✨परमेश्वर चांगला आहे✨
"देव इस्त्राएलावर, शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे"..✍🏼
( स्तोत्र ७३:१ )
खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. "खरोखर" या शब्दाद्वारे ज्यांना देवाविषयी संशय आहे, अशा लोकांसाठी देवाबद्दल खात्री देणारा असा हा शब्द आहे. जेव्हा देवाचे लोक परमेश्वराच्या चांगुलपणाविषयीचे हे सत्य जाणून घेतात तेव्हा ते प्रत्येक क्षणाला, प्रत्येक परिस्थितीत देवाची स्तुती करतात, प्रार्थना करतात आणि देवाच्या चांगुलपणाचा अनुभव रोज आणि रोज घेतात. जन्म दिवस असो की मृत्यू दिवस, उत्सवाचे दिवस असो किंवा जीवनाच्या अखेरचा म्हणजेच अंत्ययात्रेचा दिवस, भरभराटीचे दिवस असो किंवा गरीबीचे दिवस, आजारपणाचे दिवस असो किंवा निरोगीपणाचे, सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर चांगलाच असतो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे.. ती म्हणजे हृदय, अंतःकरण शुद्ध ठेवणे, वृत्ती समाधानी ठेवणे. प्रत्येक प्रसंगी आनंद करायचा आहे, मग ते दुःख असो की सुख. स्तोत्रकर्ता म्हणतो, *"परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य !" ( स्तोत्र ३४:८)*
खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत अशा सर्वांसाठी. आपण पाहातो, राजा दाविद, जो परमेश्वरावर प्रीति करत होता, त्याच्या बरोबर चालत होता, परंतु तो सुद्धा एकेदिवशी मोहात पडून पाप करून बसला आणि आपल्या अंतःकरणाचे पावित्र्य गमावून बसला. आपल्या तारणाचा आनंद गमावून बसला. तो म्हणतो, *"मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली; कारण.. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे." ( स्तोत्र ३२:३,४)* त्याने प्रायश्चित्त केले, आपले पाप कबूल केले आणि तो आक्रंदन करून देवाला म्हणत आहे, *"हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल." ( स्तोत्र ५१:१०)* जेव्हा हृदय शुद्ध असते तेव्हा आत्मा स्थिर असतो. आमचे अंतःकरण जर वाईट असेल तर परमेश्वराने केलेली चांगली गोष्ट सुद्धा आम्हाला वाईटच दिसेल. याउलट आमचे अंतःकरण शुद्ध असते तेव्हा दूसऱ्यांनी केलेली एखादी वाईट गोष्ट सुद्धा आमच्या भल्यासाठी चांगली होऊन बदलेल. जसे योसेफच्या जीवनात घडलेले आम्ही पाहातो. योसेफला त्याच्या भावांनी द्वेषाने खाड्यांत टाकले, विकून टाकले, परंतु तेच त्याच्या भरभराटीचे कारण ठरले. त्याच्यासाठी कल्याणकारी ठरले. तो म्हणतो, *"तुम्ही माझे वाईट योजिले; पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते." ( उत्पत्ती ५०:२०)* म्हणून प्रियांनो, आम्ही देवाचा चांगुलपणा ओळखून आमचे अंतःकरण शुद्ध ठेवले तर प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आमच्यासाठी परीक्षेचा न ठरता आनंदाचा ठरेल. त्यासाठी आम्ही स्वतःला ज्या दुःखाच्या परिस्थितीत डांबून ठेवले आहे त्यातून बाहेर पडून शुद्ध जीवन जगण्यासाठी स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित केले पाहिजे.
No comments:
Post a Comment