प्रकटीकरण भाग — 12
शिक्का 1- पांढरा घोडा व स्वार - ख्रिस्तविरोधक
प्रियांनो, *प्रभु येशू ख्रिस्त* आपल्याला *स्वर्ग राज्यात घेऊन गेले* की, ख्रिस्तविरोधकाच्या मार्गातील *पवित्र आत्म्याचा* अडथळा बंद होईल. मंडळीच्या *स्वर्गारोहणानंतर पवित्र आत्मा* ख्रिस्तविरोधकाला कोणताही प्रतिबंध करणार नाही. वचन सांगते, तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत *देवाच्या मंदिरात* बसणारा असा आहे. त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करत आहे ते तुम्हांला ठाऊक आहे. कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु *जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील.* (2 थेस्सलनी 2:4, 6-7) मंडळीचे *स्वर्गारोहण* झाले की ख्रिस्तविरोधकाचा काळ सुरु होईल. प्रकटीकरण सांगते, मग *कोकर्याने* त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले, तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये,” असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला; तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. (प्रकटीकरण 6:1-2) घोडा पांढरा आहे स्वार नाही हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. पांढरा रंग शांतता दर्शवतो. हा घोडेस्वार शांततेचे खोटे आश्वासन देऊन संपुर्ण जगावर त्याचे वर्चस्व स्थापन करेल हे त्याला मुकुट देण्यात आला यातून सिद्ध होते. त्याच्या जवळ फक्त धनुष्य आहे म्हणजे तो शब्द चातुर्य मुत्सद्दीपणा वापरुन संपुर्ण जगाला फसवणार आहे. जगावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्याला युद्धाची गरज भासणार नाही इतका हा बोलण्यात तरबेज असेल. विजयावर विजय मिळवून संपुर्ण जगावर सत्ता स्थापन करील.
प्रियजनहो, गोग म्हणजे सध्याचे रशिया इस्त्राएलावर हल्ला करील आणि स्वतः संपुष्टात येईल. यहेज्केल 38,39 अध्यायात वाचल्यावर सविस्तर समजेल. वचन सांगते की तेव्हा इस्राएलच्या नगरांतले रहिवासी बाहेर निघून ढाली व कवचे, धनुष्ये व बाण, गदा व भाले इत्यादी शस्त्रांना आग लावून जाळतील; त्यांचे त्यांना सात वर्षे सरपण होईल; (यहेज्केल 39:9) यावरुन स्पष्ट होते की, रशियाची हत्यारे दारुगोळा शस्त्रसामग्री जाळून नष्ट करण्यासाठी सात वर्षे लागतील. अर्थातच ही सात वर्षे प्रभुच्या एक हजार वर्षांच्या राज्यातील नक्कीच नाहीत. रशियाचा नाश हा *प्रभुच्या गुप्त आगमनापूर्वीच* होवू शकतो. कारण ख्रिस्तविरोधक या युद्धाचा आधार घेऊन लोकांची अण्वस्त्र युद्धाची भीती कमी करुन जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी इस्त्राएल देशासोबत करार करील आणि एक जग एक सरकार स्थापन करील. परंतु शांती प्रस्थापित करणे त्याला शक्य नाही हे जगाला नंतर समजेल परंतु तोपर्यंत संपुर्ण जग त्याच्या ताब्यात गेलेले असेल. *परमेश्वर आपल्या व्दारे अनेकांपर्यंत प्रभुचे वचन पोहोंचवो व त्या व्दारे अनेक आत्म्यांना या महाक्लेषापासून वाचवो. शांतीचा देव स्वत: तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे; तो हे करीलच. आमेन.*
No comments:
Post a Comment