*मत्तय १०: ३७-३९*
*प्रथम स्थान ख्रिस्तावरील*
*प्रीतीला !!!*
*जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही ; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही.*
*मत्तय १०:३७*.
'आपला बाप व आपली आई यांचा मान राख' अशी आज्ञा देणारा प्रभूच म्हणतो की जो माझ्यापेक्षा आईबापावर आणि मुला मुलीवर अधिक प्रेम करतो
तो माझ्या योग्यतेचा नाही.
जो आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त केवळ प्रीति आहे तोच प्रभू येशू असे कसे म्हणू शकतो? हे देवाचे शब्द आपल्याला नक्कीच गोंधळात टाकणारे किंवा त्रासदायक वाटतात.
पण बायबलमधील प्रभू येशूने उच्चारलेला एकही शब्द निरर्थक नाही तर प्रभूच्या प्रत्येक शब्दात रहस्य आहे, महत्वपूर्ण शिकवण दडलेली आहे. हे समजून घेण्यासाठी *मनुष्याची प्रीति आणि देवाची प्रीति यातील फरक* *समजणं फार महत्वाचे आहे.* आमच्या प्रेमामध्ये स्वार्थ लपलेला असतो. आम्ही प्रेम जरूर करतो एकमेकांवर पण जेव्हा वादविवाद होतात, आमच्या इच्छेविरुद्ध लोक वागतात तेव्हा मग ती व्यक्ती आई असो, वडील, मित्र मैत्रिणी, नातेवाईक किंवा मुले मुली असोत , ह्या वादविवादामुळे त्या प्रेमात कटूता यायला लागते , प्रेम कमी व्हायला लागते. म्हणजेच आमच्या सोयीनुसार आम्ही प्रेम करीत असतो.
पण ख्रिस्ताच प्रेम तसे नाही. आपण वाईट वागो न वागो, ख्रिस्तावर प्रेम करो न करो, तरीही प्रभू आमच्यावर प्रेमच करतो . कारण त्याची ही प्रीति विना अट आहे. *अगापे प्रीति, ( Unconditional Love*) असे ज्या प्रीतीला म्हटले गेले आहे ती प्रीति ख्रिस्ताने आपल्यावर केली आहे. *आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतर नाही तर पापी असतानाच प्रभू आमच्यासाठी वधस्तंभावर गेला, आणि पापा पासून आमची सुटका करून सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला*. *किती महान प्रीति आहे ही, शब्द थिटे पडतात ह्या प्रीतीचे वर्णन करताना!!*
*म्हणून जेव्हा सर्वप्रथम ख्रिस्ताच्या प्रीतीचा स्वीकार करतो, आणि आधी ख्रिस्तावर प्रीति करतो तेव्हा ह्या निस्वार्थ प्रेमाचा झरा आमच्यातून वहायला लागतो.* मग कोणी कितीही आमच्याशी वाईट वागले, विरोधात गेले तरीही आमची प्रीति टिकून राहते. तिरस्कार,कटुता असूया याला वावच राहत नाही. .ह्या प्रीतीपासून आम्हाला कोणीही विभक्त करू शकत नाही. *प्रभू येशू म्हणतो , "मी तुम्हास नवी आज्ञा देतो की जशी मी तुमच्यावर प्रीति केली तशी तुम्ही एकमेकांवर करा"*
*म्हणूनच प्रभूची ही इच्छा आहे की सर्वात प्रथम स्थान ख्रिस्तावरील प्रेमालाच दिले पाहिजे . मगच ख्रिस्तासारखी प्रीति आम्ही करू शकू की ज्यामुळे जिव्हाळ्याचं नातं कायम टिकून राहील.*
*प्रितीच्या सागरा प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्यावरील प्रेमालाच आम्ही प्रथम स्थान द्यावं ही कृपा आमच्यावर कर.*
No comments:
Post a Comment