*याकोब १ : १९-२७*
*वचनाची जाण आहे ,*
*पण*
*आचरणाची वाण आहे*.
*जर ह्या गोष्टी (प्रभूची वचने) तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा*
*योहान १३ : १७*.
पवित्र शास्त्रातील वचने ही आम्हाला माहिती आहेत , अंतःकरणात आहेत , काहींचे तर अध्याय चे अध्याय पाठ आहेत. पण आजचा शास्त्रपाठ आणि प्रतीक वचन सांगते की *वचन माहिती असुन , पाठ असून फक्त अंतःकरणात असून आनंद मिळत नाही , जर खरा आनंद हवा असेल तर वचना प्रमाणे आचरण महत्वाचं आहे*. *तसे आचरण नाही तर आनंदही नाही.*
योनाने काय केले तर देवाचे वचन त्याला प्राप्त झाले तरी त्याने देवाची आज्ञा पाळली नाही. योना संदेष्टा होता. त्याला पवित्र शास्त्रातील वचने पाठ होती. योनाच्या दुसऱ्या अध्यायातील त्याच्या प्रार्थनेत स्तोत्रसंहिता , विलापगीत आणि ईयोबातील वचने आहेत. म्हणजे वचने त्याच्या मुखात होती, हृदयात होती पण आचरणात मात्र वचनाप्रमाणे नव्हती. *कारण योनाची कृती म्हणजे देवाचे न ऐकता तार्शिसास पळून जाणे ही मनातील कटुतेवर आधारित होती. निनवेचे लोक दुष्ट व यहुदी लोकांना त्रास देणारे होते. आणि देवाचा संदेश त्यांना सांगितला आणि ते जर देवाकडे वळले तर देव त्यांच्यावर कृपाच करून क्षमा करील व त्यांचा नाश करणार नाही. आणि योनाला हेच नको होते. त्यांचा नाशच व्हावा अशी इच्छा होती. *पण प्रभू म्हणतो जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.* ह्याच वचनाचा अभाव त्याच्यात होता.
आपल्याही मनात अशीच कटुता , राग , आकस असतोच जे आमच्याशी वाईट वागतात त्यांच्याविषयी. मग योनाप्रमाणे क्षमा , प्रीति , सहनशीलता याविषयी वचने माहिती आहेत , हृदयात आहेत पण कृतीत मात्र येत नाहीत म्हणून स्वर्गीय आनंदही मिळत नाही . कायमच मन कटुतेने, दुःखाने भरलेले असते. *कटुता ही सत्यासंबंधाने आंधळे करते.*
*बायबलच्या एका अभ्यासकाने म्हटले आहे की, " बायबल मधील वचने माहिती असूनही ते जर प्रत्यक्ष आचरणात येत नाही तर तो एक प्रकारचा नास्तिकपणा आहे".* *खोटेपणा, अहंकार, आकस द्वेष , पती पत्नीत मतभेद असणं म्हणजे येशू आमचा मालक , प्रभू नाही तर आम्हीच स्वतः आहोत, हे सिद्ध करणं!* त्यामुळेच स्वर्गीय आनंदही मिळत नाही.
*वचन केवळ ऐकणारे , पाठ करणारे , सांगणारे असू नये तर वचनाप्रमाणे आचरण करणारे असलेच पाहिजे,तरच धन्यता मिळेल.*
*प्रभू तुझे वचन केवळ मुखोद्गत न करता आचरणात आणून तुझ्यापासूनची धन्यता मिळावी असे कर.* *आमेन*
No comments:
Post a Comment