Sunday, 25 October 2020

फिकट घोड्यावरील स्वार - मृत्यू


*प्रकटीकरण भाग — 15*

*शिक्का 4- फिकट घोड्यावरील स्वार - मृत्यू*

*सोबत अधोलोक - म्हणजे नक्की नरकाची शिक्षा*


           प्रियजनहो, *प्रभु येशू ख्रिस्ताने* चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथा प्राणी, “ये,” असे म्हणाला, ते मी ऐकले.  मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा ‘घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव ‘मृत्यू’; आणि ‘अधोलोक’ त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना ‘तलवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जिवे मारण्याचा’ अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला.(प्रकटीकरण 6:7‭-‬8) भीतीने चेहेरा फिका पडला असे आपण बोलतो. फिका पडणे म्हणजे रंग उडणे टवटवी जाणे निस्तेज होणे मृतप्राय होणे. या घोड्याचा रंग सांगतो की या तीन महिन्यांच्या काळात भीतीचे प्रमाण प्रचंड वाढले जाणार आहे. रक्तपात, दुष्काळ रोगराई यांनी पृथ्वीवर भयंकर परिस्थिती निर्माण केलेली असेल. या फिकट घोड्यावरील स्वार मृत्यू आहे. म्हणजे आतापर्यंतच्या पीडांमध्ये मृत्यू होणाऱ्या लोकांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दुसऱ्या शिक्क्याची पीडा रक्तपात, तिसऱ्या शिक्क्याची पीडा दुष्काळ यांनी अशक्त झालेले लोक मृतांच्या उत्तरक्रिया करतील की नाही शंका आहे. आणि जर रस्त्यावर, घरांमध्ये, सर्वत्र मृतदेह पडलेल्या अवस्थेत राहिले तर ते सडून वेगवेगळे आजार बळावतील परिणाम मृत्यू..मृत्यू..मृत्यू....     मृत्यू पाठोपाठ अधोलोक चाललेला आहे म्हणजे या काळात जे मरतील ते अधोलोकात जाणार आहेत. जे *प्रभु मध्ये* मरतात म्हणजे झोपी जातात म्हणजे महानिद्रा घेतात ते *सुखलोकात* जातात तेथून *स्वर्गीच्या राज्यात सार्वकालिक जीवनात* जातील कारण त्यांच्या वर *प्रभु येशू ख्रिस्ताने कृपा केली आहे.* परंतु जे अधोलोकात जातात ते न्यायासाठी उठवले जातील आणि अग्नी व गंधकाच्या सरोवरात टाकले जातील. यासाठी *पवित्र शास्त्र* सांगते, तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. (प्रकटीकरण 20:14)

         प्रकटीकरण पुढे स्पष्ट करते की, पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जिवे मारले जाईल. शब्दशः अर्थ घेतला तर समजते की, दुष्काळामुळे खायला काही मिळत नाही म्हणून जंगली श्वापदे तसेच पाळीव प्राणी कुत्रे, मांजरी हे प्रेते तर खातीलच परंतु जीवंत माणसांवर देखील हल्ले करुन त्यांना मारतील. तसेच *पवित्र शास्त्रात* श्वापद हा शब्द क्रूर निष्ठुर पशुंसारख्या मनुष्या करता देखील वापरला आहे. म्हणजे हे पशुतुल्य मनुष्य सत्तेसाठी बंड, युद्ध करतील आणि त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडतील.  ह्या वचनाचा पुढचा भाग फार गंभीर इशारा देत आहे. मरणाऱ्या लोकांची संख्या पृथ्वीवरील संख्येच्या चौथा भाग असेल. प्रियांनो, युनोने सांगितलेली ऑक्टोबर 2020 ची जगाची लोकसंख्या 7.8 अब्ज आहे म्हणजे सातशे ऐंशी कोटी म्हणजे 7800000000 होय. या संख्येचा चौथा भाग म्हणजे 1950000000 म्हणजे सुमारे दोनशे कोटी = दोन अब्ज होय. ही आजची आकडेवारी आहे. अजून या नाशाच्या काळाला सुरुवात व्हायची आहे. तोपर्यंत ही लोकसंख्या आणखी वाढलेली असेल. आता काहींना असे वाटेल की हालहाल होऊन मरण्यापेक्षा ख्रिस्तविरोधकाचे राज्य व त्याचे देवत्व स्विकारावे. त्याला स्विकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आत्मा शेवटच्या न्यायाच्या वेळी कायमस्वरूपी नरकाच्या आगीत टाकला जाणार आहे. त्याला स्विकारणे म्हणजे स्वतःच्या नाशाला स्विकारणे होय.  शिक्क्यांच्या या चार पीडा संपेपर्यंत पृथ्वीवरील दोन अब्जापेक्षा जास्त लोक मरतील आणि वाईट हे की ते सर्व अधोलोकात जातील म्हणजे त्यांच्या साठी नरक यातना ठरलेल्या आहेत. याचा अर्थ हे मारणारे लोक हे अविश्वासीच असणार आहेत. कारण विश्वासणारे सुखलोकात जातात आणि अविश्वासी हे अधोलोकात जातात. *प्रभुजी म्हणतात, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.  आता जा; पाहा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे. (लूक 10:2‭-‬3) प्रियजनहो, देवाच्या लेकरांनाे आपण प्रभुच्या मळ्यातील कामकरी आहोत. प्रभुजी कळकळीची हाक देत आहेत या प्रियांनो या. प्रभुची ही प्रेमळ हाक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोंचवून अधिकाधिक लोक आपल्या व्दारे स्वर्ग राज्यात येवो. आमेन.*


No comments:

Post a Comment