Thursday, 15 October 2020

ईश्वरी योजना



               *✨ईश्वरी योजना✨*


*तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो..✍*

               *( मत्तय ५:४५ )*    

 

                           *...मनन...*


         *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     आपल्याला माहीत आहे की, परमेश्वरानेच अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्व काही निर्माण केले. आणि मनुष्यालाही त्यानेच निर्माण केले. सर्व काही त्याच्याच अधीन असून सर्वांवर त्याचेच नियंत्रण आहे. त्याच्या इच्छेशिवाय कुणीच काहीच करू शकत नाही, झाडाचे एक पानही त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. संपूर्ण प्राणीमात्रावर, संपूर्ण विश्वावर केवळ त्याचेच नियंत्रण आहे. सर्व प्राणीमात्र, आकाश, डोंगर दऱ्या, वृक्ष, नदीनाले सर्वांवर त्याचीच सत्ता आहे. आणि सर्वांना सर्व काही तोच पुरवून देतो, स्तोत्रकर्ता म्हणतो की, *तूं आपली मूठ उघडून प्राणीमात्राची इच्छा पूरी करितोस. ( स्तोत्र १४५:१६)* परमेश्वराची कृपा सर्वांवर विपूल अशी आहे. आणि पौल असे म्हणत आहे की, *'देव पक्षपाती नाही', हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भिती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. ( प्रेषित १०:३५)* देव जरी पक्षपात करीत नाही तरी त्याचे भय बाळगणारे व नीतिमान लोकांवर त्याची कृपा विपुल आहे. देवाची कृपा अशा सर्वांसाठीच सर्वकाळ मिळणारी आहे. आणि संपूर्ण जगासाठी ती आशीर्वाद अशी आहे. तरीही देवाची वचने इस्राएलांच्याद्वारे आली आहेत. असे लिहिले आहे की, *ते इस्राएली आहेत, दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत, महान पूर्वजहि त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे. ( रोम ९:४,५)*


    आपण पाहातो की, निसर्गावर देवाचीच सत्ता चालते आणि निसर्गाचा एकंदर क्रम किंवा निसर्गचक्र देवाच्याच योजनेनुसार चालत असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नीतिव्यवस्था आणि तिचे तर्कसंगत परिणाम ह्या सर्वांच्या मुळाशी ईश्वरी योजनाच आहे. आणि हे सर्व आपणांस नीतिसूत्रेमध्ये पाहावयास मिळते. देवाची कृपा जरी सर्वांवर सारखीच असते तरी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणेच प्रतिफळ प्राप्त होते. कारण कुणी पापात पडून देहवासना पूर्ण करण्याचा विचार करतात, तर कोणी देवाची इच्छा जाणून घेऊन त्याच्या इच्छेप्रमाणे चांगले ते करण्याचा विचार करतात आणि त्यानुसारच देवाची कृपा प्राप्त होते. असे लिहिले आहे की, *माणूस जे काही पेरितो त्याचेंच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरितो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरितो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. ( गलती ६:७,८)* आमच्या हातात आहे की आम्ही देहस्वभानुसार चालावे की आत्म्यानुसार. म्हणून आम्ही आत्म्यानुसार चालून सार्वकालिक जीवन मिळवावे.


     प्रियांनो, आपले जीवन हे ईश्वरी योजनेचाच एक भाग आहे. परंतु असे असले तरी आपण देवाच्या आमच्या जीवनाबाबतीत असलेल्या योजना पूर्ण होऊ देण्यासाठी आम्हीही स्वतःला सर्व प्रकारच्या अनीतिपासून दूर ठेवले पाहिजे. शुद्ध आणि पवित्र जीवन जगले पाहिजे आणि परमेश्वर देऊ करत असलेले सार्वकालिक जीवन हा सर्वात मोठा आशीर्वाद मिळविण्यासाठी सदोदित देवाच्या इच्छेप्रमाणे वागून त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे.


         

No comments:

Post a Comment