राजासनारूढ आणि समर्थ करणे
इफिस.२ः१-१०
आपण ख्रिस्तामध्ये स्वर्गीय स्थानात बसलेलो असल्यामुळे, आपणांस आध्यात्मिक स्वस्थता व विश्रांती मिळायला हवी. परंतु अनेक जण ख्रिस्ताला तारणारा म्हणून ओळखतात, पण काळजी आणि चिंता करणे हे त्यांच्या स्वभावात असते. पवित्र शास्त्रात म्हटले आहे, ‘‘दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; अन्याय करणार्यांचा हेवा करू नकोस’’ (स्तोत्र.३७ः१).
विश्वासणार्याला आज्ञापले आहे, ‘‘परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतिक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नकोस; अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते (स्तोत्र.३७ः७,८). आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही, ‘‘कारण आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत’’ (फिलिप्पै.३ः२०).
रोम शहराच्या तुरूंगातील एका अंधारकोठडीतून पौल ह्या महान सत्यांविषयी लिहीत होता, पण ख्रिस्तामधील त्याच्या स्थानाविषयीची त्याला सखोल जाणीव होती. हेच त्याच्या विजयी जीवनाचे रहस्य होते. आपले आध्यात्मिक स्रोत ख्रिस्तामध्ये आहेत हे त्याला समजले होते.
No comments:
Post a Comment