Tuesday, 20 October 2020

वेळेचा सदुपयोग

 *इफिस ५:१५-२१*


              *वेळेचा सदुपयोग*


     *वेळेचा सदुपयोग करा , कारण दिवस वाईट आहेत.*

              *इफिस ५: १६*


     आजचा हा क्षण , दिवस आणि हे आयुष्यच प्रभू येशूने दिलेला मोठा आशीर्वाद आणि कृपा आहे. आमचं जीवन हे आमच्या आणि परमेश्वराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.  जीवनरुपी ही जी वेळ प्रभूने आम्हाला बहाल केली आहे तिचा सदुपयोग करायचा आहे असे बायबल सांगते . फक्त उपयोग नाही तर सदुपयोग करायचा आहे.  

    *वेळेचा सदुपयोग म्हणजे कदाचित आजपर्यंत जे आपण गमावून बसलो आहोत ते पुन्हा मिळवणं.* वधस्तंभावर असणारा चोर सर्व गमावून बसला होता, आणि आता हे गमावलेल पुन्हा मिळवून घेण्यासाठी त्याच्याकडे केवळ काही क्षणांचा अवधी होता. पण हेच क्षण किती मोलवान होते त्याच्यासाठी हे त्या चोराने ओळखले आणि तेच काही क्षण प्रभूची कृपाच आहे हे त्या चोराने पुरेपूर जाणले आणि ह्या क्षणांचा , ह्या वेळेचा सदुपयोग त्याने करून घेतला आणि त्याच्या हातून निसटलेलं सार्वकालिक जीवन त्याने त्या वधस्तंभावरील ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेवीत मनापासून पश्चाताप करीत पुन्हा मिळवलं. पेत्राने सुद्धा ख्रिस्ताचा नकार जरी केला होता तरी त्यानेही पश्चाताप केला आणि पुन्हा ख्रिस्ताकडे वळून अनेकांना ख्रिस्ताकडे आणले , जगाची उलटा पालट केली. गमावलेल पाचारण, विश्वास , कृपा आणि ख्रिस्त पेत्राने पुन्हा मिळवला. वेळेचा सदुपयोग करून घेतला. 

   *वेळेचा सदुपयोग म्हणजे स्वतःवर फक्त ख्रिस्ताचाच कंट्रोल असणे.* आम्ही केलेल्या प्रतिज्ञा , देवाला दिलेली वचने पूर्ण करायचीत , ऋण फेडायचं आहे. इतर नकारात्मक भावना आणि आम्हाला विश्वासापासून दूर नेणारे लोक या सर्वांपासून दूर होत आता हाती जे क्षण , जे आयुष्य देवाने दिले आहे ते पूर्णपणे प्रभू येशूला समर्पित होत सार्थकी लावायचे आहे. 

    *वेळेचा सदुपयोग म्हणजे देवाची कामे देवाच्याच मार्गात राहून करणे.*  शिष्य येशूला विचारतात , *देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?" येशूने त्यांना उत्तर दिले ,  " देवाचे काम हेच आहे की ज्याला म्हणजे येशूला त्याने म्हणजे परमेश्वर पित्याने पाठविले त्या माझ्यावर म्हणजे येशूख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवावा* ( योहान ६:२८-२९ ). *म्हणजे वेळेचा सदुपयोग होतो कारण ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने आमचे विचार ,आचार , सर्व ख्रिस्ताच्या योजनेप्रमाणेच असतात*.

      *प्रभू येशू तू दिलेल्या या जीवनरुपी वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यास आणि विसंबून राहण्यास मदत कर.*

             *आमेन*.

      

No comments:

Post a Comment