Saturday, 17 October 2020

हेतू योग्य पण मार्ग चुकीचा म्हणून कार्यसिद्धी नाही

 *२शमुवेल ६:१-११*


 *हेतू योग्य पण मार्ग चुकीचा*

    *म्हणून कार्यसिद्धी नाही*


     *परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणाऱ्यास त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत.*  *स्तोत्र २५:१०*.


     बरेचदा जीवन जगताना आमचे हेतू जरी चांगले असले पण ते साध्य करण्यासाठी वापरले जाणारे मार्ग जर चुकत असतील तर यश मिळत नाही उलट अपयशाला सामोरं जावं लागतं. परीक्षेत पास व्हायला हवे हा हेतू चांगला आहे पण त्यासाठी   अभ्यास न  करता वेगळे मार्ग हाताळणे सर्वस्वी चुकीचे आहे. आणि जर उघडकीस आलं तर शिक्षा होतेच. 

   दावीदाला परमेश्वराचा कोष जो अबीनादाबाच्या घरी होता तो पुन्हा दाविदपुरात आणण्याची ओढ लागली होती. हेतू निश्चितच खूप चांगला होता. *कोष म्हणजे प्रत्यक्ष देवाचे सानिध्य.* ते आपल्या मध्ये हवेच. कारण आपलं जीवनच त्यावर अवलंबून आहे. हा ठाम विश्वास दावीदाचा होताच. *दावीद हा प्रत्यक्ष परमेश्वराच्या मनासारखा होता* असे स्वतः परमेश्वर म्हणतो. दावीदाला देवाच्या सानिध्याची ओढ लागली होती. 

    *हेतू अतिशय उत्तम पण त्याचा मार्ग मात्र चुकला. कोष आणण्यासाठी दावीदाने नवी बैलगाडी केली.छानसे धष्टपुष्ट बैल . कोष जड होता , कोष वाहून नेण सोपी गोष्ट नव्हती. पण  नियम असा होता की कोष हा लेव्यांच्या , याजकाच्या  खांद्यावरच नेला गेला पाहिजे. *लेवी  शब्दाचा अर्थ आहे जडून राहणे.* तो जड कोष वाहुन  नेताना घाम गाळावा लागत होता. वजनदार गोष्टी पेलाव्या  लागणार होत्या. आणि त्यासाठी निवडलेला हा मार्ग . पण हा मार्ग चुकीचा होता. 

    चर्च मध्ये गर्दी वाढावी म्हणून प्रायोगिक तत्वावर वेगवेगळे प्रयोग केले जातात. आणि *खरेपणाने आणि आत्म्याने भक्ती करावी म्हणजे देवाशी जडलेले लेवी व्हावे हाच नियम डावलला जातो.* चांगल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने करीत असताना आम्ही म्हणतो आम्ही देवासाठीच करतो. स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी, आणि दाखवण्यासाठी असे मार्ग निवडले जातात. हृदयस्पर्शी गीतांच्या ऐवजी वाद्यांचा गदारोळ जास्त वाढलेला आहे. वचनाच्या सेवेपेक्षा चिन्ह, चमत्कार , भविष्य या गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते. प्रथमस्थानी ख्रिस्तच हवा.तरच ख्रिस्ताच सानिध्य उतरून येते. 

    *कारण हा कराराचा कोष वाहून नेणं म्हणजे प्रत्यक्ष प्रभू येशूला वाहून नेणं!* *आणि प्रभूला वाहून नेताना घाम गाळावाच लागतो. ख्रिस्ताला वाहून नेताना म्हणजे ख्रिस्ताची सुवार्ता सांगताना पौलाला लाठीमार , तारूफुटी, सर्पदंश अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. हे सर्व त्याने ख्रिस्ताच्या सानिध्यासाठी सहन केलं. म्हणून तो विश्वासाने म्हणतो , माझ्यासाठी स्वर्गात मुगुट ठेवलेला आहे.* कारण पौल ख्रिस्ताशी जडलेला होता. चूका होतात पण त्यातूनही प्रभू शिकवत असतो. *दुसऱ्या वेळेस कोष आणताना दावीदाने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले. आणि आयुष्यभर देवाच्या सानिध्यात राहिला आणि देवही त्याच्या बरोबर होताच.* 

      *प्रार्थना करू की पित्या तुझं सानिध्य आमच्यात यावे यासाठी आम्हाला तू नेमून दिलेल्या मार्गानेच चालव.*

           

No comments:

Post a Comment