Tuesday, 6 October 2020

तुम्ही कोणाचे बंदिवान आहात?

            तुम्ही कोणाचे बंदिवान आहात?

             इफिस.४ः१-२; प्रेषित.१६ः२५-३१


इफिसकरांस पत्रातील पूर्वार्धात व नंतरच्या उत्तरार्धात पौल स्वतःला वेगवेगळ्या प्रकारे प्रस्तुत करतो हे समजून घेणे मनोरंजक आहे. पहिल्या अर्ध्या भागाच्या सुरुवातीला म्हणजेच सैद्धांतिक भागात पौल स्वतःचा ‘ख्रिस्त येशूचा प्रेषित’ असा उल्लेख करतो (१ः१). पौलाने स्वतःच्या प्रेषितपणावर जोर दिला, कारण त्याला विश्वासणार्‍यांसाठी संदेश द्यायचा होता व तो संदेश त्याने पहिल्या तीन अध्यायांत दिला आहे. इफिसकराच्या उत्तरार्धात ख्रिस्ती जीवन जगण्यावर भर देताना पौल स्वतःचा उल्लेख ‘जो मी प्रभूमध्ये बंदिवान’ असा करतो (४ः१). इफिसकरांस पत्राच्या उत्तरार्धात विश्वासणार्‍यांनी त्यांच्या पाचारणास शोभेल असे वागण्यास तो अत्यंत कळकळीने विनवतो आणि ते ठसवण्यासाठी तो स्वतःला प्रभूचा बंदिवान असे संबोधतो.


पौलाला त्याचा स्वतःसंबंधीचा असा दृष्टिकोन असावा हे पाहणे किती मनोरंजक आहे. तो सुवार्ताप्रसारामुळे रोमचा बंदिवान म्हणून अतिशय ओलसर अशा तुरुंगात डांबला गेला होता, पण तो प्रत्यक्षात स्वतःला प्रभूचा बंदिवान समजत आहे. त्याला हे ठाऊक होते की, प्रभू त्याही परिस्थितीत त्याचा उपयोग करून घेऊ शकत होता आणि अगदी तसेच प्रभूने केले. कारण या तुरुंगवासामध्येच पौलाने फिलेमोनास, कलस्सैकरांस, इफिसकरांस आणि फिलिप्पैकरांस ही पत्रे लिहिली. ही पत्रे शास्त्रलेखात अंतर्भूत केली गेली आणि कित्येक वर्षे जगावर त्यांचा मोठा प्रभाव पडला आहे.


आज आपण स्वतःला हा प्रश्न विचारणे चांगले आहे की मी कोणाचा बंदिवान आहे? मी परिस्थितीचा बंदिवान आहे का प्रभू येशू ख्रिस्ताचा बंदिवान आहे?


_आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता, त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? (रोम.६ः१६)._



No comments:

Post a Comment