*✨आमचा सांत्वनदाता देव✨*
*तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे..✍*
*( २ रे करिंथ १:४ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
परमेश्वर आमचा सांत्वन करणारा देव आहे. देवाचे सर्व लोक अनेक प्रकारच्या संकटांतून व परिस्थितीतून जात असतात. त्यांना देवाची अधिक चांगली ओळख व्हावी व त्यांनी देवाच्या स्वभावाचे बनत जावे यासाठी देव त्यांना संकटाच्या मार्गाने जाऊ देतो. प्रभूच्या लोकांनी दुःखे सोसण्यास समर्थ असावे अशी देवाची इच्छा आहे. इतकेच केवळ नाही तर त्यांनी जे संकटात आहेत किंवा दुःख भोगत आहेत, अशांचे सांत्वन करण्यास त्यांनी पात्र व्हावे यासाठी देव त्यांना संकटांतून जाऊ देतो. स्वतःचेच सांत्वन करीत न बसता त्यांनी इतरांचेही सांत्वन, समाधान करून त्यांना धीर देण्यास समर्थ व्हावे अशी देवाची इच्छा आहे. तो आमच्यावर विपूल करुणा करतो, तो आमच्या सर्व प्रकारच्या संकटात, अडचणीत आमचे सांत्वन करितो. आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते असे पौल म्हणतो. तो म्हणतो, आम्हाला ख्रिस्तासाठी खूप काही सोसावे लागले तरी ख्रिस्ताद्वारेच आमचे पुष्कळ सांत्वनही होते. आमच्या कठीण परिस्थितीमध्ये देव आमची काळजी घेतो. देव आमचे सांत्वन करितो ह्यासाठी की आम्हीही इतरांचे सांत्वन करावे. जे दुःखात, संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास आम्ही उत्सुक व्हावे. सांत्वनात सहन करण्याचे सामर्थ्य मिळते. जे ख्रिस्तासाठी दुःख, छळ सोसतात त्यांचे सांत्वन होते. त्याचप्रमाणे इतरांचे सांत्वन करणाऱ्यांचेही सांत्वन होते. पौल म्हणतो, *कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दुःखे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. ( वचन ५)*
पौल आपला करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, ज्याने पौलाला त्याच्या सर्व संकटात साहाय्य केले ( शारिरीक, भौतिक अडचणी, धोके, छळणूक, तुरूंगवास, फटके, चिंता ) त्या सामर्थ्यशाली देवाला तो धन्यवाद देत आहे. सर्व प्रकारच्या अडचणीत धीर व उत्तेजन आणि सक्षम करणारी कृपा म्हणजेच सांत्वन होय. दुःख, क्लेशातून कोणा माणसाची दिव्य प्रकारे सूटका करणे कोणाही मनुष्याला शक्य नाही, परंतु आपल्या स्वतःवरच्या अडचणीत मिळालेल्या धीरात, उत्तेजनात इतरांना वाटेकरी करणे आम्हाला सहज शक्य आहे. पौलाने विश्वासणाऱ्यांची दुःखेही ख्रिस्ताची दुःखे असल्याचे म्हटले आहे. ही दुःखे आमच्या जीवनात येतात यावरून त्याला ख्रिस्ताच्या वतीने सोसलेली व अनुभवलेली दुःखे असे तो म्हणतो. पौल म्हणतो, *आम्हांवर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते, आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते, म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोसतो, ती सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. ( वचन ६)*
प्रियांनो, आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांमुळे आम्ही डगमगून जाऊ नये. आपल्या सेवाकार्यात अनेक संकटे आली तरी त्यामुळे सांत्वनही मिळते असे सांगून पौल आम्हाला धीर देत आहे. या सर्व संकटांतून तो देवाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यास शिकला. दुःखाच्या प्रसंगी देवाचे सामर्थ्य आम्हाला अधिक जाणवते हा अनुभव आम्हाला नेहमीच येतो. कारण देव आमच्या कठीण परिस्थितीमध्ये कधीच आम्हाला एकटे सोडत नाही. तो कधीच आमची निराशा करीत नाही. याउलट जसे आम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे भागीदार आहोत तसेच त्याच्याकडून होणाऱ्या सांत्वनाचेही वाटेकरी आहोत. आम्ही स्वतःवर किंवा मनुष्यावर भरंवसा ठेवू नये तर जिवंत देवावर भरंवसा ठेवावा ह्यासाठी आमच्या जीवनात कधी कधी संकटे येतात. आम्ही स्वतःच्या क्षमतेवर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर भरंवसा ठेवणे ख्रिस्ती जीवनात खूप महत्वाचे आहे. ते सहजसाध्य होत नाही. कारण देवावर विसंबून राहताना अनेकदा आम्हाला दुःखा, संकटांच्या अनुभवातून जावे लागते. तेव्हाच आम्ही हा धडा शिकू शकतो. ख्रिस्ताच्या नावामुळे दुःख सोसणाऱ्यांचे सांत्वन ख्रिस्त करतो. ख्रिस्ती जीवन ही सुख दुःखांची मालिकाच आहे. यातूनच प्रभू आपल्या लेकरांना घडवीत असतो. आपण त्याच्या या पद्धतीला मान्य राहू या कारण देवाच्या परवानगीशिवाय त्याच्या लेकरांच्या जीवनात काहीच घडत नसते. यातूनच आम्ही देवाच्या दयेचा, सामर्थ्याचा आणि सांत्वन, समाधानाचा अनुभव घेतो.
No comments:
Post a Comment