( उत्पत्ति ४: ८-१५ )
💐 देव संधी देतो , पण.. 💐
*तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय ? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोख तुजवर आहे , करिता तू त्यास दाबात ठेव.* *उत्पत्ति ४:७*
काइनाने स्वतःचा भाऊ हाबेल याचा वध केला कारण काइनाला परमेश्वराचा राग आला होता की देवाने त्याचे अर्पण अमान्य केले होते. मनुष्य वधाच मोठं पातक काइनाच्या हातून घडले होते. तरीही परमेश्वर स्वतः त्याच्याशी बोलला म्हणजे पुन्हा देवाने काइनाला एक संधी दिली होती. ही देवाची त्याच्यावर मोठी कृपा होती. पण काइनाने या कृपेचा अव्हेर केला आणि स्वतःच स्वतःला नाशाच्या खाईत ढकलून दिले.
हे का घडले तर काइनाने स्वतःची चूक मान्य केली नाही. दुसरं म्हणजे स्वतःच्या अहंकाराला प्राधान्य दिले. तिसरी फार मोठी चूक म्हणजे देवाबद्दल काइन बेफिकीर राहिला. आणि *याच तीन कारणाने त्याने पश्चाताप केला नाही , संधी मिळूनही!* *परिणामी काइन देवापासून दूर गेला.*
हा काइन तुमच्या माझ्यातही दडलेला आहेच. आणि देवबाप आजही आम्हाला संधी देतच आहे कारण हा कृपेचा काळ आहे. परमेश्वर त्याच्या सेवकाद्वारे , वचनाद्वारे रोज आमच्याशी बोलत असतो. पश्चाताप केला तरच देवाची समक्षता मिळते. पश्चाताप न करण्याचा जो कठोरपणा हृदयात येतो तो काढलाच पाहिजे.
*जेव्हा पवित्र आत्मा अपराधाची टोचणी देतो तेव्हा समोरची व्यक्ती कुठे चुकली हे न पाहता आपल काय चुकलं त्याच परीक्षण करू . अहंकार पायाखाली तुडवीत प्रभूचरणी नम्र होऊ यात.. लोक काय म्हणतील याचा विचार न करता माझ्या प्रभूला कशाने संतोष होईल हाच विचार करू. देवाबद्दलची बेफिकिरी काढून टाकून देवाच्या समीपतेचा आनंद घेऊ..
*आईवडिलांना मुलांच्या सहवासात रहायला खूप आवडते कारण ती त्यांची स्वतःची मुले असतात. आमच्या देवाला सुद्धा आमचा सहवास अतिप्रिय आहे कारण आम्ही त्याची मुले, त्याची प्रजा , त्याच्या कुराणातील कळप आहोत.*
*म्हणूनच आम्ही पापी असतानाच या प्रेमळ पित्याने परमेश्वराने स्वतःचा पुत्र प्रभू येशु ख्रिस्त आमच्यासाठी दिला.* जसा काइनाने पाप केले तरी परमेश्वर त्याच्याशी बोलून संधी देतच होता. पण काइनाने ती घालवली.त्याचा परिणाम आमच्या डोळ्यासमोर आहेच.
*आपण मात्र या प्रेमळ प्रभूकडे पाठ न करता या कृपेचा, क्षमेचा, प्रेमाचा, प्रभुसहवासाचा आनंद आणि लाभच घेऊ . अन्यथा पाप दाराशी टपून आहेच आमचा नाश करण्यासाठी!!*
*समर्थ ईश्वरा तुझ्या सहवासात राहण्यासाठी आमच्या पापाची क्षमा कर.*
No comments:
Post a Comment