, प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठपणा हे गुण आमच्यामध्ये असतील तर आम्हाला सात्विक किंवा नीतिमान ठरवले जाऊ शकते. सर्व बाबतीत जे नेहमीच बरोबर आहे तेच सदैव करीत राहावे. ( इब्री १३:१८) सात्विक वर्तन राखण्यासाठी आपली वर्तणूक दोषहीन, चांगले असावी ( अनुवाद २५:१३-१६, रोम १३:१, तीत २:९,१०) अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. फक्त वाईट गोष्टी टाळणे म्हणजेच सात्विकता नाही किंवा सात्विकतेविषयी फक्त ज्ञान असून उपयोग नाही तर सात्विकता धारण केली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. आपल्याला सात्विक वर्तन ठेवायचे असेल तर चांगले आणि वाईट किंवा योग्य अयोग्य यासंबंधी काही निश्चित मापदंड असण्याची गरज आहे ज्याच्या आधारे एखादी कृती, मनोवृत्ती किंवा व्यक्ती किंवा गुण हे योग्य आहे की नाही हे ठरवता येईल. त्याचप्रमाणे सात्विक वर्तन असावे म्हणून देवाच्या वचनांची केवळ माहिती असून चालत नाही तर त्यात लिहिलेल्या गोष्टींचे मनन चिंतन करून त्याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, *"अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे ! दिवसभर मी त्याचे मनन करितो." ( स्तोत्र ११९:९७)*
एखादी कृती, विचारधारा किंवा प्रवृत्ती योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्यासाठी देवाने दिलेला बऱ्या - वाईटाचा दर्जा हा एक आधारभूत मानला जातो. सात्विकतेने चालण्यासाठी शास्त्रवचनांमध्ये दिलेल्या परमेश्वराच्या नीतिमत्तेच्या दर्जाचे पालन आम्हाला करावे लागेल. प्रेषित पौल म्हणतो, *"प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा." ( २ तीमथ्य ३:१६,१७)* आम्हीही प्रयत्नपूर्वक सात्विकता आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, देवाच्या दृष्टीने परिपूर्णता, नीतिमत्व प्राप्त केले पाहिजे. योग्य अयोग्य समजण्यासाठी देवाचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.
जो विश्वासात चालतो, ज्याने प्रभू येशूवर विश्वास करून तारण मिळवले आहे, तोच सात्त्विकतेने जीवन जगत असतो. कारण तो फक्त चांगल्या गोष्टीची आवड करतो. एक विशेष म्हणजे सर्व वाईट गोष्टींचा तो तिटकारा करून प्रभू च्या मार्गाने चालतो. प्रभू अशा लोकांना त्याच्या पंखाखाली सुरक्षित ठेवतो. त्याचा सांभाळ करतो. त्यास आरोग्य देतो. त्याला सर्व शत्रू पासून सुरक्षित ठेवतो. यशया मध्ये परमेश्वराने खूप सुंदर अभिवचन दिले आहे.... *"तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, "" हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे,"" असे परमेश्वर म्हणतो".
(यशया ५४:१७)*
No comments:
Post a Comment