*इब्री १२: २८-२९*
*देवाला संतोष देणारी सेवा*
*प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा.*
*इफिस ५ :१०*
संगीताच्या एका कार्यक्रमात एका तरुणाने व्हायोलिन खूप छान सुमधुर असे वाजवून सादर केले. त्याच वादन झाल्यावर तो स्टेज सोडून निघाला. सर्व लोक खूप टाळ्या वाजवत होते. कौतुक करीत होते पण हा तरुण लगेच स्टेज सोडून निघाला. तेव्हा स्टेज वरील इतर कलाकार त्याला म्हणाले अरे थोडावेळ स्टेजवर थांब , बघ सर्व लोक उभे राहून टाळ्या वाजवताहेत. पण तो थांबला नाही. तो म्हणाला *"नाही सर्वजण उभे राहून टाळ्या वाजवत नाहीत. बघा पहिल्या रांगेतील एक मनुष्य बसलेला आहे आणि टाळ्याही वाजवीत नाही".* *तोच माझा गुरू आहे*. ह्या गुरूने टाळ्या का वाजवल्या नाहीत तर त्या मुलाने गुरूने सांगितल्याप्रमाणे, गुरुच्या मनासारखे व्हायोलिन वाजवले नव्हते. *त्याच वाजवणं गुरुच्या पसंतीस उतरलंच नव्हतं. गुरूला संतोष देणार नव्हतं. म्हणून लोकांच्या त्या दाद देण्याला काही अर्थ नव्हता.*
पौल म्हणतो , " आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो." समेटाची सेवा प्रभूने नेमून दिली आहे अशासाठी की जेव्हा आम्ही ख्रिस्ताशी समेट केलेले असे त्याच्या वधस्तंभामुळे होतो म्हणून देवाने आम्हाला त्याच्याकडे घेतलेले आहे , पण देवाने त्याच्याकडे आम्हाला फक्त बसून राहण्यासाठी घेतले नाही तर सेवा करण्यासाठी निवडले आहे. प्रभू येशू म्हणतो , *"मी तुम्हाला निवडलं आहे , नेमले आहे यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे".*
अविश्वास असणाऱ्या लोकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, ख्रिस्ताशी त्यांचा समेट व्हावा यासाठी आम्हाला ही सुवार्तेची सेवा नेमून दिली आहे. कारण ख्रिस्त हीच जगाची गरज आहे. कारण जग अंधारात चाचपडत आहे. पण जर देवाने केलेली ही नेमणूक मान्य न करता आम्ही आमच्या पध्दतीने जर कार्य , सेवा करू तर ती प्रभूला मान्य नाही. नोहाने देवाने सांगितल्याप्रमाणे तारू केले म्हणून तो व त्याचे कुटुंब वाचले. मोशेने देवाच्या सांगण्याप्रमाणे निवासमंडप केला म्हणून प्रभूच प्रत्यक्ष सानिध्य देवाच्या तेजाद्वारे इस्राएल लोकांच्यात उतरून आले. व ते वचनदत्त देशात गेले.
त्या तरुणाने व्हायोलिन वाजवतांना स्वतःचे बदल केले होते. लोकांना खूष करण्यासाठी. *लोकांनी दाद दिली त्याला ,टाळ्या वाजवल्या कारण त्याच्या गुरूने काय शिकवले हेच त्यांना माहिती नव्हते .* लोकांना जरी आवडलं तरी ते संगीत सत्यावर आधारित नव्हतं म्हणून त्याचा गुरू संतुष्ट झाला नाही.
*जर आम्ही ख्रिस्ताला सत्याने वागून संतोष देत नाही तर काय उपयोग आहे जगातील टाळ्यांचा आणि सन्मानाचा!!* *ख्रिस्ताला संतोषकारक फळ देऊ ख्रिस्ताच्याच खऱ्या शिकवणीप्रमाणे*.
*परमेश्वरा तुला संतोष देणारी सेवा आमच्या हातून घडू दे.* *आमेन*
No comments:
Post a Comment