✨न्यायी न्यायाधीश✨
*म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पहि उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील..✍🏼*
*( १ करिंथ ४:५ )*
*...मनन...*
*!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*
प्रभू येशू ख्रिस्ताचे दूसरे आगमन होईल तेव्हा प्रभू आपल्यातील प्रत्येकाचा न्याय करणार आहे. ज्याप्रमाणे आपण दाखल्यामध्ये पाहातो की, एका उमरावाने स्वतःसाठी राज्य मिळवून परत यावे या हेतूने त्याने आपल्या दहा दासांना बोलावून त्यांना दहा मोहरा दिल्या आणि तो त्यांना म्हणाला, *"मी येईपर्यंत यावर व्यापार करा.. मग तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांना आपल्याकडे बोलावून आणण्याची आज्ञा केली.' (लूक १९:१२,१३,१५)* त्याप्रमाणे आपला प्रभू येशू जेव्हा परत येईल तेव्हा त्याच्या न्यायासनासमोर न्यायनिवाडा होण्यासाठी सर्वांना उभे राहावे लागेल. तो आपले कार्य तोलूनमापून घेईल आणि आपल्याला कारभारी, इमारत बांधणारे, धावपटू आणि कामकरी अशा दर्जानूसार ठरवेल. तो प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे प्रतिफळ देईल.
*कारभारी -* प्रभू आमच्या कृत्यांची परीक्षा करील. त्याने आमच्या स्वाधीन केलेल्या आत्मिक दानांचा उपयोग आम्ही कशाप्रकारे केला आहे हे तो पाहील. आम्हां प्रत्येकाला त्याने काही ना काही कृपादान दिले आहे. वचनाची सेवा करणे, सुवार्ता गाजविणे, देवाच्या लेकरांची सेवा करणे इत्यादि. त्या कृपादानांचा उपयोग आम्ही कशाप्रकारे केला ह्याचा हिशोब आम्हाला द्यावा लागेल. पेत्र म्हणतो की, *"प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्याप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा." ( १ पेत्र ४:१०)* आपण आपल्याला सोपविलेले कारभाऱ्याचे काम चोखपणे बजावले आहे की नाही याचे मूल्यमापन प्रभू करील. चांगला आणि विश्वासू कारभारी कोण ? आपल्या सभोवती शेकडो लोक परमेश्वराच्या वचनाचे भुकेले असताना आपण ते गरजू लोकांबरोबर विश्वासूपणे वाटून घेतले पाहिजे. नीतिसूत्रकार म्हणतो, *"जो धान्य अडकवून ठेवितो त्याला लोक शाप देतात; जो ते विकितो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल." ( नीति ११:२६)* असा मनुष्य चांगला कारभारी असतो. आम्ही चांगला कारभारी होण्यासाठी झटून प्रयत्न केला पाहिजे.
*इमारत बांधणारा -* मोशेने जेव्हा परमेश्वराचा निवासमंडप बांधला त्याआधी परमेश्वराने त्याला त्याचा सर्विस्तर तपशील दिला होता. मोशेने परमेश्वराने आज्ञापिल्याप्रमाणे सर्व केले. परमेश्वराचे मंदिर बांधण्याच्या कामी मोशेने दाखवलेल्या विश्वासूपणा आणि आज्ञाधारकपणा यांचा परिणाम आपल्याला पाहावयास मिळतो. *मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. ( निर्गम ४०:३४)* आज अनेक मंडळ्यांमधून परमेश्वराचे तेज निघून गेले आहे. ते का ?कारण आम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार नव्हे तर आमच्या इच्छेप्रमाणे, आमच्या स्वतःच्या कल्पनेनुसार आम्ही देवाचे मंदिर बांधत आहोत. आम्ही असे न करता देवाची इच्छा जाणून घेऊन त्यानुसार बांधकाम करावे म्हणजे आम्ही देवाच्या पसंतीस उतरू.
*धावपटू -* पौलाने ख्रिस्ती जीवनाची तुलना शर्यतीत धावणाऱ्या धावपटूशी केली आहे. तो म्हणतो, *शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षिस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय ? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. ( १ करिंथ ९:२४)* हे बक्षिस म्हणजे अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी पौल म्हणतो, *"तर मी आपले शरीर कुदलतो, व त्याला दास करून ठेवतो". ( १ करिंथ ९:२७)* आम्ही शर्यतीत असे धावावे की जीवनाचा मुकुट आम्हाला मिळेल.
*कामकरी -* प्रभूच्या कार्यासाठी नेहमीच कामकऱ्यांची कमतरता असते. प्रभू शिष्यांना म्हणत आहे की, *पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा." ( मत्तय ९:३७,३८)* ख्रिस्ती सेवाकार्याची सुंदरता ही आहे की, आम्ही परमेश्वराच्या संगतीचे कामकरी आहोत. *"कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत." ( १ करिंथ ३:९)* शिष्यांबद्दल लिहिले आहे की, *त्यांनी तिथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. ( मार्क १६:२०)* आमचेही कर्तव्य आहे की, आम्हीही देवाच्या राज्याची घोषणा केली पाहिजे. सुवार्ता सांगितली पाहिजे. प्रभू परत येईल तेव्हा आम्हाला सोपवून दिलेले देवाचे कार्य करताना आम्ही आढळून आले पाहिजे. म्हणजे मग प्रभूने आपल्याबद्दलही असे म्हटले पाहिजे की, *"शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे." ( लूक १९:१७)*
No comments:
Post a Comment