Tuesday, 6 October 2020

विश्वासू राहा

                        ✨विश्वासू राहा✨


मी तुम्हांस सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल..

                   ( लूक १९:२६ )


                          


          प्रभू येशू ख्रिस्त व त्याचे शिष्य यरूशलेमेजवळ आले होते आणि आता तेथे तो रोमी साम्राज्याविरूद्ध बंड पुकारून युद्ध करील व सर्व यहूदी लोकांना मुक्त करील. आणि त्याचे राज्य प्रस्थापित होईल असे शिष्यांना वाटत होते आणि या नवीन राज्यात आपल्याला कोणती पदे मिळतील यावरून शिष्यांमध्ये कुरकुर चालू होती. त्यांची ही कुरकुर बंद होऊन त्यांची ही वृत्ती सुधारावी आणि ख्रिस्ताला नाकारले जाऊन त्याला वधस्तंभावर खिळण्यात येऊन तो आता येथून पूढे काही काळासाठी त्यांच्याबरोबर नसणार, तेव्हा त्याच्या शिष्यांनी तो येईपर्यंत विश्वासाने सेवा करीत राहावे हे त्यांना समजून सांगणे हा या दृष्टांताचा उद्देश आहे. देवाने आपल्याला जी कृपादाने दिली आहेत व जे काही दिले आहे त्यांचा उपयोग विश्वासूपणे त्याच्या सेवेसाठी करायचा आहे. कारण प्रत्येक विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आपला हिशोब द्यावा लागेल. पौल म्हणतो, *आपणां सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. ( २ रे करिंथ ५:१०)* आपण देवाने दिलेल्या कृपादानांचा उपयोग योग्य रितीने करीत आहोत काय ? जो लहानशा गोष्टीत विश्वासू राहतो तो असे करील. ज्याने मिळालेल्या मोहरेचा उपयोग केला नाही त्याने, उलट, आपल्या धन्याला दोष दिला, त्याच्यावर आरोप ठेवला की तुम्ही फार अन्यायी आहात. त्याने ती मोहर पेढीवर ठेवली असती तर व्याजही मिळाले असते आणि मोहरही सुरक्षित राहिली असती. या दासाचे हे वागणे दुष्टपणाचे होते. त्याला धन्याची सेवा करायची नव्हती. तो निरूपयोगी दास ठरला. धन्याच्या विरूद्ध बोलण्यात त्याने दिवस घालवले. आपली जबाबदारी ओळखली नाही. त्यामुळे धन्याने त्याच्याजवळची मोहर काढून घेऊन ती, जो तिचा विश्वासूपणे उपयोग करील त्याला दिली. 


     या दाखल्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताने एक खूप महत्वाचे सत्य आम्हाला शिकविले आहे. ते म्हणजे प्रभूची सेवा प्रत्येक विश्वासणाऱ्याला करायची आहे. प्रत्येकाला देवाने वेगवेगळी कृपादाने दिली आहेत. त्या दानांचा उपयोग चांगल्या प्रकारे केला पाहिजे. प्रियांनो, प्रत्येकाने आपल्याला प्रभूसाठी काय करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. प्रभूने आपण सेवा करावी म्हणून आपल्याला सामर्थ्य दिले आहे. आपण जर काही न करता गप्प बसून राहिलो तर प्रभूने दिलेली सेवेची संधी गमावून बसू आणि त्या निरूपयोगी दासाप्रमाणे देवाच्या राज्यासाठी निरूपयोगी ठरू, अपात्र ठरू. पेत्र म्हणतो, *प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. ( १ ले पेत्र ४:१०)* कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे दूसरे आगमन होईल तेव्हा तो प्रत्येकाला त्याने केलेल्या कामानुसार मोबदला देईल. *बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजूरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. ( १ ले करिंथ ३:१३- १५)* याकरिता आम्ही ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आम्हाला एक दिवस उभे राहायचे आहे हे समजून घेऊन त्याच्या सेवेमध्ये कसूर न करता विश्वासूपणे त्याची सेवा करावी. जेणेकरून तो येईल तेव्हा आम्हालाही म्हणेन, *"शाबास, भल्या दासा, तूं लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास." ( लूक १९:१७)*


जे आध्यात्मिक सेवेच्या संधीचा सदुपयोग करतील त्यांना अधिक सेवा करण्याची संधी मिळेल.


          

No comments:

Post a Comment