स्वतःचीच चोरी करू नका
इफिस.४ः२८-३२
आपल्या इतरांबरोबरच्या नातेसंबंधात आपण त्यांची चोरी करीत नाही याची खातरी करून घेणे गरजेचे आहे. आपल्या व्यावसायिक व्यवहारांत आपण प्रामाणिक असण्याची आणि ज्या कामासाठी आपल्याला वेतन मिळते ते काम विश्वासूपणे करण्याची गरज आहे. जर आपल्याला पूर्ण दिवसाच्या कामाचा मोबदला मिळतो, आणि आपण पूर्ण दिवसाचे काम केले नाही, तर आपण आपल्या मालकाची चोरी करतो. अगदी चहा, कॉफी घेण्यासाठी दिलेला वेळ लांबवणे हे जरी क्षुल्लक असले, तरी मालकाची चोरी करण्याचाच तो एक मार्ग आहे. पवित्र शास्त्र सांगते, ‘‘सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा’’ (रोम.१२ः१७). आपण देवाची व इतरांची कोणत्याही बाबतीत चोरी करीत नाही याची खातरी करून घेण्यासाठी प्रत्येक विश्वासणार्याने स्वतःचे परीक्षण करणे गरजेचे आहे. पवित्र शास्त्र सांगते, ‘‘म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरो असो किंवा वाईट असो’’ (२करिंथ.५ः९-१०). प्रभूसाठी असलेला वेळ व पैसा त्याच्यासाठी खर्च न करता त्यांची चोरी करून आपण त्याच्याकडून बक्षीस मिळेल अशी अपेक्षा करू शकत नाही.
चोरीच्या विरोधात पौल म्हणतो, ‘‘चोरी करणार्याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताना देण्यास जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे’’ (इफिस.४ः२८). लक्ष द्या, काम करण्यात काहीतरी हेतू आहे, आणि तो हेतू म्हणजे विश्वासणार्याला इतरांना मदत करता यावी. इतरांची मनापासून काळजी घेणारी व्यक्तीच खरी ख्रिस्ती व्यक्ती असते. आणि जितकी अधिक ती काळजी घेते तितकी अधिक तिला गरजवंताची मदत करावीशी वाटते.
No comments:
Post a Comment