Friday, 9 October 2020

श्रीमंत माणुस



      परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता.*  मार्क 10:22


          प्रियांनो एक श्रीमंत माणूस मरावयास टेकला होता. मंडळीचे  पाळक  त्याला भेटण्यास गेले. अध्यात्मिक बोधाचे दोन शब्द  सांगताना पाळक म्हणाले, “आता प्रार्थना करताना मला तुमचा हात हाती घेऊ द्या.” त्या माणसाने ते नाकारले आणि आपले घट्ट मुठी वळलेले  हात पांघरुणाच्या आत घेतले. नंतर हा कंजूष वृद्ध मेला, पण त्याच्या आत्म्याचे तारण झाले किंवा नाही याची  कसलीच  खूण त्याने दाखवली नाही. पुढील व्यवस्थेसाठी लोकांनी त्याच्या अंगावरची पांघरुणे बाजूस केली, तो त्याने आपल्या तिजोरीची किल्ली हातात घट्ट पकडून ठेवली होती असे आढळले. पुन्हा एकदा  त्याच सत्याचा प्रत्यय आला. पैशाच्या🔥 लोभाने  माणूस आंधळा होतो आणि मग प्रभू येशूने पुढे केलेला तारणाचा हात झिडकारून तो आपल्या तिजोरीच्या किल्ल्यांचाच  आधार घेऊन राहतो.


संपत्तीची शक्ती कशी फसवी आहे याचे एक उत्कृष्ट उदाहरण मार्क १० मध्ये आढळते.  प्रभू येशूकडे आलेला हा अधिकारी चांगला होतकरू तरुण होता, दिसण्यात खूपच धार्मिक होता आणि त्याच्या अंगी पुष्कळ चांगले गुण होते. एवढा कळकळीचा असूनही तो सर्वकाळचा हरवलेला होता!   तो न्यायाच्या बाबतीत आवेशी होता, त्याचे आचरण नैतिक दृष्ट्या  शुद्ध होते, बाह्यत्कारी तरी तो ख्रिस्ताच्या मागे होता, तसेच त्याची आपणांवर प्रीती आहे हेही तो जाणून होता,  तरीही तारण न होता तो निघून गेला.  या तरुणाची त्याच्या स्वतःवर आणि त्याच्या पैशावर जेवढी प्रीति होती,  तेवढी देवावर किंवा त्याच्या शेजाऱ्यावर नव्हती, हेच त्याच्या या अवस्थेचे कारण होय. प्रभू येशूने नेमके त्याच्या याच  उणेपणावर बोट ठेवले आणि म्हटले, “… जा,  तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक…. तुझ्या स्वतःच्या मनोवृत्ती आणि देहवासना सोडून दे आणि देवाच्या मार्गदर्शनाच्या – वधस्तंभाच्या वाटेने माझ्या मागे ये.”  त्या तरुणाला हे आव्हान पेलले नाही. मालमत्ता नव्हे तर आपला चिरंतन आत्मा हीच आपली “खरी संपत्ती”  आहे हे त्याला उमगले नाही. तारण प्राप्ती न झाल्याने तो कष्टी होऊन निघून गेला, पण आपले पैसे तर वाचले या विचाराने तो समाधानी (?)  झाला असेल!


 ऐहिक गोष्टीपेक्षा  अध्यात्मिकाचे महत्व केव्हाही अधिक आहे,  म्हणून आपण जे योग्य त्याचा आग्रह धरून या तरुणाला श्रीमंत नव्हे,  तर बिचारा तरुण अधिकारी असेच का म्हणू नये?


 *संपत्तीने श्रीमंत असण्यापेक्षा देवामध्ये श्रीमंत असणे श्रेयस्कर!*




*90117 8

No comments:

Post a Comment