*फिलिपै ३ : १२ - १६.*
*दैवी उद्दिष्ट साध्य करताना !*
*बंधूनो , मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानीत नाही ; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून , ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो ; हेच एक माझे काम.*
*फिलिपै ३ : १३-१४.*
पुष्कळ लोक हे स्वतःचे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते गाठण्यासाठी प्रयत्न करतात . पण बरेच लोक उद्दिष्ट ठरवतात पण मधेच सोडून इतरत्र कुठेतरी रमतात आणि आपल्या उद्दिष्टापासून दूर जातात. आणि देवाच्या सेवकांच्या बाबतीत असे घडतांना बऱ्याचदा दिसते.
तेरह हा अब्राहाम याचा पिता ,आपली मुले , सुना , नातवंडे घेऊन कनानास जाण्यास निघाला ( उत्पत्ति ११ : ३१ )पण
हारान या ठिकाणी येऊन तो थांबला . तेथेच त्याला समाधान वाटले . कारण ती जागा फार सुदंर होती , तेथे नदी वाहत होती , भरपूर हिरवळ होती. काही समस्या नव्हती. तेरह अशा ठिकाणी आला होता की सर्व सुविधा निसर्गतःच उपलब्ध होत्या. सर्वकाही आरामदायक होते. *त्याच सुखाला बळी पडून तो कनानास जाण्याचा दैवी हेतू , देवाचे त्याच्या बाबतीत असणारे संकल्प , मुख्य उद्दिष्टच हरवून बसला.*
*विश्वासाने पुढे जाण्याचे त्याने नाकारले.*
*देवाने आम्हाला महान उद्दिष्ट गाठण्यासाठी निवडले आहे. देवाचा हेतू आमच्या जीवनासाठी आहेच. आणि त्यासाठी आम्ही जीवन जगायला पाहिजे* *आणि देवाचे हे दैवी भेटी , उद्दिष्ट फक्त आमच्यासाठी नाही तर आमच्या कुटूंबाच्या आणि मंडळीच्या संबधाने आहेत. त्यासाठीच देवाने आम्हाला पाचारण केले आहे.*
आम्ही सुद्धा ह्या तेरहप्रमाणे आमचे दैवी हेतू गमावून बसण्याची शक्यता असते. जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो तेव्हा आम्ही या दैवी योजनेला मुकतो.आणि आमचा मोठा शत्रू जो आहे सैतान त्याची हीच इच्छा आहे की आम्ही दैवी उद्दिष्ट न गाठता त्यापासून दूरच रहावे. आमचा एक जरी दुर्बलता ( weak point) त्याला समजली तर त्यातच तो आम्हाला गुंतवून ठेवतो. आणि देवाच्या योजनेपासून आपण दूर राहतो. देवाचे हे हेतू फक्त आमच्या वैयक्तिक जीवनासाठीच नाहीत तर मंडळीसाठी , समाजासाठी आहेत.
*पौलाला जेव्हा येशूची ओळख झाली आणि त्याच्या जीवनाचा हेतू जेव्हा प्रभूने त्याला दाखवून दिला तेव्हा कर्मठ असा परूशी असलेला , गमलीयेलाकडे धार्मिक शिक्षण घेतलेल्या पौलाने मागे वळून पाहिले नाही , आणि ख्रिस्ताने नेमून दिलेले उद्दीष्ट त्याने गाठले. म्हणून तो मोठ्या धैर्याने म्हणतो , " जे सुयुद्ध ते मी केले आहे , धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे." पौल एक ठिकाणी आरामशीर थांबला नाही तर प्रभुसाठी सर्व अपमान , हाल , तुरुंगवास सहन करीत प्रभूने नेमून दिलेले उद्दिष्ट गाठले.*
*खूप लोक प्रभुसाठी कार्य करायला निघतात खरे पण बरेचजण कम्फर्ट झोन मधेच गुंतून पडतात आणि आपले दैवी उद्दिष्ट गमावतात. आज आपण पन्नाशीच्या पुढील असू किंवा त्याच्या आतले असू , ज्याअर्थी अजून आम्ही या जगात आहोत त्याअर्थी देवाने आम्हाला विशिष्ट हेतूनेच ठेवले आहे , मग आमचे वय काही का असेना !!*
*विचार करू या आपल्या जीवनाचा आजच आपण , काय गमावलं आणि काय कमावलं याचा !!*
*कारण पौलाप्रमाणे आम्हालाही तो मुगुट मिळवायचा आहे , नेमून दिलेले उद्दिष्ट साध्य करीत !!*
*प्रभू येशू तेरह प्रमाणे मोहात गुंतून तुझ्या उद्दिष्टापासून आम्ही दूर जाऊ नये तर ते उद्दिष्ट साध्य करावेत असे होऊ दे.*
No comments:
Post a Comment